Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

जीवनाचा अर्थ सांगणारी केळी
इझाबेला ही पर्यटनाची खूप आवड असणारी स्त्री होती. तिच्या पर्यटनामध्ये एकदा तिने नेपाळला भेट दिली. तिथे एका बौद्ध भिक्षूशी तिची गाठ पडली. बोलता बोलता त्याने त्याच्याजवळील एक पिशवी उघडली आणि त्यातून काही केळी बाहेर काढली आणि इझाबेलाला तो म्हणाला, ‘‘ही केळी जीवनाचा अर्थ आपल्याला समजावून सांगतात हे तुला माहीत आहे का?’’
इझाबेला त्याच्या बोलण्याने बुचकळ्यात पडली.

धनगर समाज आर्थिकदृष्टय़ा उद्ध्वस्त - डांगे
मनमाड / वार्ताहर

धनगर समाज आर्थिकदृष्टय़ा उद्ध्वस्त झाला आहे, आमचे उद्योगधंदे नाहीत, आमही शिकलो नाही एकूण निरक्षरतेपैकी २७ ते २८ टक्के निरक्षरता धनगर समाजामध्ये असल्याने समाजाची प्रगती कशी होणार असा सवाल माजी मंत्री आण्णा डांगे यांनी येथे केला. येथील गुरू गोविंदसिंग हायस्कूल समोरील स्टेडियमवर आयोजित धनगर समाजाच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक मधु शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख संयोजक व आयोजक नगरसेवक साईनाथ गिडगे यांनी स्वागत केले. महाराष्ट्रात एक कोटी १० लाख इतक्या संख्येने असलेल्या या समाजाला प्रथम धोरण निश्चित करून काम करावे लागणार आहे.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत ६१ उमेदवार रिंगणात
चाळीसगाव / वार्ताहर

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रथमच २० जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात उतरल्याने येत्या १ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नारायणदास अग्रवाल यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले होते. त्यांच्यातील सिनीयर कॉलेज कमिटीचे अध्यक्ष सुरेश स्वार हे सचिवपदाची महत्वाची जागा लढवत आहेत. ज्युनियर कॉलेज कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुभाष पूर्णपात्रे यांनी आ. साहेबराव घोडे व माजी सचिव वसंत चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वत:चे परिवर्तन पॅनल उभे केले आहे. डॉ. एम. बी. पाटील, प्रा. जी. टी. पाटील, प्रेमचंद खिवंसरा व स्वत: आ. घोडे परिवर्तन पॅनलमध्ये उमेदवार आहेत.

नंदुरबार नगरपालिकेतर्फे एमएस-सीईटी मोफत मार्गदर्शन वर्ग
नंदुरबार / वार्ताहर

आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएस सीईटी मार्गदर्शन वर्गापासून दूरच राहावे लागते. मात्र नगरपालिकेने अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याकरिता एमएस सीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. योग्य मार्गदर्शन आणि सरावाने ही परीक्षा विद्यार्थ्यांना सोपी जाऊ शकते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मोठमोठय़ा शहरांत चालणाऱ्या महागडय़ा वर्गाना प्रवेश घेणे आर्थिकदृष्टय़ा शक्य नसते. या गोष्टीची गांर्भीर्याने दखल घेऊन नगरपालिका व महिला आणि बालकल्याण समितीतर्फे १५ मार्चपासून प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे सहकार्य लाभणार आहे. वर्गासाठी पालिकेच्या प्रशासन आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष शिरीष चौधरी, मुख्याधिकारी शिंदे यांनी केले आहे.

..तर ‘मविप्र’ मध्ये मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व
सटाणा / वार्ताहर

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या संचालक मंडळाने मनात आणल तर मयत सभासदांच्या वारसदारांना सभासदत्व बहाल करू शकतात, परंतु तरूण, आक्रमक मंडळी सभासद झाली तर संस्था चालकांना धारेवर धरेल, या भीतीपोटी त्यांना सभासद करून घेतले जात नाही, असा आरोप संस्थेचे माजी सभापती आ. प्रतापदादा सोनवणे यांनी केला आहे. मयत सभासदांच्या वारसदारांना सभासद करून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या संदीप वाघ यांच्या भेटीसाठी व त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आ. सोनवणे आले होते. अशा व्यक्तींना सभासद करून घ्यावे, असा ठराव एक नव्हे तर दोन वेळा सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र हा हक्क संस्थाचालक डावलत असल्याबद्दल खेद आहे. या संदर्भात जनजागृती होणे गरजेचे असल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले. यावेळी मयत सभासदांच्या वारसांशी संपर्क साधून जिल्हा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वाघ यांच्या उपोषणाची संस्था चालक दखल घेणार नसतील तर यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण, तालुका प्रमुख लालचंद सोनवणे, नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांनी दिला आहे. यावेळी के. एस. सोनवणे, मधुकर सोनवणे, दत्तू सोनवणे आदींसह समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रेल्वे कार्यशाळेतील कामगारांचे आंदोलन
मनमाड / वार्ताहर

