Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आदिवासी बांधवांचे खावटी कर्ज माफ करणार - गावित
मंचर, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

 

राज्यातील आदिवासी समाज एकविसाव्या युगातही अद्याप मागासलेलाच आहे. राज्य सरकार आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. म्हणूनच राज्यातील आदिवासी बांधवांची एकूण आर्थिक स्थिती पाहता पन्नास लाख आदिवासी बांधवांचे खावटी कर्ज माफ करणार असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी रविवारी केली.
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील डिंभे खुर्द येथील शरद पवार माध्यमिक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आदिवासी बांधवांचा मेळावा झाला. त्या वेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना गावित बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री दिलीप वळसे-पाटील होते.
कार्यक्रमाला मंचर बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, संचालक गणपतराव कोकणे, जिल्हा परिषद सदस्य अरुणराव गिरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिनभाऊ भोर, युवानेते विवेक वळसे-पाटील, तहसीलदार प्रशांत पाटील आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
या वेळी बोलताना आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित म्हणाले, की राज्यातील एकूण लोकसंख्येच्या नऊ टक्के इतकी आदिवासी बांधवांची लोकसंख्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना आदिवासी जनतेसाठी राज्याच्या एकूण निधीच्या नऊ टक्के निधी राखून ठेवण्यात आला आहे.
तो राखीव निधी खर्च करण्यासाठी आदिवासी विकासमंत्र्यांना आदिवासी जनतेच्या विकासासाठी अधिकार दिले असल्यामुळे या राखीव निधीचा वापर आदिवासी बांधवांच्या विकासासाठीच केला जातो.
आदिवासी जनतेने राज्य सरकारच्या योजनांचा लाभ उठवून इतरांच्या बरोबरीने स्वत:चे जीवनमान उंचावण्याची नितांत गरज आहे.