Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

पैशांच्या खडखडाटामुळे मंजूर कामेही ठप्प
नगर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महापालिकेच्या खजिन्यात पैशांचा खडखडाट असल्याने ठेकेदार मंजूर झालेली व कार्यारंभ आदेश घेतलेली कामे सुरू करणेच टाळत आहेत. सिद्धिबागेच्या दुरुस्तीचे काम यापैकीच आहे.
‘सिद्धिबागेच्या दुरुस्तीचे आश्वासन वाऱ्यावर’ हे वृत्त ‘लोकसत्ता’च्या आजच्या अंकात प्रसिद्ध झाल्यावर या कामाचा आराखडा तयार करून घेणारे माजी उपमहापौर दीपक सूळ यांनी स्वतच ‘लोकसत्ता’शी संपर्क साधून केवळ आराखडाच नाही, तर या कामाचा कार्यारंभ आदेशही ठेकेदाराला दिला असल्याची माहिती दिली.

बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रांवर गृहरक्षक नकोत, पोलीसच हवेत
विद्यार्थिनींसाठी महिलांचे भरारी पथक
नगर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी
बारावी परीक्षेच्या केंद्रांवर कॉपीसाठी गोंधळ घालणाऱ्या जमावास प्रतिबंध घालण्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान नको, तर पोलीसच तैनात केले जावेत, तेही पुरेशा संख्येने अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्षांकडे केली. दरम्यान, नगरमध्ये मंडळाच्या सचिवांनी घेतलेल्या बैठकीत दहावी व बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रतिबंधासाठी सहा भरारी पथके नियुक्त करण्याचा व त्यातील एक खास महिलांचे पथक नेमण्याचा निर्णय झाला. केंद्रांवर दंगा करणाऱ्यांना शोधण्यासाठी व्हिडिओ चित्रिकरणही केले जाणार आहे.

निर्यातीला द्राक्षे आंबट!
प्रदीप राजगुरू
नगर, २३ फेब्रुवारी

आर्थिक मंदी, तसेच रोगराईमुळे कमी झालेले दर्जायुक्त उत्पादन आणि अपेक्षित बाजार नसल्याने यंदा द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्यातीचा हंगाम ‘आंबट’ ठरला आहे! जिल्ह्य़ातून सध्या प्रामुख्याने आखातात द्राक्षाची निर्यात रोडावली असून, भावही अपेक्षेपेक्षा कमीच आहेत. परंतु युरोपीय देशात मात्र यंदा द्राक्षाची निर्यात होण्याची शक्यताही खूपच दुरापास्त दिसते. सौदी अरेबिया, कतार, दुबई आदी आखाती देशांमध्ये सोनाका, माणिकचमन, शरद सीडलेस, कृष्णा, सरिता वगैरे जातीच्या द्राक्षांची निर्यात नगर जिल्ह्य़ातून सुरू आहे.

‘‘कुकडी’, ‘श्रीगोंदे’, ‘साईकृपा’कडून ६४ कोटींना गंडा’
श्रीगोंदे, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यात एकीकडे विकासाच्या घोषणा करण्याचा सपाटा लोकप्रतिनिधी करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील तिन्ही साखर कारखानदार शेतकऱ्यांना लुबाडत आहेत. गेल्या गळीत हंगामात २१ लाख टन ऊसउत्पादन करणाऱ्या येथील शेतकऱ्यांना या कारखानदारांनी कमी भाव देऊन सुमारे ६४ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप ‘राष्ट्रवादी’चे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांनी केला. श्री. शेलार बेलवंडी येथील कार्यक्रमात बोलत होते.

