Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वांजुळपाणी प्रकल्पाच्या सर्वेक्षणातील अडचणी दूर- डॉ. आहेर
नाशिक / प्रतिनिधी

 

सुरगाणा तालुक्यातील वांजुळपाणी प्रकल्पाच्या सर्वेक्षणातील अडचणी दूर झाल्या असून या कामास आता गती मिळणार असल्याची माहिती तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दौलतराव आहेर यांनी दिली आहे. मांजरपाडा प्रकल्पावरून मध्यंतरी निर्माण झालेल्या वाद-विवादाच्या पाश्र्वभूमीवर वांजुळपाणी प्रकल्पाचा तोडगा मांडण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून येवला आणि कसमादे भागाला पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे.
वांजुळपाणी कामाच्या सर्वेक्षणाबाबत स्थानिक नागरिकांनी हरकती घेतल्याने काही दिवस हे काम थांबले होते. सर्वेक्षणाचे काम पुन्हा सुरू व्हावे याकरिता आपण उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर भुजबळ यांच्या दालनात सुरगाणा तालुक्यातील लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आ. जे. पी. गावित, आ. ए. टी. पवार उपस्थित होते. सुरगाण्यात सरासरी १२५ ते १५० इंच पाऊस पडत असला तरी आदिवासी भागासाठी त्याचा उपयोग होत नसल्याची खंत गावित यांनी व्यक्त केली. या भागात नवीन चार लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या बांधकामास नाशिक जिल्ह्य़ाचा अनुशेष नसल्याने परवानगी मिळत नाही. राज्यपालांकडून आदिवासी भागासाठी अनुशेष शिथील करण्यात यावा तसेच कोकण भवनकडे तालुक्यातील प्रलंबित लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. त्यानुसार जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे निश्चित झाले. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आदिवासी भागातील वांजुळपाणी या वळण योजनेचे काम मार्गी लागणार आहे. आदिवासी भागातील लघु पाटबंधारे योजनेची कामेही मार्गी लागणार असून वांजुळपाणी व मांजरपाडा या वळण योजनांमधून या भागालाही लाभ होणार असल्याचे डॉ. आहेर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मांजरपाडा व वांजुळपाडा प्रकल्पाची कामे एकाचवेळी सुरू केली जातील असे आश्वासन जलसंपदामंत्र्यांनी दिलेले आहे. बैठकीस आ. संजय चव्हाण, आ. उत्तमबाबा भालेराव, आ. दिलीप बनकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.