Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सावंत महाविद्यालयातील चर्चासत्रात अणुकराराविषयी मंथन
नाशिक / प्रतिनिधी

 

अणुकरार म्हणजे काय, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होत आहे, याविषयी येथील जी. डी. सावंत महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेतंर्गत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात विचारविनिमय करण्यात आले.माजी निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेरूतकर यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. गोदावरी शिक्षण मंडळाचे सचिव अशोक सावंत, अध्यक्ष बी. जी. चौरे हे यावेळी उपस्थित होते. शेरूतकर यांनी अणुकराराचे समर्थन करीत त्याची पाश्र्वभूमी स्पष्ट केली. भारत आर्थिक महासत्ता होणार असेल तर आर्थिक शक्ती म्हणून प्रथम पुढे आले पाहिजे, त्यासाठी अणुकरार भारताला आर्थिक महासत्ता होण्यास मदत करणार आहे, असेही ते म्हणाले. डॉ. दिलीप गोटखिंडीकर यांनी अणुशक्ती म्हणजे काय, अणुबॉम्ब कसा तयार होतो, या प्रश्नाची उकल केली.
भारतीय राजकारणात पंडित नेहरूंच्या कारकिर्दीपासून अणुशक्तीचा पुरस्कार करण्यात आला आहे. पोखरण चाचणीनंतर भारताने आपले अणुशक्ती सिध्द केली.
मात्र सद्यस्थितीत देशातील वीज टंचाई लक्षात घेतली तर अणुशक्तीच्या साहाय्याने त्याच्यावर मात करता येऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. एस. एस. नाईक यांनी केले. देशाला अणु ऊर्जेशिवाय पर्याय नाही. अण्वस्त्र तंत्रज्ञानचे नवे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले असतांना ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत वीज पोहचविण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी नाईक यांनी विविध आकडेवारी देत वीज टंचाईस उत्तर देण्यास अणु करार कसा समर्थ आहे हे मांडले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वा. न. भेंडे, प्रा. मनिषा देशपांडे, प्रा. चंद्रकांत ढोके, प्रा. अक्षय बोराले, प्रा. एस. डी. आहेर आदी उपस्थित होते.