Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

महापूजा, महाआरती, रुद्राभिषेकाने महाशिवरात्र उत्साहात
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

लघुरुद्राभिषेक, महाआरती, होमहवन, भजन, जप आदी धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचा उत्सव आज शहरातील विविध शिवमंदिरांमधून मोठय़ा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये भक्तांना खिचडी व दुधाचा प्रसादही देण्यात येत होता.
शहरात अनेक प्राचीन शिवमंदिरांमध्ये प्रतिवर्षी महाशिवरात्र धार्मिक कार्यक्रमांनी साजरी केली जाते. पाषाण- सोमेश्वरवाडी येथील ऐतिहासिक मंदिर, तसेच पाताळेश्वर मंदिर, शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, शुक्रवार पेठेतील रामेश्वर मंदिर, सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिर, रविवार पेठेतील सोमेश्वर मंदिर, धायरी येथील धायरेश्वर मंदिर, येरवडय़ातील तारकेश्वर मंदिर यासह अनेक शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरांमध्ये दिवसभर अभिषेक, पूजा, जप असे कार्यक्रम सुरू होते.
कसबा पेठेतील प्राचीन शिवमंदिरात ‘सपिंडय़ा महादेव उत्सव समिती’तर्फे सकाळी लघुरुद्राभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. येणाऱ्या सर्व भक्तांना साबूदाणा खिचडी, दूध, केळी असा प्रसाद देण्यात येत होता. सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विजय मरळ, तसेच शिरीष गायकवाड, महेश सोळंकी, विजय राडे, केदार सरताळे, गणेश जाधव, सचिन जावळकर, कुमार चव्हाण, दादा पायगुडे, मनोज धुमाळ यांनी उत्सवाचे संयोजन केले.
‘श्री साईबाबा पालखी उत्सव समिती’च्या वतीने महाशिवरात्र उत्सव ‘पालखी भवन’ येथे साजरा करण्यात आला. या वेळी साईपादुकांना लघुरुद्राभिषेक, तसेच उसाच्या, दुधाच्या व फळांच्या रसाने महाअभिषेक करण्यात आला. विष्णुसहस्रनाम पाठाचाही कार्यक्रम करण्यात आला. श्रीमती मंगलाताई बोकिल, तसेच सदाशिव नलावडे, सूर्यकांत कडू, बजरंगलाल आगरवाल, व्ही. टी. पवार, समितीचे कार्याध्यक्ष मंदार शहाणे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा फुले (गंज) पेठेतील क्रांतिवीर लहुजी वस्ताद तालीम मंडळातर्फे पिंपळेश्वर येथील शिवमंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संजय शेडगे, उमेश फोंडगे, विकास थोरात, बाळासाहेब लांडगे, गणेश गाडे, लक्ष्मण गाडे आदींनी संयोजन केले.
भव्य मिरवणूक
नारायण पेठेतील भरत मित्र मंडळाने आयोजित केलेल्या महाशिवरात्र उत्सवाची सांगता भव्य मिरवणुकीने झाली. सजवलेल्या रथात शंकराची मूर्ती ठेवण्यात आली होती. बँड व ढोल लेझीमची पथके, आकर्षक चित्ररथ, भजनी मंडळे आदींचा सहभाग मिरवणुकीत होता. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, तसेच रोहित टिळक, महेश वाघ, राजेंद्र पंडित, राजू लवाटे, कराडके स्वामी, मदन गोगावले, यशवंत पवार, अनिल येनपुरे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
रेसकोर्स जवळच्या श्री समर्थ गोपालस्वामी महाराज मठातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष प्रसाद केदारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. भक्तीसंगीत, भजन, होमहवन आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. लष्कर भागातील राजेश्वर तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राजू श्रीगीरी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रास्ता पेठेतील शिवरकर मळा येथील प्राचीन भोलेनाथ मंदिरात सकाळी शिवरकर कुटुंबीयांतर्फे अभिषेक करण्यात आला. किशोर शिवरकर, तसेच सुरेश, नितीन, गणेश, आनंद, प्रभाकर या शिवरकर बंधुंनी उत्सवाचे संयोजन केले.
बेलाच्या रोपांचे वाटप
गिरमे फार्म गार्डन सेंटरच्या वतीने पाताळेश्वर येथे पाचशे बेलाच्या रोपांचे वाटप भाविकांना करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कार्याध्यक्ष अशोक गोडसे आणि के. के. गिरमे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. बेलाची रोपे घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. गेली पंधरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. यापुढेही इच्छुकांना गिरमे फार्म, बाणेर येथून बेलाची रोपे देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे गिरमे यांनी यावेळी जाहीर केले. महाशिवरात्री निमित्त एम. एस. विर्दी फाउंडेशनतर्फे अपंग विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मनजितसिंह विर्दी, भारत शेलार, राजेश विश्वकर्मा, सुनील अरोरा, राहुल अरोरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
रसाच्या गुऱ्हाळांचा प्रारंभ
प्रतिवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी रसाच्या गुऱ्हाळांचा प्रारंभ केला जातो. यंदाही शहरातील बहुतेक रसवंती गृह आजच्या मुहुर्तावर सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत रसवंती गृहांमध्ये रस पिण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती.
पीएमपीतर्फे जादा गाडय़ा
पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळातर्फे सोमेश्वरवाडी, बनेश्वर, पाषाण, नीलकंठेश्वर, धायरेश्वर, घोरावडेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे व पिंपरीतून आज दिवसभर जादा गाडय़ा सोडण्यात आल्या. या सेवेला भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.