Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आदिवासी पाणी उपसा योजनांसाठी नियम शिथिलीकरणाचे प्रयत्न - डॉ. गावित
नाशिक / प्रतिनिधी

 

आदिवासी भागात पाणी उपसा योजनांसाठी असलेले नियम शिथिल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले. शिक्षणाचे चांगले वातावरण निर्माण होऊन आदिवासींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सर्वसोयी युक्त अशा शासकीय आश्रमशाळेच्या व वसतीगृहाच्या इमारती राज्यात उभ्या केल्या जातील, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही गावित यांनी दिली.
नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत पेठ तालुक्यातील इनामबारी व बोरवठ येथील आश्रमशाळेच्या इमारतीचे आणि पेठ येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन तसेच आदिवासींना विविध योजनेतून साहित्य वाटप गावित यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेतंर्गत रुग्णवाहिकेचे उद्घाटनही गावित यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. ए. टी. पवार हे होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नरहरी झिरवाळ, अप्पर आयुक्त प्रकाश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत भारमल, पंचायत समितीचे सभापती भास्कर गावीत आदी उपस्थित होते.
आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. आदिवासींनी या योजनांचा लाभ घेवून आपला विकास साध्य करावा, तसेच मुलींनाही उच्च शिक्षण देऊन भविष्य उज्वल बनवावे, असे आवाहन त्यांनी केले. पुढील वर्षांपासून शासकीय आश्रमशाळेतील मुलामुलींना शालेय गणवेशाबरोबर आणखी दोन गणवेश दिले जातील. आदिवासी शेतकऱ्यांनी कमी पाण्यात अधिक क्षेत्र ओलिताखाली आणून आधुनिक पध्दतीने शेती करावी, उच्च शिक्षणाच्या सुविधा असलेल्या ठिकाणी ५५ हजार आदिवासी मुलामुलींची राहण्याची सोय वसतीगृहात करण्यात येणार असल्याची माहिती गावित यांनी दिली. यावेळी आ. नरहरी झिरवाळ यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत भारमल यांनी केले.