Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

प्रपंचाचा रामरगाडा सांभाळत असताना ‘पीएसआय’ चा गड सर !
पिंपरी, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

‘अगदी सर्वसाधारण महिलांप्रमाणे प्रपंचाचा रामरगाडा म्हणजेच चूल-मूल सांभाळून गृहिणी ते फौजदार असा प्रवास मोठय़ा जिद्दीने पूर्ण केला. माझ्या स्वप्नांना आई, सासू, पतीने बळ दिल्याने ‘पीएसआय’पर्यंत झेप घेता आली,’ सांगत होत्या नुकत्याच फौजदार परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दीपाली नवीनचंद्र बोऱ्हाडे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने कृतकृत्य झाल्याची त्यांची भावना होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या फौजदार परीक्षेत त्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या आहेत. यंदा या परीक्षेत ५५० उमेदवारांची निवड झाली. त्यातील ८२ महिला उमेदवारांपैकी दीपालीचा क्रमांक ५६ वा आहे. त्यांच्या जिद्दीची रोचक कथा अन्य महिलांसाठीही एक आदर्श पथ ठरेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत व शारीरिक चाचणी अशा पातळ्यांवर उमेदवार निवडले जातात. दीपाली पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्यानंतरच्या शारीरिक चाचणीत गोळाफेक, चालणे व धावणे अशा क्रीडा प्रकारांतही त्यांनी मोठय़ा जिद्दीने मजल गाठली. यात १०५ गुण मिळणे अनिवार्य असते. त्यापैकी पहिल्या धावण्याच्या प्रकारात २०० मीटर अंतर ठराविक वेळेत पूर्ण करायचे असते, त्याप्रमाणे गुण मिळतात. पण दीपालीच्या दुर्दैवाने त्यांना या प्रकारात ८० पैकी शून्य गुण मिळाले. अशीच गत झालेल्या इतर मुलींनी परीक्षा सोडून दिली. पण त्यांनी हार मानली नाही. पुढील प्रकारात तिने १२० पैकी १०५ गुण मिळवून दाखविले. त्यांच्या या जिद्दीलाच सकारात्मक मानून परीक्षकांनी त्यांची निवड केली. कारण कठीण परिस्थितीतही हार न मानता यश खेचून आणण्याचे वैशिष्टय़ त्यांनी दाखविले.
राजगुरुनगरजवळील दोंदे या गावच्या दीपाली ढोले यांचे कृषी पदवी अभ्यासक्रमात शेवटच्या वर्षांत असतानाच आंबेगाव तालुक्यातील शिनोली गावच्या नवीनचंद्र बोऱ्हाडे यांच्याबरोबर लग्न झाले. पतीने प्रोत्साहन दिल्याने त्यांनी पुढचा अभ्यासक्रम जिद्दीने पूर्ण केला. बोऱ्हाडे यांनी स्वत: लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती, मात्र त्यात त्यांना यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पत्नीला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्या शुभेच्छाच पुढे दीपाली यांच्या कामी आल्या. या निवडीमागे आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे ज्या नोट्स नवीनने काढल्या होत्या त्याच दीपाली यांनाही मार्गदर्शक ठरल्या. त्यामुळे त्यांनी चार-पाच वर्षांच्या खंडानंतरही अभ्यासक्रम पूर्ण केला. स्वत:चा स्वत: अभ्यास करताना पतीचे मार्गदर्शन, सासूबाईंचे सहकार्य आणि माहेरकडूनही आईचे पाठबळ मिळाल्यानेच हे नेत्रदीपक यश मिळाल्याचे दीपाली आवर्जून सांगतात माझ्या चार वर्षांच्या मुलीचा सांभाळ केल्याने अभ्यास व क्लाससाठी सलग बारा-बारा तास वेळ देता आला, असे सासूबाईंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सांगितले.
खरेतर, दीपालीच्या माहेरची पाश्र्वभूमी शेतकरी कुटुंबाची. वडील प्रख्यात वकील होते, पण दीपाली आठ वर्षांची असतानाच वारले. पण त्यामुळे खचून न जाता तिच्या आईनेही मनाशी निग्रह केला. त्यामुळे दीपाली व तिच्या भावानेही आईची इच्छा प्रमाण मानून अभ्यासात कायम अव्वल स्थान मिळविले
. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावाकडेच झाले, पण पहिला क्रमांक दोघा भावंडांनी कधी सोडला नाही. आज दीपाली फौजदार, तर तिचा भाऊ एक अभियंता आहे. तिची पाच वर्षांची कन्या निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीत शिशूवर्गात शिकते आहे.
‘पीएसआय’ या शब्दाला एक वेगळे वजन आहे. किरण बेदी, मीरा बोरवणकर यांच्याप्रमाणे क्लास वन अधिकारी बनायचे ध्येय बाळगून आहे. पती स्वप्न दाखवतो व मी ते पूर्ण करते. प्रयत्न, चिकाटी असेल तर आपण खूप काही गोष्टी साध्य करू शकतो, असे सांगताना, ध्येयाकडे वाटचाल करण्याची आपली तीच जिद्द कायम आहे, हेच त्या सांगतात.