Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जनस्थान पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी नाशिकमध्ये
कुसुमाग्रज स्मरण अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम
नाशिक, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ निसर्ग कवी ना. धों. महानोर यांना ज्येष्ठ प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. येथील महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून उद्योजक दत्तात्रय म्हैसकर, महापौर विनायक पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. १९९१ पासून देण्यात येणारा हा पुरस्कार याआधी विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल यांना देण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि महावस्त्र असे आहे. यंदाच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यापूर्वी ना. धों. महानोरांच्या कवितांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यामध्ये शुभदा तांबट, रागिणी कामतीकर यांच्यासह स्थानिक कलाकारांचा सहभाग असेल. कवी किशोर पाठक आणि शाम पाडेकर सूत्रसंचालन करणार आहेत. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत २७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत सायंकाळी सहा वाजता प्रतिष्ठानच्या सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्मरण यात्रेची सुरूवात जनस्थान पुरस्काराने होणार असून २८ फेब्रुवारी रोजी मराठी विज्ञान परिषद, खगोल मंडळ आणि पंचवटी लायन्स क्लबच्या सहकार्याने खगोल वर्षांनिमित्त खगोल प्रदर्शन, एक मार्च राजी पु. ल. देशपांडे यांच्या अभिजात साहित्याने सजलेला अरूण नलावडेंचा एकपात्री रंगतदार ‘गुण गाईन आवडी’ , दोन मार्च रोजी नाशिक येथील प्रा. गिरीश पिंपळे यांचा ‘भारताचा चांद्रविजय’ हा दृकश्राव्य कार्यक्रम, तीन मार्च रोजी अशोक उजळंबकर ‘बिनाका गीतमाला’, चार मार्च रोजी कवी इंद्रजित भालेराव यांचा ‘काव्यानुभव’, पाच मार्च रोजी ‘खुले काव्य संमेलन’, अंबरीष मिश्र यांच्या संवादासह संगीतकार रोशन यांनी स्वरबध्द केलेला ‘रहेना रहे हम’, आठ मार्च रोजी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने पुणे येथील सदानंद मोरे यांचे ‘संत तुकाराम’ तर १० मार्च रोजी डॉ. माधवी वैद्य यांचे ‘कुसुमाग्रजांची कविता’ या विषयावर व्याख्यान होईल. ११ मार्च रोजी कवी अशोक नायगावकर यांचा ‘मिश्किली आणि कविता’ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्रातर्फे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यवाह अ‍ॅड. विलास लोणारी यांनी दिली. पत्रकार परिषदेस माधव पाटील, लोकेश शेवडे या पदाधिकाऱ्यांसह विश्वास ठाकूर उपस्थित होते. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी मोफत आहेत.