Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मंडई परिसरामध्ये एका तरुणाचा खून
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

सदाशिव पेठेत दोनच दिवसांपूर्वी भरदिवसा खून झाल्याच्या खळबळजनक घटनेनंतर, आज सकाळी मंडई परिसरामध्ये एका तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यावर सत्तूरने वार करून तरुणाचा खून केला असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.
मंडई येथे फूलबाजारातील गाळा क्रमांक ६५६च्या बाजूला एक मृतदेह आढळल्याची खबर पोलिसांना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मिळाली. मृतदेहाजवळ पोलिसांना एक ओळखपत्र सापडले. त्यावर मिळालेल्या नाव व पत्त्यावर चौकशी केल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. रविवार पेठेत राहणाऱ्या व अंदाजे २५-२८ वय असलेल्या केशव रमाकांत पांडे याचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संग्रामसिंह निशानदार, विश्रामबाग ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस.बी. मुळे आदींचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
निरीक्षक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंडईतील फूलबाजारात एका गाळ्याजवळ पांडे याचा मृतदेह आढळून आला. पांडे याच्या डाव्या कानावर सत्तूर या शस्त्राने वार झाल्याचे, तसेच डाव्या हाताच्या मनगटाचे हाड तुटले होते.
हल्लेखोरांनी वापरलेला सत्तूर पांडे याच्या मृतदेहाखालीच पोलिसांना सापडला. महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वानवडी येथील एका शाळेमध्ये पांडे हा शिपाई म्हणून काम करीत होता. पांडे याला दारू पिण्याचे व्यसन होते व काल (दि.२३) सकाळी नऊला घराबाहेर पडल्यानंतर तो बेपत्ता झाला होता.’
सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेसमोर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास बळीराम गायकवाड या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून झाला होता. गायकवाड याच्या मारेकऱ्यांना पकडण्यात विश्रामबाग पोलिसांना चोवीस तासात यश आले; परंतु त्यानंतर लगेचच आज सकाळी मंडईतील खुनाचा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र गायकवाड याच्या खूनप्रकरणाचा व पांडे याच्या मारेकऱ्यांचा काही संबंध असल्याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. त्यामुळे या दोन घटना वेगवेगळ्या असून, त्यांचा एकमेकांशी संबंध जोडू नये, असे जाधव म्हणाले.
‘पांडे याचा मृतदेह वैद्यकीय उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, मंडई परिसरातील गाळेधारक, तसेच त्याच्या परिचयातील लोकांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे,’ अशी माहिती निरीक्षक जाधव यांनी दिली. जाधव या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. वैद्यकीय अहवालानुसार, रॅम्बो चाकूने पांडे याच्यावर वार झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे.