Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

रुग्णालयातून पलायन करणाऱ्यास साधी कैद
पुणे, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

रुग्णालयात उपचार घेताना तेथून पलायन करणाऱ्या राजेंद्र वसंत केतकर (वय ४८, रा. कराड) या आरोपीला दोन वर्षे साध्या कैदेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ज्योती पूरकर यांनी ठोठावली.
एका खटल्यात कराड पोलिसांनी केतकर याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. त्यात नऊ जून २००३ रोजी अटक क रण्यात आली होती. उपचारासाठी त्याला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या खोली बाहेर चार पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. तरीही केतकर याने तेथून त्या पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले. त्याबाबत त्याच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो अनेक दिवस फरार होता. रुबी हॉल निक्लनिकमधून पलायन केल्याने त्याबाबत बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याबाबत पोलिसांनी त्याला २८ जून २००३ रोजी अटक केली. त्यानंतर तो १७ डिसेंबर २००४ रोजी कारागृहातून जामिनावर बाहेर पडला.
१६ जानेवारी २००९ रोजी पुन्हा त्याला वॉरंटद्वारे बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याने रुग्णालयातून पलायन केल्याचा गुन्हा कबूल केला. औषधांच्या जादा डोसामुळे आपण पळून गेल्याने आपल्याला कमी शिक्षा करावी, अशी मागणी आरोपीने न्यायालयात केली. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. शिल्पा महातेकर यांनी या प्रकरणी काम पाहिले. दरम्यान तत्कालीन न्यायाधीश प्रशांत काळे यांनी रुग्णालयात देखरेख करणाऱ्या चार पोलिसांना तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. त्यात प्रकाश चासकर, घनशाम वाघोले, मारुती चव्हाण, रघुनाथ चव्हाण या क र्मचाऱ्यांचा समावेश आहे. .