Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

नवनीत

जी व न द र्श न
उपवास आणि सामाजिक न्याय

उद्यापासून ख्रिस्ती बांधवांचा प्रायश्चित्य काळ सुरू होत आहे. जुन्या करारातील संदेशांनी उपवासाची सांगड सामाजिक न्यायाशी घातली. उपवास करणाऱ्या धनदांडग्या धार्मिकांना संदेष्टा आयजया म्हणाला, ‘‘तुम्ही उपवासाच्या दिवशी आपल्या सर्व मजुरांना काबाडकष्ट करायला लावता. आपसात वादावादी करता. हातघाईवर येता आणि उपवासही करता! असा उपवास देवाला मान्य नाही.’’ संदेष्टय़ांनी त्यांना उपवासाचे मर्म समजावून सांगितले. दुष्टपणाच्या बेडय़ा तोडा, जे रंजलेगांजले आहेत त्यांना मुक्त करा, त्यांच्या खांद्यावरचे जोखड दूर करा, आपले अन्न भुकेल्यांना द्या, निराश्रितांना आपल्या घरी आश्रय द्या, उघडय़ावागडय़ाला वस्त्र द्या, आपल्या बांधवाला मदत करा (आयजया ५८:२-८) सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करणे आणि माणसा-माणसातील संबंध सुंदर करणे हे धर्माचे आद्य कर्तव्य आहे. उपवास करण्याआधी न्यायाची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. देवाने माणसाला शरीर झिजविण्यासाठी दिलेले नसून, इतरांची सेवा करण्यासाठी दिलेले आहे. मग माणसाने उपवासच करु नये का? अर्थात करावा. परंतु तो पुण्यसंचय करण्यासाठी नव्हे तर आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि अन्याय्य सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी करावा. प्रभू ख्रिस्ताने आपल्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा करण्यासाठी चाळीस दिवस उपवास केला. त्यामुळे त्याला मानवाच्या भल्यासाठी देह झिजविण्याची आणि आत्मार्पण करण्याची प्रेरणा मिळाली. कर्मकांड हा धार्मिक जीवनाचा एक भाग आहे. समाजाला त्याची आवश्यकता असते. परंतु कर्मकांडाची सामाजिक वास्तवापासून नाळ तुटते तेव्हा ते कर्मकांड कोरडे होऊ शकते. धार्मिकतेचा परिणाम सामाजिक चारित्र्यामध्ये झाला पाहिजे. येशूच्या काळी तशीच परिस्थिती होती. एक ढोंगी धार्मिक मनुष्य मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेला. तो मोठय़ामोठय़ाने देवाला (आणि लोकांनाही) सांगू लागला, ‘‘इतर सर्व माणसे लुबाडणारी, अधार्मिक आणि व्यभिचारी आहेत. परंतु मी या सर्वाहून निराळा आहे कारण मी आठवडय़ातून दोनदा उपवास करतो.’’ येशूने त्याचे बोलणे ऐकून त्याची निर्भत्सना केली कारण तो उपवास करूनही इतरांना तुच्छ समजत होता.
फादर फ्रान्सिस दिब्रेटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
लघुग्रहांचा पट्टा
लघुग्रहांचा पट्टा म्हणजे काय? लघुग्रहांची निर्मिती कशी झाली असावी?

