Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

लोकनेता

 

नाशिकच्या भद्रकाली परिसरातील वावरे कुटुंबात शांतारामबापूंचा जन्म १६ ऑगस्ट १९२४ ला झाला. त्यांचे वडील कोर्टातील सामान्य वेतनाच्या नोकरीबरोबरच ठिकठिकाणी किरकोळ चिवडा विक्री करून आपला परिवार सावरण्याची तारेवरची कसरत करीत. अशा काटकसरीच्या जीवनसंघर्षांत बापूंच्या शिक्षणाचे धडे अपूर्णच राहिले. घरचा म्हशी पालनाचा व्यवसाय असल्याने बापूंचे बालपण व किशोरपण म्हशी चारायला नेणे व त्यांची गंगेत स्वच्छता करण्यातच बरेचसे गेले. शेती व्यवसाय सुद्धा त्यांच्या आवडीचा विषय, त्यासाठी शेतात काम करण्यात यथेच्छ रमणे, हा खऱ्या भूमिपुत्राला शोभणारा त्यांचा गुणही लक्षात घेण्यासारखा आहे. शेतीतील मातीत आपले हात कधीही मळू दिले नाहीत. पण मतांच्या जोगव्यासाठी स्वत:ला ‘भूमिपूत्र’ म्हणून मिरवून घेणाऱ्यांपैकी ते ‘कोरे करकरीत’ भूमिपूत्र नव्हते. मातीशी नाते सांगणारे व त्यासंबंधी, शेती अवजारे, गुरे-वासरे या सर्वाशी त्यांनी मन:पूत स्वत:ला जोडून घेतले होते.
सार्वजनिक जिवनात ते रमत असत. त्यामुळेच सामान्यांशी, उपेक्षितांशी त्यांचे वात्सल्याचे नाते होते. त्यांचा आत्मपिंडच सेवेसाठी होता. गोरगरीबांच्या मदतीसाठी त्यांनी सेवेचा, निरपेक्ष मार्ग स्वीकारला व आयुष्यभर अंगिकारला. दु:खितांना, पीडितांना त्यांनी माणूस प्रेमाचा दिलासा दिला. ते परीट घडीतील दरबारी कार्यकर्ते वा नेते कधीही नव्हते. जिल्ह्य़ात लोकप्रिय नेतृत्वाचे ते धनी समजले जात. दुधातुपावर पुष्ट झालेली पहिलवानी शरीरयष्टी असल्याने समाजविघातक गुंडा-पुंडांना त्यांचा धाक-दरारा वाटत असे. अन्यायाविरुद्ध आव्हान स्वीकारणारे बापू मैदान सोडून पळून जाणाऱ्यांपैकी नव्हते. समाजात सलोखा-एकोपा-भाईचारा कायम असावा अशा प्रसंगी त्यांना समाजाचे अनमोल सहाय्य त्यांनी गृहीतच धरलेले असे. शाळेतील गुरू फारसे लाभल नसले तरी जीवनानुभव हाच त्यांचा सर्वश्रेष्ठ गुरू होता. उण्यापुऱ्या ७४ वर्षांच्या आयुष्यात बापूंनी जिल्ह्य़ासाठी विशेषत: नाशिक नगरीसाठी भूषवलेली पदे व त्याव्दारा केलेल्या कामांची यादी खूपच मोठी आहे. विविध सत्तापदे मिळूनही त्यांच्यातील माणूसपण त्यांनी कधी लिलावात काढले नाही. १९५२ साली नगरपालिकेतील सदस्य शिक्षणमंडळात उपसभापीत नंतर सभापती, तीन वेळा नगरसेवक, १९६७ व १९८० अशा दोन वेळा आमदार, १९७७ इंदिरा काँग्रेस जिल्हा संस्थापक अध्यक्ष, मविप्र समाज संस्था अध्यक्ष, १९९२ व १९९३ सलग दोन वर्षे महापौर, मोहनमास्तर तालीम संघ संस्थापक अध्यक्ष, नाशिक तालुका विधायक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक, याशिवाय नागरी पतसंस्था, मराठा मंदिर, ग्राहक समिती अशा लोकजीवनाशी व गरजांशी संबंधित अनेक संस्थांच्या निर्मितीत बापूंचा पुढाकार होता. याशिवाय बापूंच्या पुढाकाराने मार्गी लागलेली अन्य कामांचीही यादी न संपणारी आहे. नाशिक जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्गाते, कश्यपी नदीवर महानगरपालिकेसाठी मालकीचे धरण बांधण्याचा निर्णय, सिडको महाविद्यालय स्थापनेसाठी डॉ. वसंत पवारांबरोबर ‘जेलभरो’ साठी केलेली तयारी, यशवंत मंडई, वाघाडीवर लक्ष्मण झुला, प्रत्येक वार्डात प्राथमिक शाळांच्या इमारती व ठिकठिकाणी व्यायामशाळा-समाजमंदिरांची बांधकामे..
अर्थात, खडतरेशी दोन हात करूनच निर्भयपणाने जीवनाची प्रकाशवाट शोधण्याचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागले. याच आव्हानांचे त्यांनी संधीत रुपांतर करून ध्येयवृत्ती व झुंझारवृत्ती संपादन केली. हेच त्यांचे भागध्येय होते. जनसेवेचे कंकण बांधून संकट ग्रस्तांसाठी ते आधारवड झाले. जात-पात-धर्मनिरहित त्यांचे जगणे आणि नडलेल्यांप्रती सवरेतोपरी सहकार्य मार्गदर्शन करतत ते जगले. त्यांचा शब्द, वडिलधारे म्हणून सर्व पक्षांतही ग्राह्य़ धरला जाई, तो या सेवेमुळेच. लोकप्रियतेसाठी लोकानुनय करणे ही सवंग-उथळ वृत्ती त्यांना अमान्य होती. पक्षनिष्ठा सेवेच्या आड आली तर ती झुगारण्याची हिंमतही ते दाखवित. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, इंदिरा गांधी, शरद पवार यांना ते मानत असत. अखेपर्यंत ते राजकारणात सक्रीय होते. तशातच खासदार निवडीच्या प्रचार सभेत ते कोसळले. मृत्यूदूताला त्यांचा पत्ता सापडला अन् ते परमेश्वर दर्शनाला कायमचे निघून गेले..
प्रा. वाल्मिक पाटील, नाशिक.
संपर्क - २५७४४२३.