Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

नवी मुंबईतील खांदेश्वर मित्र मंडळाने महाशिवरात्रीनिमित्त रविवारी बैलगाडय़ांची शर्यत आयोजित केली होती. एका रोमहर्षक लढतीचे नरेंद्र वास्कर यांनी टिपलेले छायाचित्र.

‘एनएमएमटी’ची वाशी ते वांद्रे, दादर बस लवकरच
नवी मुंबई/प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने सीमोल्लंघनाची जोरदार तयारी सुरू केली असून, वाशी ते वांद्रे तसेच वाशी-दादर या दोन मार्गांवर पहिल्या टप्प्यात बससेवा सुरू करण्यासाठी आखणी केली जात आहे. विशेष म्हणजे, वाशी-वांद्रे मार्गावर प्रवासी बससेवा सुरू करण्यासाठी परिवहन मंत्रालयाकडून आवश्यक असलेले परमिट मिळविण्यातही ‘एनएमएमटी’ला यश आले आहे. राज्याच्या परिवहन विभागाने ‘एनएमएमटी’ला यापूर्वीच मुंबईतील वेगवेगळ्या सात मार्गांवर प्रवासी सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. असे असले तरी ‘एनएमएमटी’च्या मुंबई प्रवेशास ‘बेस्ट’ने हरकत घेतल्याने हे सीमोल्लंघन यापूर्वी रखडले होते.

‘शरद पवार आपल्यासमोर आव्हान वाटत नाही’
बेलापूर/वार्ताहर :
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात असले, तरी ते आपल्यासाठी आव्हान ठरू शकत नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी वाशी येथे केले. शिवसेनेच्या वतीने नवी मुंबईतील शिरूर मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा वाशी येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अरविंद सावंत, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, पुणे उपजिल्हाप्रमुख शरद सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यालयाचे १२० कोटींचे काम आले ९० कोटींवर; आयुक्तांचा निर्णय फळाला
नवी मुंबई/प्रतिनिधी :
संपूर्ण देशभरात मंदीचे वारे घोंगावत असताना ‘पाम बीच’ मार्गावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आपल्या मुख्यालयाच्या उभारणीसाठी सुमारे १२३ कोटी रुपयांची निविदा फेटाळून व्यावहारिक शहाणपणा दाखविण्याचा महापालिका आयुक्त विजय नाहटा यांचा निर्णय चांगलाच फळाला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अव्वाच्या सव्वा दराने आलेली जुनी निविदा फेटाळून जेमतेम दोन आठवडय़ांचा कालावधी उलटत नाही, तोच या कामासाठी ८९ कोटी रुपयांची नवी निविदा महापालिकेस प्राप्त झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. विशेष म्हणजे, या रकमेतही कपात व्हावी यासाठी आता अभियांत्रिकी विभागाने कंबर कसली असून १२० कोटींचे उड्डाण घेणारे मुख्यालयाचे काम आता ८५ कोटींच्या घरात स्थिरावणार असल्याने आयुक्त या नव्या निविदेविषयी कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषदेतर्फे क्रीडा महोत्सव
पनवेल/प्रतिनिधी :
रायगड जिल्हा परिषदेतर्फे २४ व २५ फेब्रुवारीला कर्नाळा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत. यावेळी आमदार जयंत पाटील, देवेंद्र साटम, बाळाराम पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, कॅरम, अ‍ॅथलेटिक्स, कुस्ती, रस्सीखेच या क्रीडा प्रकारांचा समावेश असून, एकूण अडीच लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अंदाजे दोन हजार खेळाडू सहभागी होतील व पाच हजार प्रेक्षक त्याचा आनंद लुटतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारचा क्रीडा महोत्सव आयोजित करणारी रायगड जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे, अशी माहितीही आयोजकांनी दिली. विशेष म्हणजे कुस्तीच्या प्रत्येक गटातील विजेत्याला खुराकासाठी वर्षभर दरमहा ५०० रुपये देण्यात येणार आहेत. या महोत्सवात होणारी कबड्डी स्पर्धा जिल्ह्यात प्रथमच मॅटवर खेळविण्यात येणार आहे.