येथील रेल्वे कार्यशाळेतील लोहार शॉप विभागात प्रशिक्षणाच्या नावाखाली कामगारांची बदली करून हा विभाग बंद करण्याचा आदेश प्रशासनाने काढल्याच्या निषेधार्थ नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने आंदोलन केले. कामगारांनी मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. येथील कार्यशाळेत रेल्वे पूल तयार केले जातात. रेल्वे प्रशासनाने कारखान्यातील जी. एस. एस. विभाग बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या कारखाना शाखेने विरोध केला होता. परंतु पुन्हा लोहार शॉपच्या कर्मचाऱ्यांची इतर विभागात प्रशिक्षणाच्या नावाखाली बदली करून सदर लोहार शॉप बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या विरोधात मोर्चाच्या स्वरुपात कामगारांनी कार्यालयावर आंदोलन केले. प्रशासनाने निवेदन स्वीकारून उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे कामगारांनी जोरदार घोषणाबाजी झाली. कारखाना प्रबंधक उच्चस्तरावर चर्चेसाठी जाणार असून यानंतर निर्णय होईल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली. शाखेचे अध्यक्ष उत्तम गांगुर्डे यांचे भाषण झाले सदर विभाग बंदचे आदेश परत न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा युनियनने दिला आहे.

जात वैधता प्रमाणपत्रांचे विद्यार्थिनींना वाटप
जळगाव / वार्ताहर

शासन आणि प्रशासनाच्या कारभाराला लालफितीचा कारभार म्हणून संबोधले जाते, यालाच फाटा देऊन त्या कारभाराला जात पडताडणीच्या कामातून मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त महसूल आयुक्त सुभाषचंद्र येवले पाटील यांनी केले. येथील नंदिनीबाई वामनराव मुलींचे महाविद्यालय व जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्रांचे विद्यार्थिनींना प्रतिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य के. एन. गवळे, सदस्य सचिव सुरेश वळवी, प्राचार्य एस. एम. महाजन, उपप्राचार्य व्ही. एम. पाटील उपस्थित होते. बारावीच्या परीक्षेपूर्वीच जाती वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयात देण्यात येत आहे. वैधता प्रमाणपत्र नसल्याने आपला पाल्य अभिायंत्रिकी अथवा वैद्यकीय शाखेत प्रवेशापासून वंचित राहिला असे पालकांना वाटता कामा नये यासाठी यापुढे या कामात जास्तीत जास्त गतीमानता, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय समाज कल्याण अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुरेश वळवी यांनी बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पालकांची होणारी धावपळ टाळता यावी यासाठी परीक्षेच्या निकालापूर्वीच जाती वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात येत असल्याचे सांगितले. समिती सदस्य के. एन. गवळे यांनी यावेळी समितीची रचना, कार्य, समितीला असलेल्या वैधानिक दर्जाची माहिती दिली.

