Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

धनगर समाज आर्थिकदृष्टय़ा उद्ध्वस्त - डांगे
मनमाड / वार्ताहर

 

धनगर समाज आर्थिकदृष्टय़ा उद्ध्वस्त झाला आहे, आमचे उद्योगधंदे नाहीत, आमही शिकलो नाही एकूण निरक्षरतेपैकी २७ ते २८ टक्के निरक्षरता धनगर समाजामध्ये असल्याने समाजाची प्रगती कशी होणार असा सवाल माजी मंत्री आण्णा डांगे यांनी येथे केला. येथील गुरू गोविंदसिंग हायस्कूल समोरील स्टेडियमवर आयोजित धनगर समाजाच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक मधु शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख संयोजक व आयोजक नगरसेवक साईनाथ गिडगे यांनी स्वागत केले. महाराष्ट्रात एक कोटी १० लाख इतक्या संख्येने असलेल्या या समाजाला प्रथम धोरण निश्चित करून काम करावे लागणार आहे. समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्या यासाठी धनगर समाज पेटून उटला आहे. अज्ञान, दारिद्रय़, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव यात आपण गुरफटलो आहोत. दिशा दाखवायला कोणी नाही. प्रत्येक जात प्रगतीकडे वाटचाल करीत असाताना धनगर समाज मात्र अधोगतीच्या दिशेने चालला आहे अशी खंत डांगे यांनी व्यक्त केली. समाज वाचविण्यासाठी सर्वानी संघटीत व्हावे असे आवाहन डांगे यांनी केले. निवृत्ती विशेष पोलीस महानिरीक्षक मधु शिंदे, शंकरराव कोळेकर, देवीदास चौधरी, अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष शालीग्राम व्हडगा आदींची भाषणे झाली. सविता गिडगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा आढावा घेतला.
‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो’च्या गगनभेदी घोषणांनी मेळाव्याचा परिसर दणाणून गेला. धनगर समाज हा दऱ्या खोऱ्यात राहणारा दुर्लक्षित समाज आहे. समाज जागृतीसाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती नगरसेवक साईनाथ गिडगे यांनी प्रास्तविकात देऊन समस्यांचा उहापोह केला. नगरसेविका किरण शिंदे, ज्येष्ठ नेते बाबुराव ढाके, कृऊबा समितीचे माजी सभापती गंगाधर बिडगर, मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मच्छींद्र बिडगर, चांदवड पंचायत समितीचे सदस्य नामदेव गिडगे आदींसह जिल्ह्य़ातून मोठय़ा संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.