Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

लोणावळ्यातील बेमुदत बंद मागे, कायदेशीर मार्गाने लढा देणार
लोणावळा, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

 

लोणावळा शहरात अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण विरोधात लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने सुरू असलेली कारवाई अक्षम्य चुकीची व अमानवी असल्याचा आरोप करत लोणावळाकर नागरिक व व्यापाऱ्यांच्यावतीने पुकारलेला बेमुदत बंद रविवारी रात्री मागे घेण्यात आला.
ऐन आठवडय़ाच्या सुट्टीच्या दिवशी हा बेमुदत बंद पुकारल्याने लोणावळ्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर सुट्टीच्या निमित्ताने फिरावयास आलेल्या पर्यटकांनादेखील या बंदची झळ सोसावी लागली. मात्र तरीही प्रशासनाने आपली भूमिका कायम ठेवत सुट्टीच्या दिवशीही कारवाई सुरूच ठेवल्याने बंद करून सर्वसामान्य जनतेस वेठीस धरण्याऐवजी कायदेशीर मार्गाने पालिकेच्या अमानवी कारवाई विरोधात लढा देण्याचा निर्णय लोणावळा नागरिकांनी उभारलेल्या लोणावळा शहर विकास परिषदेने घेतला आहे.
याकरिता मावळचे आमदार दिगंबर भेगडे, पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विलास लांडे, आझमभाई पानसरे व लोणावळ्याचे शिष्टमंडळ यांची समिती तयार करण्यात येणार आहे.
ही समिती मुख्यमंत्री नगररचनामंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री यांची भेट घेवून लोणावळेकरांच्या समस्या, त्यांच्या मागण्या तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईतील व अनाधिकृत बांधकामाच्या यादीतील चुका व नियोजनशून्य कारवाई याविषयी सविस्तर माहिती मंत्र्यांना देणार आहे.
लोणावळा हे हिल स्टेशन नसतानाही येथील एफ.एस.आय. (चटई क्षेत्र) तीनवरून प्रथम (१.३३) व नंतर (१.५) ऐवढा करण्यात आला तो एफ.एस.आय. पुर्ववत करावा ही लोणावळाकरांची मागणी आहे. याही मागणीचा पाठपुरावा ही समिती करणार आहे. लोणावळ्याचे कायम रहिवासी नसणाऱ्या लोणावळा-खंडाळा सिटिझन फोरमने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत त्याआधारे सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप यावेळी विकास समितीने केला.
याचिकेतील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे काढण्याबरोबर शहरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य, ड्रेनेज सुविधा व रस्ते या मूलभूत सुविधांचा समावेश असताना त्यांना दुय्यम स्थान देऊन प्रशासनाने अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे पाडण्यास प्रथम प्राधान्य दिले. या उर्वरित समस्याकरिता व नागरी सुविधेकरिता लोणावळा शहर विकास परिषद पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मावळचे आमदार दिगंबर भेगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चासत्रात वरील सर्व निर्णय घेण्यात आले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केशवराव वाडेकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी उपनगराध्यक्ष सुभाष सोनवणे, भारिपचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य रमेशचंद्र नय्यर, काँग्रेस आयचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, शहराध्यक्ष जयवंत काऊर नगरसेवक नारायण पाळेकर, अमीत गवळी, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब पायगुडे, कार्याध्यक्ष शत्रुघ्न खंडेलवाल, राजु बोराटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी बच्चुभाई पत्रावाला आदी उपस्थित होते.