‘ढाकणेंवरील आरोप न थांबविल्यास गंभीर विषय बाहेर काढू’!
असंतुष्टांचा समर्थकांकडून समाचार
पाथर्डी, २३ फेब्रुवारी/वार्ताहर
भाजपमधील असंतुष्टांनी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्यावर केलेल्या जोरदार टीकेनंतर ढाकणेसमर्थकही आज पुढे सरसावले. ढाकणे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे कार्यकर्ते अल्पबुद्धीचे असून, पदाधिकारी फेरबदलात तोंडावर आपटल्यानेच ते आकांडतांडव करीत असल्याचा टोला या समर्थकांनी आज पत्रक काढून लगावला. ढाकणे यांच्यावर बेताल आरोप थांबवा; अन्यथा त्यांचेच अनेक गंभीर विषय बाहेर काढू, असा खणखणीत इशाराही ढाकणेसमर्थक भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पत्रकात दिला.

टक्केवारीचा खेळ!
उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या दबावातून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यू. डी. चव्हाण यांनी कामांच्या शिफारशी जिल्हा मजूर सहकारी संघाकडे परस्पर पाठवल्याचा आरोप करीत शिवसेनेचे वसंतराव चेडे व मनीषा युवराज माळी यांनी चव्हाण यांच्या दालनातील टेबलावर बसून उपोषण केले. गेल्या शनिवारची ही घटना. केवळ पारनेर तालुक्यापुरती किंवा पदाधिकाऱ्यांच्या दबावापुढे अधिकारी कसे लोटांगण घालतात एवढय़ापुरती मर्यादित नाही, तर बांधकाम विभागाचा कारभार कशा पद्धतीने चालला आहे, यावर प्रकाश टाकणारी आहे.

‘कर्जत पोलिसांकडूनही लज्जास्पद वर्तन’
विवाहितेची छळाची तक्रार
नगर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी
पेट्रोलपंपावरील पैसे लांबविण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याऐवजी कर्जत पोलिसांनी आपल्याला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर राजकीय दबावातून रस्त्याने फरफटत नेऊन लज्जास्पद वर्तन केले, अशी तक्रार राशीन (ता. कर्जत) येथील पद्मा विठ्ठल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पाचपुते पुन्हा टीकेचे धनी, नागवडेंवर स्तुतिसुमने!
निंबवीतही रंगला नेत्यांचा फड!
श्रीगोंदे, २३ फेब्रुवारी/वार्ताहर
बनपिंप्रीपाठोपाठ तालुक्यातील निंबवी येथेही सत्कार समारंभात नगर व श्रीगोंदे तालुक्यांतील राजकीय नेत्यांच्या रंगलेल्या फडात वनमंत्री बबनराव पाचपुते यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले, तर पाचपुतेंचे कट्टर विरोधक माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली! विशेष म्हणजे यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले व काँग्रेसचे नगर शहर जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास कोतकर यांनी आघाडी घेतली.

जिल्ह्य़ात महाशिवरात्र धार्मिक कार्यक्रमांनी साजरी
नगर, २३ फेब्रुवारी/ठिकठिकाणचे वार्ताहर

महाशिवरात्रीनिमित्त आज जिल्ह्य़ात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. मंदिर परिसरात पूजा साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर येथे वृद्धेश्वराच्या यात्रेत राज्यातील भाविकांनी हजेरी लावली.
वृद्धेश्वराच्या दर्शनास भाविकांची रीघ
पाथर्डी - नवनाथांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथील स्वयंभू महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर लाखो भाविकांनी घेतला. गृहरक्षक दल, पोलीस व देवस्थान समितीने केलेल्या नियोजनामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता आले.

शिक्षणाची हेळसांड नको
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाटय़ाने होणाऱ्या बदलांमुळे ज्ञानाच्या कक्षा अविरतपणे रूंदावत आहेत. आजचे औद्योगिक जग ज्ञानाधिष्ठित बनू पाहत आहे. मानवी जीवन सुसह्य़ करणाऱ्या अनेक भौतिक सुविधा ज्ञान-विज्ञानाच्या साहाय्याने आपण निर्माण केल्या आहेत. माणसाच्या मूलभूत गरजा व आरोग्य याकडेही आपण विशेष लक्ष पुरविले आहे. एवढे सारे क रून आयुष्य सुखमय झाले का? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. रोज नवनव्या सुविधांबरोबरच नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत किंवा जुन्याच प्रश्नांचे नव्याने आकलन होत आहे. समाज सुखी व समाधानी झाल्याचे अद्याप तरी दृष्टिपथात आलेले दिसत नाही.

