Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जेजुरीतील ऐतिहासिक गोमुखाच्या पायऱ्या तोडल्याने तीव्र संताप
जेजुरी, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

 

श्रीक्षेत्र जेजुरीतील ऐतिहासिक गायमुखामध्ये मार्तंड देवस्थानने धर्मशाळेच्या ४८ खोल्या असणाऱ्या तीनमजली इमारतीचे बांधकाम सुरू केल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. मुळात या धर्मशाळेला बऱ्याच नागरिकांचा विरोध असून ऐतिहासिक गोमुखाच्या पायऱ्या काढून तेथे बांधकाम होत असल्याने अनेकजणांनी संताप व्यक्त केला आहे.
या ऐतिहासिक गायमुखाचे जतन करावे, दुसरीकडे धर्मशाळा बांधावी, अशी मागणी पूर्वी शिवसेनेने केली होती. परंतु भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने ही जागा योग्य असल्याचे सांगून देवस्थानने तेथे बांधकाम सुरू ठेवले आहे.
या गायमुखाची रचना कुंडासारखी असून, दगडी बांधकाम आहे. १७४० मध्ये याचे बांधकाम झाले असून, भाविक स्नानासाठी याचा उपयोग करीत. मात्र गेल्या १०० वर्षांपासून ही वास्तू पडूनच आहे. १९८५ मध्ये मार्तंड देवसंस्थानने धर्मशाळेसाठी हे गायमुख खरेदी केले. तत्कालीन विश्वस्तांच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते धर्मशाळेच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. परंतु आजपर्यंत तेथे धर्मशाळा उभी राहिलेली नव्हती.
सध्याच्या विश्वस्त मंडळाने येथे भाविकांच्या सोयीसाठी धर्मशाळेचे बांधकाम सुरू केल्याने नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. गायमुखाचे प्राचीन बांधकाम काढण्यास इतिहासप्रेमींचा विरोध आहे. गायमुखातील पायऱ्या काढून तेथे कॉलम उभारण्यासाठी खड्डे घेण्यात येत आहेत. मार्तंड देवसंस्थान ट्रस्टने याबाबत भाविकांच्या सोयीसाठी जेजुरीत धर्मशाळा बांधण्याची आवश्यकता आहे, या गायमुखाचा वापर पूर्वी कचराकुंडीसारखा होत होता, तेथे आता ४८ खोल्यांची भव्य वास्तू उभी राहात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी तीर्थक्षेत्रे विकसित केली, अनेक ठिकाणी धर्मशाळा, अन्नछत्रालये उभारली, त्यांच्याच तत्त्वाप्रमाणे येथील सात गुंठे जागेत ही धर्मशाळा उभारण्यात येत आहे. यात कोणाचाही व्यक्तिगत स्वार्थ नाही, असे सांगितले.
येथील गायमुखाच्या बाहेरील दगडी भिंती तशाच ठेवल्या जाणार असून, आतमध्ये भाविकांसाठी स्नानगृह व पार्किंगची सुविधा राहणार असल्याचे देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. दिलीप निरगुडे यांनी सांगितले. येथे धर्मशाळेची तीनमजली इमारत उभी राहात असून, यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. दररोज पाचशे भाविक उतरण्याची येथे व्यवस्था होऊ शकेल. मात्र गायमुखाची ऐतिहासिक वास्तू जतन करावी, अशी आग्रही भूमिका अनेक स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.