आपल्या सूर्यमालेतील मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्या भ्रमणकक्षांच्या मधल्या कक्षेत असंख्य लहान आकारांचे ग्रहसदृश दगड (लघुग्रह) भ्रमण करीत आहेत. एका ठराविक कक्षेत भ्रमण करणाऱ्या लघुग्रहांच्या या समूहाला लघुग्रहांचा पट्टा असे म्हणतात. या पट्टय़ातून भ्रमण करणाऱ्या या दगडांचा आकार ग्रहांच्या मानाने अतिशय छोटा, म्हणजे अवघा काही शेकडा किलोमीटर इतकाच असल्याने यांना लघुग्रह म्हटले जाते. सूर्यमालेत इतरत्र अस्तित्वात असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्टय़ांपासून या पट्टय़ाचे वेगळेपण दर्शविण्यासाठी या पट्टय़ाला मुख्य पट्टा असे मानले गेले आहे.
सेरेस व पल्लास या मोठय़ा लघुग्रहांचा शोध लागल्यानंतर हे एखाद्या विस्फोट झालेल्या ग्रहाचे तुकडे असावेत असा विचार पुढे येऊलागला. पुढे जसजसा इतर लघुग्रहांचा शोध लागून त्यांचा अभ्यास सुरु झाला तेव्हा हा विचार हळूहळू मागे पडत गेला. एखाद्या ग्रहाचे विभाजन करण्यास लागणाऱ्या प्रचंड ऊर्जेचा अभाव, या पट्टय़ातील लघुग्रहांचे मर्यादित एकत्रित वस्तूमान व त्यांच्यातील रासायनिक वेगळेपण यामुळेच त्यांचे मूळ एकाच ग्रहात नसावे हे स्पष्ट होऊलागले.
सध्याच्या मान्यताप्राप्त सिद्धांतानुसार मंगळापलिकडील कक्षेतील हे असंख्य लघुग्रह सूर्यमालेच्या निर्मिती प्रक्रियेच्या वेळीच त्या पलीकडील गुरुच्या प्रचंड गुरुत्वाकर्षण प्रभावामुळे एखाद्या ग्रहात रुपांतरित होऊ शकले नाहीत व तसेच या प्रभावामुळे त्यांच्या वेगात चलबिचल होऊन हे लघुग्रह या पट्टय़ातील इतर लघुग्रहांवर आदळत गेले अथवा आपल्या कक्षेतून भिरकावले जाऊन सूर्यमालेतील इतर ग्रहांवर वा सूर्यावर जाऊन आदळले. गुरुचा हा प्रभाव आजही कायम आहेच व याचमुळे हे लघुग्रह एका पट्टय़ात राहून मार्गक्रमण करीत आहेत.
महेश नाईक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
इब्न बतूता

अब्द अल्ला इब्न अब्द अल्ला अल्-लावाती अत-ताजी इब्न बतूता हे मालगाडीसारखे लांबलचक नाव गार्डाच्या छोटय़ा डब्यासारखे इब्न बतूता म्हणून प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक साधनांमध्ये इब्न बतूताची प्रवासवर्णने अत्यंत विश्वसनीय समजली जातात. ‘रिहल्हा’ या पुस्तकातून त्याच्या प्रवासवर्णनांचे चित्तथरारक वर्णन वाचायला मिळते. काझी घराण्याची परंपरा असलेल्या घरात २४ फेब्रुवारी १३०४ रोजी टॅन्जियर येथे त्याचा जन्म झाला. मक्केवरून आल्यानंतर काही काळ इस्लामच्या अभ्यासात घालवून तो विश्वभ्रमंतीला निघाला. प्रवासाचा त्याने नियम ठरवला होता की, एकाच रस्त्याने दोनवेळा प्रवास करायचा नाही. आफ्रिकेच्या सफरीत त्याने एडन, मोंबासा, यानंतर ओमानला जाऊन इजिप्त, सीरिया, आशिया, मायनरमधील अनेक शहरे पाहिली. कॉन्स्टॅन्टिनोपॉलवरून बुखारा खोरासाना असा प्रवास करत तो काबूलला पोहोचला. आता त्याला वेध लागले होते हिंदुस्थानचे. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याने त्याचे स्वागत करुन काझी पद देऊ केले. राजदूत म्हणून चीनला पाठविले. पण वाटेत त्याचे सारे शाही सामान जे चिनी सम्राटाला भेट द्यायचे होते ते लुटल्याने तो घाबरला आणि मालदीवला पोहोचला. तेथेही त्याची काझीपदी नेमणूक झाली. पुढे मालदीवला सुलतान होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा अयशस्वी झाल्याने तो श्रीलंकेत गेला. तेथून चीन,आणि मग सुमात्रा, मलबार, ओयान, पर्शिया, बगदाद असा प्रवास करुन तो घरी परतला. जवळजवळ १ लाख किलोमीटरच्या वर त्याने प्रवास केला. त्याचा प्रवास चालता-बोलता इतिहास ठरला. त्यातून मध्यमयुगीन मुस्लिम जगताचं सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय स्थिती समजते. हा थोर प्रवासी इतिहासकार १३७८ च्या सुमारास मृत्यू पावला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
रिकामीच राहिली गाडी