‘झुंबराबिगार’ कथा संग्रहाचे प्रकाशन
जळगाव / वार्ताहर

समाज बदलविण्याची क्षमता आत्मशोधाच्या प्रक्रियेपासून सुरू होते, तसेच सामाजिक पुनर्रचना हा दलित साहित्याचा अविभाज्य भाग असून माणूसपण नाकारलेल्या, संपत्तीपासून वंचित ठेवलेल्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच आत्मबोधाची जाणीव करून दिली हे ‘झुंबराबिगार’ कथासंग्रहात वाचायला मिळते, असे मत अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केले.
येथील व. वा. वाचनालयाच्या सभागृहात रा. से. साळुंखे लिखीत ‘झुंबराबिगार’ कथा संग्रहाचा प्रकाशन समारंभ डांगळे यांच्या हस्ते झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. कवी डी. बी. जगत्पुरीया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केवळ मानव मुक्तीचा लढा, हिंदू कोडबिल यातूनच डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेता येत नाही. डॉ. आंबेडकर हे जागतिक स्तरावरचे फार मोठे व्यक्तीमत्व होते हे त्यांच्या अफाट ज्ञानावरून लक्षात येते. दलित मंडळी शिक्षण घेऊन प्रगती करू लागली ही त्यांच्या कार्याची फलश्रुती असल्याचे डांगळे म्हणाले. जगत्पुरीया यांनी साहित्य म्हणजे स्वत:ला तपासणे होय असे सांगाताना झुबराबिगार कथासंग्रह आंबेडकर वादाच्या कसोटीला उतरणार आहे. साहित्य हे जीवन उन्नत करणारे असते असेही ते म्हणाले. प्रास्तविक मिलींद बागूल यांनी, परिचय जयसिंग वाघ यांनी, सूत्रसंचलन बापूराव पानपाटील यांनी तर आभार सुमित्र अहिरे यांनी मानले.

वीज कंपनीच्या विभागीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा
सटाणा / वार्ताहर

महावितरणकडून सटाणा विभागात यापुढे वीजेचे शून्य भारनियमन करण्यात आले तर कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल, अशा इशारा आ. संजय चव्हाण यांनी दिला. तालुक्यात शून्य भारनियमन त्वरित रद्द करावे व इतर १९ प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी चव्हाण यांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी हजारो वीज ग्राहक, शेतकरी उपस्थित होते. महावितरण विरोधातील घोषणांनी परीसर दणाणून गेला. नाशिक मंडल कार्यालयाचे कार्यकारी अभियंता ए. एस. तायडे यांनी यावेळी आंदोलकांना लेखी हमी दिली. वीजेचे शून्य भारनियमन सटाणा विभागात होणार नाही, शेतीसाठी आठ तास असलेला विद्युत पुरवठा चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्री देता येईल, ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठा तसेच विद्युत बिलांचा हप्ता करून भरण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, स्थानिक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रणाली सुधारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, बागलाण ग्रेप कोल्ड स्टोअरेजच्या व्होल्टेजचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल, परीक्षा कालावधीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे या हमीपत्रात म्हटले आहे. यावेळी वीज ग्राहक व शेतकऱ्यांनी गाऱ्हाणी मांडली. रोहित्र जळाल्यानंतर शेतकऱ्यांकडून वर्गणी जमा करून मोठय़ा प्रमाणात कंपनीचे कर्मचारी रक्कम वसूल करतात, अशी तक्रार करण्यात आली. तर निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विद्यमान सरकार घालवायचे षडयंत्र महावितरणकडून रचले जात असल्याची शंका डॉ. विलास बच्चाव यांनी व्यक्त केली.

चांदवड तालुक्यात घरपोच धान्य वितरण योजना सुरू
चांदवड / वार्ताहर

तालुक्यातील गुऱ्हाळे व मालसाणे येथे अपर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या आदेशानुसार घरपोच धान्य वितरण योजनेचा शुभारंभ तहसीलदार जे. सी. निकम, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माधवराव जाधव यांच्या हस्ते झाला. यावेळी उपसरपंच हरिभाऊ जाधव, नामदेव शिंदे, पुरवठा विभागाचे के. डी. गांगुर्डे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कासलीवाल यांनी केले. तसेच गुऱ्हाळे येथे घरपोच धान्य वितरण योजनेचा शुभारंभ तहसीलदारांसह राजाराम भवर, संपत भवर, यांच्या उपस्थितीत झाला.

मनमाड पालिका कर्मचाऱ्यांची निदर्शने
मनमाड / वार्ताहर

सहावा वेतन आयोग, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेत तीन वेळा पदोन्नती, घरभाडे आणि वाहतूुक भत्यांची नवीन सुधारित रचना केंद्राप्रमाणे लागू करावी, केंद्र सरकारप्रमाणे सहावा वेतन आयोग राज्य सरकारी कामगारांना त्वरित लागू करावा आदी मागण्यांसाठी येथील नगरपालिकेतील सीटू कामगार संघटनेतर्फे पालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष गणेश धात्रक, उपनगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांना निवेदन देण्यात आले. नगरसेवक बब्बू कुरेशी, सुनील गवळी, संतोष बळीद आदी उपस्थित होते.