Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

गुळूंचे चिंकारा शिकार प्रकरण: जप्त केलेल्या गाडय़ा व शस्त्रे परत मिळवण्यासाठी अर्ज
धर्मराव बाबा अत्रामसह सर्व आरोपींनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
सोमेश्वरनगर, २३ फेब्रुवारी /वार्ताहर

 

चिंकारा शिकार प्रकरणातील जप्त केलेल्या गाडय़ा व शस्त्रे परत मिळावीत, अशी मागणी या प्रकरणातील आरोपींनी केली असून याबाबतची सुनावणी शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संदर्भात माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्यासह सर्व आरोपींनी हजर राहण्याचे आदेश सासवड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अश्विनी कुलकर्णी यांनी दिले आहेत.
चिंकारा हरीण शिकार प्रकरण पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथे दिनांक १४ जूनच्या मध्यरात्री घडले होते.
शिकार प्रकरणाचा तपास भोरचे उपविभागीय वनअधिकारी हणुमंत धुमाळ यांनी अतिशय कौशल्याने करून शिकार प्रकरणातील सर्व धागेदोरे मुद्देमालासह उघड केले. त्यामुळे शिकार प्रकरणातील हरणाचे रक्त, लेंडय़ा, केस सापडले. या प्रकरणातील सर्व आरोपींना मुद्देमालासह न्यायालयात उभे केले. हरीण शिकार प्रकरणामध्ये तत्कालीन मंत्रिमंडळातीलच राज्यमंत्र्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पारदर्शी होईल काय, अशी शंका वन्यप्रेमी नागरिक व्यक्त करू लागले होते.
परंतु जिगरबाज तपास अधिकारी हणुमंत धुमाळ यांनी या प्रकरणाचा तपास धाडसाने करून अंतिम सत्य न्यायालयासमोर उभे केले. हणुमंत धुमाळ हे मूळ सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव तालुक्यातील करंजखोपचे रहिवासी. संपूर्ण गावाने या कर्तबगार अधिकाऱ्याचा जलस्वराज्य प्रकल्पाचे उपआयुक्त इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते नागरी सत्कार करून गौरव केला होता.
हरीण शिकार प्रकरणी जप्त केलेल्या गाडय़ा व शस्त्रे परत मिळावीत अशी मागणी या प्रकरणातील माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा अत्राम व ठाणेचे अंकुश सणस यांनी केली असून सरकारी वकील अ‍ॅड. रमेश घोरपडे सरकारच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत. यापूर्वी माजी राज्यमंत्री अत्राम यांनी परदेशी जाण्याबाबतचा परवानगी मागणारा अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळला होता.