सूर्य नुकताच वर आला होता. रुंद चेहऱ्याचा धिप्पाड अंगाचा बलदेव आपली बैलगाडी घेऊन आनंदाने गाणे गात जंगलात लाकूडफाटा आणायला चालला होता. बैल वाट तुडवत होते. चाकांचा खडखडाट बलदेवच्या गाण्याला साथ करत होता.
पक्ष्यांचा नाजूक किलबिलाट बलदेवच्या गाण्यात मिसळला तसे बैलांनी आणि बलदेवने ओळखले की, जंगल जवळ आले. एका जुनाट झाडाशी त्याने गाडी थांबवली. जवळ काही फांद्या पडल्या होत्या. झाडाला वाळवी लागली होती. ते कोसळून कधीतरी पडणार होते. बलदेवने विचार केला हे झाड तोडायला हरकत नाही. कुऱ्हाड काढून त्याने लाकडे तोडायला सुरुवात केली. छोटुकल्या खारी गोंडेदार शेपटी हलवत फांद्यांवरून धावपळ करू लागल्या. जंगलाची स्वप्नाळू शांतता कुऱ्हाडीच्या आवाजाने तुटू लागली.
उन्हं चढायला लागली. बलदेवने काम थांबवले. बरोबर आणलेली भाकरी-चटणी खाल्ली. पुन्हा तो लाकूड तोडण्याच्या उद्योगाला लागला. भरपूर लाकडे जमा झाली तशी त्याने पारंब्यांनी लाकडाच्या छोटय़ा-छोटय़ा मोळय़ा बांधायला सुरुवात केली. संध्याकाळ झाली तरी बलदेव मन लावून मोळय़ा बांधत होता. त्याच्या मानेवर, कपाळावर घामाचे थेंब तरारले. मोळय़ा बांधून झाल्या. बलदेवने एक मोळी गाडीत फेकली. दुसरी फेकली. तिसरी फेकली. तो मोळय़ा फेकत राहिला. त्याने विचार केला एका मोळीचे ओझे गाडी पेलते तर दुसरीचेही पेलेल. सगळय़ा मोळय़ा त्याने गाडीत भरल्या. गाडी इतकी गच्च भरली की, बिचाऱ्या बैलांना एक पाऊलही पुढे टाकता येईना. प्रयत्न करूनही गाडी जागची हलेना. बलदेव चिंतेत पडला. जंगल अंधारू लागले होते. बलदेवने एक-एक मोळी उतरवून बाजूला टाकायला सुरुवात केली. तो मनाशी म्हणत राहिला, माझे बैल या मोळीचे ओझे ओढू शकत नाहीत, तर दुसरीचेही ओढू शकणार नाहीत. भराभरा एकामागून एक सगळय़ा मोळय़ा त्याने गाडीतून खाली टाकल्या. गाडी पूर्ण मोकळी झाली. अंधार पडला होता. चकचकीत चंद्र झरझर वर जात होता. बलदेव गाडीत चढला. त्याने कासरा ओढला आणि मोकळी गाडी घेऊन तो घरी परतला.
आपली कुवत ओळखून कुठे थांबायचे हे कळणे आवश्यक असते. सुरुवात करणे सोपे असते, पण नेमके कुठल्या क्षणी आणि कुठे थांबायचे हे विचारपूर्वक ठरवणे प्रत्येकाला आवश्यक आहे.
आजचा संकल्प - मी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कधीही करणार नाही. पूर्ण विचार करूनच प्रत्येक गोष्ट करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com