Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्र साजरी
प्रतिनिधी / नाशिक

त्र्यंबकेश्वरसह नाशिकमधील सोमेश्वर, कपालेश्वर तसेच उत्तर महाराष्ट्रातील विविध शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, प्रवचन व कीर्तनाचा गजर, महाप्रसादाचे आयोजन..महाशिवरात्रीनिमित्त हेच दृश्य सगळीकडे दिसत होते. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध संस्था तसेच मंडळांनी नियोजन केल्याचेही दिसून आले.

लोकनेता
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील वावरे कुटुंबात शांतारामबापूंचा जन्म १६ ऑगस्ट १९२४ ला झाला. त्यांचे वडील कोर्टातील सामान्य वेतनाच्या नोकरीबरोबरच ठिकठिकाणी किरकोळ चिवडा विक्री करून आपला परिवार सावरण्याची तारेवरची कसरत करीत. अशा काटकसरीच्या जीवनसंघर्षांत बापूंच्या शिक्षणाचे धडे अपूर्णच राहिले. घरचा म्हशी पालनाचा व्यवसाय असल्याने बापूंचे बालपण व किशोरपण म्हशी चारायला नेणे व त्यांची गंगेत स्वच्छता करण्यातच बरेचसे गेले.

जनस्थान पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी नाशिकमध्ये
कुसुमाग्रज स्मरण अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम
नाशिक, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ निसर्ग कवी ना. धों. महानोर यांना ज्येष्ठ प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. येथील महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून उद्योजक दत्तात्रय म्हैसकर, महापौर विनायक पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी पाणी उपसा योजनांसाठी नियम शिथिलीकरणाचे प्रयत्न - डॉ. गावित
नाशिक / प्रतिनिधी

आदिवासी भागात पाणी उपसा योजनांसाठी असलेले नियम शिथिल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले. शिक्षणाचे चांगले वातावरण निर्माण होऊन आदिवासींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सर्वसोयी युक्त अशा शासकीय आश्रमशाळेच्या व वसतीगृहाच्या इमारती राज्यात उभ्या केल्या जातील, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही गावित यांनी दिली.

वांजुळपाणी प्रकल्पाच्या सर्वेक्षणातील अडचणी दूर- डॉ. आहेर
नाशिक / प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील वांजुळपाणी प्रकल्पाच्या सर्वेक्षणातील अडचणी दूर झाल्या असून या कामास आता गती मिळणार असल्याची माहिती तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दौलतराव आहेर यांनी दिली आहे. मांजरपाडा प्रकल्पावरून मध्यंतरी निर्माण झालेल्या वाद-विवादाच्या पाश्र्वभूमीवर वांजुळपाणी प्रकल्पाचा तोडगा मांडण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून येवला आणि कसमादे भागाला पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे.

युवक अपहरण प्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी
नाशिक, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

युवकाचे २५ लाख रूपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यास बंगल्यात डांबून ठेवणाऱ्या पाच जणांना आज येथील न्यायालयाने दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी अपहरण झालेल्या अमन चौधरी या महाविद्यालयीन युवकाची रविवारी गंगापूर पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने सुखरूप सुटका केली होती.

सावंत महाविद्यालयातील चर्चासत्रात अणुकराराविषयी मंथन
नाशिक / प्रतिनिधी

अणुकरार म्हणजे काय, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होत आहे, याविषयी येथील जी. डी. सावंत महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेतंर्गत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात विचारविनिमय करण्यात आले.माजी निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेरूतकर यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. गोदावरी शिक्षण मंडळाचे सचिव अशोक सावंत, अध्यक्ष बी. जी. चौरे हे यावेळी उपस्थित होते.

