Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शिरूरमधील रामलिंग मंदिरातील शिवलिंगाचे हजरो भाविकांकडून दर्शन
शिरूर, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

 

‘हर हर महादेव’ व ‘रामलिंग महाराज की जय’च्या घोषात हजारो भाविकांनी रामलिंग मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले. शिरूर शहरापासून ४ कि.मी. अंतरावर असणाऱ्या रामलिंग मंदिरात महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेचा महाशिवरात्रीचा दिवस मुख्य असतो. महाशिवरात्रीनिमित्त शिरूर शहरातून रामलिंग महाराजांच्या प्रतिमेचा पालखी सोहळा असतो. रामलिंग महाजारांच्या पालखीने रात्री २ च्या सुमारास रामलिंग मंदिराकडे प्रस्थान केले. पहाटे चार वाजता पालखी रामलिंग मंदिरात पोहोचली. या वेळी शिरूर शहरातील अनेक भाविकांसह नगराध्यक्ष प्रकाश पारिवाल, उपनगराध्यक्ष महेंद्र मल्लाव, नगरसेवक दादाभाऊ नारगरे, नीलेश कंदाबले आदी उपस्थित होते.
महाशिवरात्रीच्या पहाटे रामलिंग मंदिरातील पिंडीवर महारुद्राभिषेक करण्यात आला. भाविकांनी रात्री १२ वाजल्यापासूनच दर्शनाकरिता गर्दी केली होती. पहाटेपासूनच भाविकांच्या मोठमोठय़ा रांगा मंदिराबाहेर लागल्या. यात्रेनिमित्त रामलिंग मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा सोमवारच्या दिवशीच महाशिवरात्र आल्याने भाविकांच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली होती. अण्णापूर, सरावाडी, तडरेबाची वाडी, कर्डेलवाडी, शिरूर ग्रामीण, दसगुडेमळा, या पंचक्रोशीतील वाडय़ावस्तीवरून अनेकजण मोठय़ा संख्येने दर्शनाकरिता आले होते. महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शिरूर यांच्या वतीने धार्मिक माहिती देणारे फलक रामलिंग मंदिराच्या परिसरात लावण्यात आले होते. या फलकाद्वारे मुलांना संस्काराचे महत्त्व या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले होते. या बाबतची अधिक माहिती देताना विश्वविद्यालयाच्या शिरूर केंद्राच्या संचालिका अर्चना बहेनजी म्हणाल्या की, संस्कार मूल्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत. नैतिक मूल्यांचा व दैवी गुणांचा ऱ्हास होत असताना प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक सुसंस्कारांचे पालन करणे गरजेचे असल्याचे बहेनजी म्हणाल्या.
रामलिंग यात्रेमुळे मंदिर सभोवताली अनेक जणांनी आपली दुकाने थाटली होती. महाशिवरात्रीला बहुतेकजण उपवास करतात. यामुळे मोठय़ा संख्येने उपवासाचे पदार्थाची विक्री करणारे खाद्यपदार्थाचे स्टॉल येथे होते. लहान मुलांकरिता खेळणींची दुकाने, इतर छोटय़ा-मोठय़ा दुकानांनी या परिसरात खरेदीकरीता लहान मुलांनी व महिलांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. यात्रेकरिता शिरूर बसस्थानकातून स्वतंत्र एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. महामंडळाच्या ११ बसेसद्वारे सकाळपासून शिरूर ते रामलिंग व रामलिंग ते शिरूर या मार्गावर बस सोडण्यात येत होत्या, अशी माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक सुर्वे यांनी दिली. यात्राकाळात २५ पोलीस कर्मचारी व १५ गृहरक्षकदलाच्या जवानांसह मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक नवनाथ बेरे यांनी दिली. रात्री उशिरा यात्रेनिमित्त शोभेचे दारुकाम करण्यात येणार असून दरवर्षी हे दारूकाम पाहण्याकरिता मोठय़ा संख्येने भाविक येत असतात. रामलिंग यात्रा महोत्सवाचा मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असून बैलगाडय़ाच्या शर्यतीने यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.