Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

युवक अपहरण प्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी
नाशिक, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

युवकाचे २५ लाख रूपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यास बंगल्यात डांबून ठेवणाऱ्या पाच जणांना आज येथील न्यायालयाने दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी अपहरण झालेल्या अमन चौधरी या महाविद्यालयीन युवकाची रविवारी गंगापूर पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने सुखरूप सुटका केली होती.
महात्मानगर परिसरातील रामकृष्ण भक्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अमनचे शुक्रवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने त्याचे वडील प्रमोद चौधरी यांनी शोधाशोध सुरू केली असता अमनचा मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे लक्षात आले. मध्यरात्री दोनच्या सुमारास चौधरी यांना एका व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधत २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. हादरलेल्या चौधरींनी गंगापूर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली. संशयितांकडून चौधरी यांना येणाऱ्या संदेशावरून त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी व गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तरित्या कारवाई करत सातपूर भागातील अशोकनगरमध्ये असलेल्या ‘पितृछाया’ या बंगल्यातून अमनची रविवारी सायंकाळी सुटका केली. या प्रकरणी मुख्य संशयित विक्रम सुदाम नागरे, रोशन हरिदास काकड (पिंपळगाव बहुला), कृपानंद हिराकांत मिश्रा (अशोकनगर), गुलाम गौस शेख बशीर (खडकाळी, नाशिक) व कमलाकर बाळासाहेब ह्य़ाळीज (अशोकनगर) या पाच जणांना अटक केली. यापैकी नागरे हा सराईत गुन्हेगार असून एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनही तो समाजात वावरत असल्याचे तपासात पुढे आले आहे. या पाचही संशयितांना आज येथील न्यायालयात उभे करण्यात आले.