व्दितीय नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन
नाशिक, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

व्दितीय नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती आयोजक मुकेश कणेरी यांनी दिली.प्रकाशन कार्यक्रमात कणेरी यांनी उपस्थितांना फिल्म फेस्टिव्हलच्या नियोजनाचा आराखडा सादर केला. या फेस्टिव्हलमुळे नाशिकसह चित्रपट उद्योगाला होणाऱ्या लाभासंदर्भातही त्यांनी माहिती दिली. फेस्टिव्हलला महाराष्ट्र शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. याप्रसंगी भूषण गगराणी, कृष्णकांत कुदळे, कुलदीप सिन्हा, अशोक बंटिया, रवी चौधरी, अ‍ॅड. शरद कुटे, मनोज पाचोरकर, भरत शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यस्तरीय आंतर तंत्रनिकेतन व्हॉलीबॉल स्पर्धेत नाशिक उपविजेता
नाशिक / प्रतिनिधी

सोलापूर येथे आयोजित राज्यस्तरीय आंतर तंत्रनिकेतन व्हॉलीबॉल स्पर्धेत नाशिकचा संघ उपविजेता ठरला. एस. इ. एस. तत्रंनिकेतनच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण १६ शासकीय व खासगी तंत्रनिकेतन संघांनी सहभाग घेतला. नाशिकच्या शासकीय तंत्रनिकेतन संघाचे व्यवस्थापक म्हणून प्रा. गणेश उज्वले यांनी पाहिले. विजेत्या संघाकडून राजेश पगार, विकास काळे, मोहित चांदवडकर, कुणाल पासे, सम्यक भालेराव, विशाल शेवाळे, रोहित तारडे, तेजस जगताप, यांनी उत्कृष्ठ खेळ केला. संघाला प्राचार्य डॉ. आर. एस. नायडू, प्रा. अनिल देशमुख, गणेश उज्वले प्रशासकीय अधिकारी हरिश्चंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांचा मेळावा
नाशिक / प्रतिनिधी

नगरपालिका कामगार-कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी येथील सीटू कामगार भवनात २८ फेब्रुवारी रोजी दुपारी बाराला नगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास सीटूचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड व नगरपालिका कामगार कर्मचारी समन्वय समितीचे सरचिटणीस सूर्याजी साळुंखे हे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील १७ लाख राज्य कर्मचाऱ्यांना शासनाने सहावा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र नगरपालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याबात कोणताही निर्णय न घेता महाराष्ट्र शासन भेदभाव करीत आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. कराड, अशोक लहाने यांनी नगरविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली. राज्य मंत्रिमंडळात याबाबत चर्चा करून या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या पाश्र्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. मेळाव्यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पोपटराव सोनवणे, एन. डी. कुंभार्डे, रघुनाथ बैसाणे, राजु गरूड, गौतम पानपाटील, शाम गोसावी, रामदास पगारे, दिनकर सोनवणे, मिलींद ब्राह्ममे, संजय राजपूत, आरिफ शेख, अशोक लहाने आदींनी केले आहे.

वैद्यकीय सीईटी रद्द न करण्याची अभाविपची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

वैद्यकीय परीक्षेसाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा रद्द केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी एका मुलाखतीत दिली होती. या वर्षी फक्त तिसऱ्या व चौथ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू केला जाणार आहे. तसे झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. परीक्षेला काही महिनेच बाकी असताना पूर्वसूचना न देता वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे तिसऱ्या व चवथ्या वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परीक्षा रद्द झाल्यास आर्थिक व्यवहार जास्त वाढतील. वैद्यकीय शिक्षणात गुणवत्ता राहणार नाही. वैद्यकीय परीक्षेमुळे विद्यार्थी योग्य पध्दतीने निवडले जात असून गरीब व हुशार विद्यार्थ्यांनाही यामुळे प्रवेश मिळत आहे. ही परीक्षा रद्द केल्यास अनेक पालक पैसे भरुन आपल्या मुलाला प्रवेश देतील, त्यामुळे ही परीक्षा रद्द करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. सरकारने यापूर्वीच पीजी मेडिकलच्या जागा दोन हजारवरून ४११ केल्या होत्या. यामुळे खासगी महाविद्यालयांना मागणी वाढली होती. अगोदरच देशात लोकसंख्येच्या तुलनेत तज्ञ डॉक्टराचे प्रमाण कमी आहे. यामुळे पुढील काळात वैद्यकीय क्षेत्रातील गरज लक्षात घेता असा निर्णय घेऊ नये अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.