Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

रवि घाटे, तुषार संपत सोशल इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड स्पर्धेत प्रथम
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

नॅसकॉम फाऊंडेशनतर्फे देशभरात आयोजित केलेल्या सोशल इनोव्हेशन ऑनर अ‍ॅवॉर्ड या स्पर्धेत पुण्यातील रवि घाटे आणि तुषार संपत यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
एसएमएसवनचे संचालक रवि घाटे यांनी राज्यातील पंचवीस जिल्ह्य़ांत, विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना एसएमएसच्या माध्यमातून घडलेल्या घटनेची माहिती त्वरित देणारा ‘एसएमएस न्यूज लेटर’ हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण घटनांची माहिती नागरिकांना पुरविली जाते. या उपक्रमासाठी ग्रामीण भागातील अल्पशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. देशातील प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येक माणूस या उपक्रमाद्वारे जोडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे घाटे यांनी सांगितले. या विशेष कामगिरीसाठी नॅसकॉमतर्फे त्यांना नुकतेच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आरोग्य डॉट कॉमचे संचालक तुषार संपत यांनी राष्ट्रीय समाज रक्षा संस्था आणि सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाच्या साहाय्याने देशभरातील साडेचारशे स्वयंसेवी संस्थांना अमली पदार्थाच्या व्यसनातून बाहेर येणाऱ्या लोकांकरिता ऑनलाईन स्वमदत गटाचे महत्त्व आणि योग्य रीतीने वापरण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविला आहे. तसेच व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेल्यांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कामही आरोग्य डॉट कॉमने केले आहे.
या दोन्ही व्यक्ती पुण्यातील असून, त्यांनी केलेल्या कामासाठी नॅसकॉमचे अध्यक्ष सोम मित्तल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.