Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जीवनाचा अर्थ सांगणारी केळी

 

इझाबेला ही पर्यटनाची खूप आवड असणारी स्त्री होती. तिच्या पर्यटनामध्ये एकदा तिने नेपाळला भेट दिली. तिथे एका बौद्ध भिक्षूशी तिची गाठ पडली. बोलता बोलता त्याने त्याच्याजवळील एक पिशवी उघडली आणि त्यातून काही केळी बाहेर काढली आणि इझाबेलाला तो म्हणाला, ‘‘ही केळी जीवनाचा अर्थ आपल्याला समजावून सांगतात हे तुला माहीत आहे का?’’
इझाबेला त्याच्या बोलण्याने बुचकळ्यात पडली.
मग त्याने पिशवीतून एक जास्त पिकलेले, खराब झालेले केळं काढलं. आणि बाजूला फेकून दिलं. ‘‘आपला भूतकाळ या केळ्याप्रमाणे आहे. त्याचा आपण योग्य प्रकारे उपयोग न केल्यामुळे तो त्याप्रमाणे फुकट गेला आणि आता इतका उशीर झाला की आपण त्याबद्दल काहीच करू शकत नाही.’’ नंतर त्याने बॅगेतून दुसरं केळं काढलं. ते हिरवं आणि कच्चं होतं. ते त्याने परत पिशवीत ठेवून दिलं. आणि तो म्हणाला, ‘‘हा आपला भविष्यकाळ आहे. योग्य वेळ येण्याकरता आपण थांबायला हवं आणि मग संधीचा फायदा घ्यायला हवा. म्हणजेच हे केळं चांगलं पिकेपर्यंत वाट पाहायची आणि मग खाण्यासाठी त्याचा उपयोग करायचा.’’ सर्वात शेवटी त्याने तयार झालेलं म्हणजे पिकलेलं केळं काढलं. ते सोललं आणि इझाबेलाला खायला दिलं आणि म्हणाला,‘‘हा वर्तमानकाळ आहे. त्या क्षणाचा, त्या काळाचा चांगला उपयोग करायचा. संधी साधायची. क्षणाचाही विलंब न करता.’’
मित्रांनो, केळी हे गरीब माणसासाठी परिपूर्ण आणि स्वस्त फळ आहे, त्यातून आपल्याला कोणती जीवनसत्त्वे मिळतात. इ. विषयीची माहिती आपल्याला विज्ञान शिक्षणातून मिळत असते. पण बौद्ध भिक्षूने केळ्यांमधून जीवनविषयक दृष्टिकोन किती सहज आणि सोप्या पद्धतीने समजावला. म्हणजेच भूतकाळात घडलेल्या चुकांचे दु:ख करत न बसता, पण त्यापासून योग्य तो धडा घेणे, चुका सुधारणे हे वर्तमानकाळात शक्य आहे आणि मग त्याचे चांगले फळ मिळण्यासाठी सबुरी आणि संयमाने उज्ज्वल भविष्यकाळाची वाट पाहणे गरजेचे आहे. हे तात्पर्य सहज लक्षात येण्याजोगे आहे.