Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

साडेतीन हजार वाहनचालकांवर ‘लेन’ तोडल्याबद्दल कारवाई
पुणे, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

‘लेन’ शिस्तीचा भंग करणाऱ्या सुमारे साडेतीन हजार वाहनचालकांवर गेल्या तीन दिवसात वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून सुमारे साडेतीन लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.
शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी शनिवारपासून ‘लेन कटिंग’बाबत कारवाई करण्यास सुरूवात केली. ‘लेन कटिंग एन्फोर्समेंट ड्राइव्ह’ या मोहिमेनुसार उजवीकडे वळण्यासाठी मधल्या लेनमधून येणारी वाहने तसेच सरळ जाण्यासाठी उजव्या लेनमधून जाणाऱ्या वाहनचालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,‘‘बऱ्याच वाहनचालकांना ‘लेन कटिंग’बाबतचा निर्णय माहित नाही. त्यामुळे काहीजणांकडून कारवाईस विरोध होत आहे, मात्र बहुतांश नागरिक वाहतुकीच्या नियमांचा आदर राखून दंड भरत आहेत. लेन कटिंगसाठी प्रत्येकी शंभर रुपये दंडानुसार, शनिवारी एक हजार अडीचशे, रविवारी नऊशे तर आज (सोमवारी) एक हजार वाहनचालकांवर ही कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी बुधवारी (दि. १८) ५६८ वाहनचालकांवर या मोहिमेच्या प्रायोगिक अंमलबजावणीदरम्यान कारवाई करण्यात आली होती.’’
‘‘प्रामुख्याने गर्दीच्या वेळी म्हणजेच सकाळी व सायंकाळी ‘लेन कटिंग’चे प्रमाण अधिक आहे. या नियमाची माहिती नागरिकांना होण्यासाठी काही दिवस जातील. त्यामुळे येत्या महिन्याभरात वाहतुकीला ‘लेन’ची शिस्त लागल्याचे चित्र पाहावयास मिळेल,’’ असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वाहनचालकांना ‘लेन’ची शिस्त लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लेन कटिंग करून जाणाऱ्या एखाद्या वाहनामुळे वाहतुकीच्या मुख्य प्रवाहाला अडथळा निर्माण होतो व परिणामी वाहतूक कोंडी आणि नियमांचे उल्लंघन करण्याची वृत्ती वाढते. मात्र प्रत्येक रस्त्यावर ‘लेन कटिंग’बाबत वाहनचालकांवर लक्ष ठेवणे वाहतूक शाखेकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे शक्य नाही. त्यामुळे प्रथम ही मोहीम शहरातील प्रमुख चौकांमध्ये राबविण्यात येत आहे. ‘वाहतूक व्यवस्थेतील काही कारणांमुळे ज्ञानेश्वर पादुका चौकासारख्या काही चौकांमध्ये या मोहिमेची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलीस सौम्य भूमिका घेत असून, अन्यत्र मात्र वाहनचालकांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी ‘लेन’ची शिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.