Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्र साजरी
प्रतिनिधी / नाशिक

 

त्र्यंबकेश्वरसह नाशिकमधील सोमेश्वर, कपालेश्वर तसेच उत्तर महाराष्ट्रातील विविध शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, प्रवचन व कीर्तनाचा गजर, महाप्रसादाचे आयोजन..महाशिवरात्रीनिमित्त हेच दृश्य सगळीकडे दिसत होते. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध संस्था तसेच मंडळांनी नियोजन केल्याचेही दिसून आले.
बारा जोर्तिलिंगामधील आद्य ज्योर्तिलिंग म्हणून त्र्यंबकेश्वरची गणना केली जाते. त्यामुळे या ठिकाणी दर्शन घेण्याकरिता भाविकांची सर्वाधिक गर्दी झाल्याचे दिसून आले. देशभरातील भाविकांनी आदल्या दिवसापासूनच रांगा लावल्याने मंदिर व्यवस्थापनाला विशेष व्यवस्था करावी लागली. देशातील सध्याची संवेदनशील परिस्थिती लक्षात घेत सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिरात प्रवेश करणाऱ्यांवर क्लोजसर्किट टीव्हीने लक्ष ठेवण्यात आले. तसेच मंदिराच्या आवारात भ्रमणध्वनि वापरावर बंदी घालण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी एस. टी. महामंडळाने नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर जादा बसगाडय़ा उपलब्ध करून दिल्या होत्या. नगरपालिकेने शहरात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यासोबतच स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पेशवेकालीन काळात बांधलेल्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना सकाळी दिगंबरबुवा काशिकर यांच्या प्रवचनाने सुरूवात झाली. त्यानंतर दुपारी पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. लक्ष्मीनारायण चौकातून निघणारी पालखी कुशावर्तावर नेण्यात आली. तेथे धार्मिक विधी झाल्यानंतर पालखी मंदिरात आणण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष के. डी. बोचे, उपाध्यक्ष रामरतन सारडा, पालिका मुख्याधिकारी विजय पगार, आदी उपस्थित होते. नाशिक शहरातील सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांबरोबर इतर शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गोदावरी नदीत स्नानासाठी बाहेरगावाहून मोठय़ा प्रमाणावर भाविक आल्याने त्यांच्या वाहनांनी गोदाकाठ फुलून गेला होता. धुळे, जळगाव, नंदुरबार भागातील मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी झाली होती.