Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मुलांमध्ये न्यूनगंड, व्यसनाधिनता आणि लैंगिक विकृतीच्या प्रमाणात वाढ
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

घर आणि नोकरी सांभाळून संसाराचा गाडा रेटणाऱ्या पालकांचा मुलांशी असलेला आपुलकीचा संवाद लोप पावत आहे. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड, एकलकोंडेपणा, नैराश्य, व्यसनाधिनता आणि लैंगिक विकृती निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील ज्ञानदेवी या स्वयंसेवी संस्थेतर्फे अठरा वयोगटापर्यंतच्या मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना मानसिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चाईल्ड लाईन १०९८ या फोन हेल्पलाईनवर शहराच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या पंधरा हजार कॉल्समुळे हे स्पष्ट झाले आहे.
कुटुंबातील अंतर्गत संघर्ष गरिबी आणि पती-पत्नीच्या तंटय़ामधून असुरक्षिततेची भावना मनात निर्माण झाल्यामुळे बालवयातील निरागस मुलांवर प्रतिकूल परिणाम होतो. अशा मुलांना मानसिक आधार देण्याची गरज असते. योग्यवेळी प्रेमाचा संवाद न लाभल्याने ही मुले हिंसक बनतात. त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती वाढते. यातूनच बालगुन्हेगार निर्माण होत असतात. अशा मुलांना त्यांचे मन मोकळे करण्यासाठी भयमुक्त वातावरणात संवाद साधण्यासाठी कोणीतरी जवळची व्यक्ती हवी असते. मुलांना अशा व्यक्तींचा मोठा आधार वाटतो.
या मुलांना कायमस्वरुपी आधार निर्माण व्हावा या उद्देशाने ज्ञानदेवी संस्थेतर्फे १०९८ टोलफ्री क्रमांकावर २४ तास मोफत समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
डॉ. सहस्रबुद्धे म्हणाल्या की, अडचणीत सापडलेल्या अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांना मानसिक आधार देणे, समुपदेशन, निवारा, पळून आलेल्या अथवा चुकलेल्या मुलांना घरी पोहोचविणे, मुलांवर होणाऱ्या अत्याचारांपासून त्यांची सुटका करणे ही कामे चाईल्ड लाईनतर्फे २४ तास केली जातात. या व्यतिरिक्त विविध स्तरावर नागरिकांना बालहक्कांबद्दलचे प्रशिक्षण, बालहक्कांचे संरक्षण करण्याचे काम चाईल्डलाईनतर्फे केले जाते.
१०९८ या संस्थेच्या टोल फ्री क्रमांकावर शहराच्या विविध भागांतून अडचणी व्यक्त करणारे फोनकॉल्स येत असतात. त्यामध्ये घरात एकटी असलेली मुले फोनवर गाणी, कविताही म्हणून दाखवतात. अभ्यासात येणाऱ्या अडचणींविषयी, पौगंडावस्थेत शरीरात होणाऱ्या बदलांविषयी, शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून होणाऱ्या अनपेक्षित अनुभवांविषयी, परीक्षेच्या भीतीपोटी, एड्सविषयी माहिती विचारणारे असंख्य फोन कॉल्स सातत्याने येत असतात. त्यात सेक्स टॉकचे प्रमाण वाढते आहे. विशेषत जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातून अश्लील संभाषण करणारे फोन कॉल्सही मोठय़ा प्रमाणावर येत असल्याचे दिसून आले आहे. यावरून ग्रामीण भागात लैंगिक शिक्षणाची तीव्र आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते, असे डॉ. सहस्रबुद्धे म्हणाल्या.
ज्ञानदेवी संस्था ही केंद्र शासनाच्या अनुदानावर चालणारी संस्था आहे. शासनातर्फे पुरेसे अनुदान मिळत नाही तसेच मिळणारे अनुदानही बँकेत मिळत नसल्याने संस्थेच्या कार्यात अडचणी येतात. यासाठी संस्थेने आशीर्वाद निधी संकल्पना मांडली असून, या संकल्पाच्या माध्यमातून वर्षांला शंभर रुपये निधी देणारे पाच हजार दाते गोळा करण्याचा संकल्प सोडला आहे.
या निधीतून चाईल्डलाईन सेवा अधिक कार्यक्षमतेने चालविणे शक्य होईल. इच्छुक दात्यांनी ०२०-२५६५६०३२/३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. सहस्रबुद्धे यांनी केले.