मुनोत दाम्पत्य खून खटल्याची सुनावणी सुरू
नगर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

शहरात वर्षांपूर्वी घडलेल्या उद्योजक मुनोत दाम्पत्य खूनप्रकरणाची सुनावणी आज सुरू झाली. पहिल्या दिवशी एका पंचाची साक्ष झाली.जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. रमेश मुनोत यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला होता. त्यातील पंच दिलीप पितळे यांची साक्ष आज झाली. त्यांची सरतपासणी जिल्हा सरकारी वकील विवेक म्हसे यांनी घेतली, तर उलटतपासणी आरोपींचे वकील सतीश गुगळे, राहुल पवार यांनी घेतली. पितळे यांनी मुनोत यांच्या शरीरावरील जखमा, शारीरिक स्थिती याची माहिती दिली. या वेळी तपासी अधिकारी टी. के. वहिले उपस्थित होते. उद्या (मंगळवारी) आणखी एका पंचाची साक्ष होणार आहे. सुनावणीस प्रारंभ झाला तेव्हा या खूनप्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित होते. दि. ३ डिसेंबर २००७ रोजी माणिकनगरमध्ये राहणारे रमेश मुनोत व चित्रा मुनोत या दाम्पत्याचा निर्घृण खून करण्यात येऊन ९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे, अतिरिक्त अधीक्षक महेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक देवीदास सोनवणे, कोतवालीचे निरीक्षक टी. के. वहिले यांनी मोबाईलच्या क्रमांकावरून व नवीन तंत्रज्ञानाआधारे आरोपींचे लोकेशन मिळविले व दोन दिवसांतच ८ आरोपींना मध्य प्रदेशात जेरबंद केले. मुनोत दाम्पत्याची हत्या करणाऱ्यांमध्ये बंगल्याच्या पूर्वीच्या सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. आरोपींमध्ये शिवकुमार साकेत, शैलेंद्रसिंग ठाकूर, बालेंद्रसिंग ठाकूर, शिव थोहर, संदीप पटेल, राजेश ठाकूर, राजू दरोडे, संगीता साकेत यांचा समावेश आहे.

गॅसटाक्यांची विनापरवाना विक्री, चौघांना कोठडी
राहुरी, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

विनापरवाना गॅसटाक्यांची विक्री करणाऱ्या चौघाजणांना राहुरी न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली. शिक्षा झालेले आरोपी राहुरी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध कंपन्यांच्या गॅसटाक्या बाळगून वाहनधारक, घरगुती कारणासाठी चढय़ा भावाने बेकायदा विक्री करत होते. शशिकांत गोलांडे, नंदू शिंदे, मनोज पुंड, संदीप पवार यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून त्यांना रविवारी अटक केली होती. आज त्यांना राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश स. रं. ताठे यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एम. एम. बागवान, उपनिरीक्षक आय. एन. पठाण, एस. टी. धोंडगे, पो. कॉ. संतोष लगड, बी. एन. नवाळी, पवार, ढगे, शेटे करीत आहेत.

‘ज्ञानेश्वर’च्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले
नेवासे, २३ फेब्रुवारी/वार्ताहर
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राज्य साखर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांची, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग यांची फेरनिवड करण्यात आली. कारखान्याच्या निवडणुकीत घुले गटाला बहुमत मिळाले होते. कारखान्याच्या विश्रामगृहात संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत ही निवड केली गेली. घुले हे तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची, तर अभंग हे पाचव्यांदा उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदकुमार सूर्यवंशी यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील गाढे यांनी काम केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा कामगार संघटनेतर्फे वसंतराव फटांगरे, रामभाऊ पाऊलबुद्धे, भाऊसाहेब चौधरी यांनी सत्कार केला.

