Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत ६१ उमेदवार रिंगणात
चाळीसगाव / वार्ताहर

 

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रथमच २० जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात उतरल्याने येत्या १ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नारायणदास अग्रवाल यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले होते. त्यांच्यातील सिनीयर कॉलेज कमिटीचे अध्यक्ष सुरेश स्वार हे सचिवपदाची महत्वाची जागा लढवत आहेत. ज्युनियर कॉलेज कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुभाष पूर्णपात्रे यांनी आ. साहेबराव घोडे व माजी सचिव वसंत चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वत:चे परिवर्तन पॅनल उभे केले आहे. डॉ. एम. बी. पाटील, प्रा. जी. टी. पाटील, प्रेमचंद खिवंसरा व स्वत: आ. घोडे परिवर्तन पॅनलमध्ये उमेदवार आहेत.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिव या चार जागा पदाधिकाऱ्यांच्या आहेत. १५ जागा व्यवस्थापकीय मंडळ सदस्य पदासाठी आहेत व एक जागा कर्मचारी प्रतिनिधीसाठी आहे. व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष नारायण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला उदेसिंग पवार व प्रदीप देशमुख यांचा पाठींबा प्राप्त झाल्याने ‘प्रगती पॅनल’मधील उमेदवारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अध्यक्षपदासाठी नेताजी सूर्यवंशी पुन्हा नशीब अजमावत आहेत. सहसचिव पदासाठी मु. रा. अमृतकार रिंगणात आहेत. उपाध्यक्ष व सचिवपदांसाठी चंद्रकांत ठोंबरे व डॉ. सुनील घाटे या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. सदस्यपदी अ‍ॅड. ज. मो. अग्रवाल, नारायण अग्रवाल, अ‍ॅड. प्रदीप अहिरराव, सुरेश चौधरी, गोपाळ दायमा, मिलींद देशमुख, मंगेश पाटील, भोजराज मुन्शी, उत्तमराव राखुंडे, आनंदा वाणी उभे आहेत.
कर्मचारी प्रतिनिधीपदासाठी सात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ही निवडणूक लढवित आहेत. जवळपास नऊ हजार मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील. स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १२ असून महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नसतानाही दोन महिला उमेदवार रिंगणात आहेत. सचिवपदी सुरेश स्वार स्वतंत्रपणे लढवित आहेत. स्वतंत्र उमेदवारांमध्येही प्राचार्य तानसेन जगताप, किसन जोर्वेकर, प्रदीप वैद्य, नंदकिशोर शुक्ल यांसारखे उमेदवार आहेत.