Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

..आणि दीड हजार हॅम कॉलपर्यंत पोहोचले शिवाजी महाराजांचे नाव
जुन्नर, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

 

एखाद्या किल्ल्यावरून हॅम रेडिओचं होणारं प्रसारण ही देशातली पहिलीच वेळ..शिवाजी महाराजांसाठी समर्पित केलेली..‘दी ग्रेट एम्परर ऑफ नेशन’ म्हणून शिवाजी महाराजांचे नाव जगभरातील जवळपास दीड हजार हॅम कॉलपर्यंत जाऊन पोहोचलं. हॅम रेडिओद्वारे किल्ले शिवनेरी स्पेस अ‍ॅक्टिव्हेशन उपक्रमांतर्गत प्रथमच जगाच्या नकाशावर झळकला. ही अनुभूती या उपक्रमात सहभागी झालेल्या हॅम कॉलर चमूसाठी एक आनंददायी सोहळा बनून गेली होती. विशेष म्हणजे या उपक्रमातून शिवाजी महाराजांचे नाव आणि त्यांची प्रतिमा जगभरात पोचविण्यासाठी ‘हॅम रेडिओ स्टेशन’ किल्ले शिवनेरीवर केंद्र सरकारच्या विशेष परवानगीने उभारण्यात आले होते.
जगभरात कोठेही अखंडितपणे संज्ञापन करणाऱ्या या यंत्रणेद्वारे इंग्लंड, रशिया, पोर्तुगाल, स्पेन, अ‍ॅटलांटा, कॅनडा, इटली, अमेरिका या ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव पोहोचविण्यात या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला यश आलं. खऱ्या अर्थाने ‘किल्ले शिवनेरीवरून’ झालेल्या उपक्रमातून शिवाजी महाराजांचे कार्य जगभरापर्यंत पोचविण्यासाठीचा हा उपक्रम सुवर्णाक्षरात लिहिण्यासाठीचा क्षण होता, असे भावुक उद्गार या मोहिमेचे मुख्य नगरचे उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर यांनी
काढले.
गोव्यातून आलेले मंजूनाथ शिंदे, या मोहिमेचे उद्गाते, नगरचे उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर, बेळगाववरून आलेले अशोक कुलकर्णी आणि मुंबईहून आलेले प्रशांत कोळी या हॅम कॉलर ग्रुपने हा अनोखा उपक्रम यशस्वी करून हॅम रेडिओद्वारे शिवछत्रपतींचे नाव जगभरात पोचविले. शिवछत्रपतींची प्रतिमादेखील क्यूएसएल कार्डद्वारे, जगभरात प्रसारित करण्यात आली. या उपक्रमातून शिवछत्रपतींचे नाव जगभरात पोचविण्यासाठी केंद्र सरकारने दोन दिवस ‘रेडिओ स्टेशन’ किल्ले शिवनेरीवर उभारण्यासाठी या उपक्रमासाठी परवानगी दिली होती.
जगभरात कोठेही अखंड आणि तत्पर संज्ञापन करणारी सुविधा म्हणजे हॅम रेडिओ. या यंत्रणेद्वारे शिवछत्रपतींचे जन्मस्थान ‘शिवनेरी’ बिनतारी संदेश लहरींवर प्रथमच अ‍ॅक्टिव्हेट करण्यात आले. त्यासाठी केंद्र सरकारने A special call sign AU 30 shi at shivneri junnar taluka pune maharashtra’ ही नोंद हॅम कॉलरसाठी ‘स्पेस अ‍ॅक्टिवेशन उपक्रमांतर्गत रजिस्टर करून दिली हे विशेष.
शिवरायांच्या नावाचा जयजयकार करण्यासाठी पोलंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, रशिया, इटली, अमेरिका अशा विविध देशातून दीड हजार हॅम कॉलपर्यंत शिवाजी महाराजांची महती पोचवता आली, अशी माहिती मोहीम प्रमुख दत्ता देवगावकर यांनी दिली. २१फेब्रुवारीला पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी या उपक्रमाला प्रारंभ झाला. विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर श्री. सामंत यांनी हॅम रेडिओच्या फोनेटिक भाषेत सी.क्यू.सी.क्यू.सीक्यू असे तीनदा म्हटले. त्यानंतर his is alpha uniform 30 shi from india from shivneri fort indiaम्हटल्यावर जगभरातील हॅम कॉलरकडून त्याला प्रतिसाद मिळत गेले.
रविवारी पहाटे १ वाजेपर्यंत जवळपास दीड हजार ठिकाणी संपर्क प्रस्थापित होऊन शिवाजी महाराजांची महती जगभरात पोचविण्यात आली, अशी माहिती श्री. देवगावकर यांनी दिली. या उपक्रमांसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदार संजय तेली यांचे सहकार्य मिळाले असे ते म्हणाले.
अशा रितीने विशेष रेडिओ यंत्रणेद्वारे, शिवछत्रपतींच्या मुत्सद्देपणाची आणि शौर्याची गाथा हॅम रेडिओद्वारे जगात पोचली. इतिहासाच्या पानोपानी असलेल्या बखरी, दस्त यातून शिवछत्रपतींचे कार्य जगासमोर गेलयं, मात्र हॅम रेडिओ हे माध्यम यासाठी अपवाद होतं.
त्याही माध्यमातून ते जगासमोर नेण्याचं आव्हान यशस्वी झाल्याचा आनंद या उपक्रमाच्या सांगतेच्या वेळी सर्व उपस्थित हॅम कॉलरच्या चेहऱ्यावरुन ओसंडत होता.