चोरांचा डोळा ‘लाईट कटर’वर!
नगर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

रात्रीच्या वेळी वाहनांचे प्रखर दिवे समोरच्या वाहकाच्या डोळ्यांवर चमकून अपघात होऊ नये म्हणून लावलेले नगर-औरंगाबाद रस्त्यावरील लाईट कटर लांबविण्याचा प्रकार बायजाबाई जेऊर, घोडेगाव, पांढरी पूल या गावांत झाला आहे. यामुळे काही हजार रुपयांचे नुकसान होऊन या सुंदर चौपदरी रस्त्याला या गावाजवळ दुरवस्था प्राप्त झाली आहे. अशोका बिल्डकॉन कंपनीने या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम केले. नगर-मनमाड, नगर-पुणे रस्त्याच्या मानाने या रस्त्याचे काम जलद व चांगले झाले. या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन अपघात होऊ नये म्हणून कंपनीने दुभाजकावर ऑस्ट्रेलियन बनावटीचे ‘लाईट कटर’ लावले. सुमारे दीड ते दोन हजार रुपयांना एक अशी या लाईट कटरची किंमत आहे. या कटरमुळे रात्रीच्या वेळी वाहनांचा प्रकाशझोतविभागला जातो. पर्यायाने अपघात होण्याची शक्यता कमी होते. शिवाय रस्त्याला ‘रिच लूक’ही येतो. मात्र, चांगले सहन न होणाऱ्या काही दळभद्री लोकांनी करवतीच्या साहाय्याने हे लाईट कटर तोडून नेले आहेत. ५०च्या आसपास लाईट कटर लांबविण्यात आले असून, ते भंगारमध्ये विकण्यात आल्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम व ‘अशोका’ची यंत्रणा या संपूर्ण रस्त्याची देखरेख २४ तास करण्यास सक्षम नाही. जनतेच्याच मालकीच्या या रस्तयाची निगा जनतेनेच राखणे अपेक्षित आहे, असे मत कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांनी व्यक्त केले.

सुझुकीच्या जीएस-१५० आरचे महापौरांच्या हस्ते वितरण
नगर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सुझुकीची नवीन जीएस-१५० आर मोटारसायकल येथील सिद्धेश मोटर्समध्ये उपलब्ध झाली आहे. आज संध्याकाळी पहिल्या नऊजणांना महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते या मोटारसायकलींचे वितरण करण्यात आले. या वेळी र्मचटस् बँकेचे अध्यक्ष आनंदराम मुनोत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, लालचंद मुनोत, सचिन मुनोत, नरेश मुनोत, मीनाताई मुनोत आदी उपस्थित होते.
स्ट्रीम लाईन्ड एरोडायनामिक झेव्ह एल. डी. आणि रेअर टर्न सिग्नल्स ही या मोटरसायकलीचे वैशिष्टय़े आहेत. ६६ हजार ३४५ रुपये (ऑन रोड) किमतीच्या या मोटरसायकलीची सिद्धेश मोटर्समध्ये आगाऊ नोंदणी सुरू असल्याची माहिती श्री. आनंदराम मुनोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मोटारसायकलला ६ स्पीड गिअर बॉक्स असून शॉकअ‍ॅबसॉर्बरला स्वतंत्र ऑईल रिझव्‍‌र्हायर असल्याने कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. इको मोड इंजिनचा वापर यात करण्यात आला आहे.

प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांना नगरच्या रंगकर्मीतर्फे श्रद्धांजली
नगर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘वऱ्हाड’कार दिवंगत अभिनेते प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांना नगरच्या रंगकर्मीनी आज श्रद्धांजली अर्पण केली. अ. भा. नाटय़ परिषदेच्या नगर शाखेने यासाठी सकाळी मोने कलामंदिरात
विशेष सभेचे आयोजन केले होते. शाखाध्यक्ष सतीश लोटके यांनी प्रास्ताविक केले.परिषदेची नगर शाखा स्थापन करण्यात प्रा. देशपांडे यांनी ते परभणी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष असताना पुढाकार घेतला होता. त्यांच्याच हस्ते नगरची शाखा स्थापन झाली असे लोटके यांनी सांगितले. सर्वश्री. पी. डी. कुलकर्णी, राहुल भिंगारे, मोहनीराज गटणे, रितेश साळुंके, शशिकांत नजन आदींची यावेळी भाषणे झाली.

