Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘कमी खर्चातील फायदेशीर ठरणारी औषध निर्मिती हवी’
डॉ. रघुनाथ माशेलकर यांची अपेक्षा
पुणे, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

‘‘महागडी ऐवजी कमी खर्चात सर्वसामान्यांना उपलब्ध होऊन त्यांना फायदेशीर ठरणारी औषधे तसेच अन्य वस्तूंची निर्मिती केल्यास भविष्यात जैवतंत्रज्ञानामध्ये जगात भारत अग्रेसर होईल ,’’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नीतू मांडके आयएमए हाऊसमधील संचेती सभागृहाचे उद्घाटन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, मुंबईचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नंदकुमार लाड, दिल्लीचे डॉ. अमरीश मित्तल, डॉ. अरविंद चोप्रा यांची कमकुवत हाडे आणि कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यावर व्याख्याने झाली. त्यावेळी ते बोलत होते. विविध डॉक्टरांची यावेळी उपस्थिती होती.
या वेळी डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ‘‘ भारतात गरिबी असल्याने कमी खर्चाचे आणि उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असावे. त्याचा सामान्यांना कमी खर्चात लाभ मिळावा असा उद्देश आहे. अशा प्रकारच्या उत्पादनावर आपला भर असतो. उपचार पद्धतीत पाश्चात्य शास्त्र आणि आयुर्वेद यांची सांगड घातल्यास कमीत कमी खर्चात असाध्य आजारावर इलाज होईल. इंडियन कौन्सिल ऑफ सायटिंफिक रीसर्चचे अध्यक्ष असताना अशा प्रकारचा प्रयोग आपण केला,’’ अशी आठवण त्यांनी करून दिली.
कातडीच्या असाध्य आजारावर लाखो रुपये खर्च झाल्यानंतर त्याचा उपयोग होत नाही. त्यावर अनेक वर्ष संशोधन केले. त्यानंतर कंपन्यांकडून त्याची निर्मिती होऊन येत्या चार वर्षांत औषधे बाजारात येतील. सध्या जगात खूप महागडी तसेच न परवडणारी अशी उपचारपद्धती आणि वस्तूंची निर्मिती होत आहे. मात्र याचा सामान्यांना फायदा होत नाही. त्याऐवजी भारताने उलटय़ा पद्धतीने प्रयत्न केले, तर कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या वस्तू, औषधे निर्मिती करायला हवी. तसे झाल्यास जगात भारत हा जैविक तंत्रज्ञानात पुढे असेल, अशी आशाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
यावेळी डॉ. संचेती यांनी विकसित केलेला ‘इंडस’ हा कृत्रिम सांधा, टाटा कंपनीने विकसित केलेली नॅनो कार आणि अपंगांसाठी देशातच विकसित करण्यात आलेला जयपूर फूट यांचे उदाहरण त्यांनी दिले. डॉ. माया तुळपुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.