बाणेश्वर प्रतिष्ठानच्या सप्ताहाची आज केडगावमध्ये सांगता
नगर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त केडगाव येथील श्रीबाणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली चरित्रकथेचा सांगता समारंभ उद्या (मंगळवारी) पंढरीनाथमहाराज देवकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. मंडळातर्फे गेल्या ८ वर्षांपासून सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. दि. १७ रोजी सुरू झालेल्या या सप्ताहाचे कलशपूजन माजी महापौर संदीप कोतकर यांच्या हस्ते झाले.

चांदेकसारे येथे सर्वरोग निदान शिबिरात ६४३जणांची तपासणी
कोपरगाव, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

लायन्स क्लबच्या वतीने चांदेकसारे येथील हायस्कूलमध्ये प्रवरानगर रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित सर्वरोग निदान शिबिरात ६४३जणांची तपासणी करण्यात आली. २५जणांनी रक्तदान केले, अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश ठोळे यांनी दिली.चांदेकसारे, घारी परिसरातील नागरिकांची प्रवरानगर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मोफत सर्वरोग तपासणी केली. २५जणांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. विलास आवारी, आनंद ठोळे, हेमचंद्र भवर, सत्येन मुंदडा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मोठे आजार असणाऱ्या रुग्णांवर प्रवरानगर येथे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, असे श्री. ठोळे म्हणाले.

नगरमधून दिलीप गांधींना उमेदवारी देण्याची मागणी
शेवगाव, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांनाच द्यावी, अशी मागणी तालुका जैन समाज संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. तसा ठराव मंजूर करून पक्षाध्यक्षांकडे पाठविण्यात आला.गांधी यांचे संघटनकौशल्य, तसेच कामे यांची आजही चर्चा आहे. अल्पसंख्याक, तसेच मुस्लिम समाजात त्यांना मानणारे कार्यकर्ते तालुक्यात मोठय़ा संख्येने आहेत. अर्बन बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने घवघवीत यश मिळविले. बँकेचे अध्यक्ष या नात्यानेही त्यांचा सर्व थरात जनसंपर्क आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्यांना उमेदवारी द्यावी, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. बैठकीस तखत मेहेर, बाबूशेठ गांधी, राजेंद्र मेहेर, प्रदीप मेहेर, राजेंद्र मुनोत, संतोष गांधी, शांतीलाल बंब आदी उपस्थित होते.

पिसाळलेल्या लांडग्याच्या चाव्यात डिकसळला
बैलाचा पिसाळून मृत्यू

मिरजगाव, २३ फेब्रुवारी/वार्ताहर
पिसाळलेल्या लांडग्याने डिकसळ, बाभूळगाव, गोंदर्डी भागात धुमाकूळ घातल्याबाबत वन विभागाचे अधिकारी कानावर हात ठेवून असतानाच, लांडग्याने चावा घेतलेल्या डिकसळ येथील अंकुश लाढाणे यांच्या बैलाचा पिसाळून मृत्यू झाला.लांडग्याच्या उपद्रवामुळे या तिन्ही गावांतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. पिसाळलेल्या लांडग्याने किती जनावरांना चावा घेतला त्याची माहिती अधिकाऱ्यांकडे नाही. परंतु येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सातकर यांनी पिसाळलेल्या जनावरांची लक्षणे सांगितली. आपली जनावरे पिसाळून दगावल्याने हतबल झालेले शेतकरी नुकसान मिळणार की नाही, असा सवाल विचारत आहेत. वन विभागाकडे मात्र आज तरी याचे कोणतेही उत्तर नसल्याचे विदारक चित्र आहे! दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांना वन विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे शाखाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले.