Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

प्रपंचाचा रामरगाडा सांभाळत असताना ‘पीएसआय’ चा गड सर !
पिंपरी, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘अगदी सर्वसाधारण महिलांप्रमाणे प्रपंचाचा रामरगाडा म्हणजेच चूल-मूल सांभाळून गृहिणी ते फौजदार असा प्रवास मोठय़ा जिद्दीने पूर्ण केला. माझ्या स्वप्नांना आई, सासू, पतीने बळ दिल्याने ‘पीएसआय’पर्यंत झेप घेता आली,’ सांगत होत्या नुकत्याच फौजदार परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दीपाली नवीनचंद्र बोऱ्हाडे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने कृतकृत्य झाल्याची त्यांची भावना होती.

‘डीएड-बीएड’ची यंदा ‘खिरापत’ नाही!
राज्यातील ५०० तुकडय़ांचे प्रस्ताव रद्द
पुणे, २३ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
शिक्षणशास्त्र पदविका (डीएड) आणि पदवी (बीएड) अभ्यासक्रमाची ‘दुकाने’ थाटणाऱ्या संस्थाचालकांना राष्ट्रीय अध्यापक परिषदेने (एनसीटीई) अखेर लगाम घातला आहे. २००९-१० या शैक्षणिक वर्षांसाठी महाराष्ट्रामध्ये एकही अध्यापक तुकडी सुरू करू नये, असा आदेश बजाविण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात ‘डीएड’च्या सुमारे ४०० आणि ‘बीएड’च्या १०० तुकडय़ांचे प्रस्ताव रद्द ठरणार आहेत. त्याचप्रमाणे गुजरात, केरळ, हरयाणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही नवीन संस्थांची मंजुरी रोखण्यात आली आहे.

मंडई परिसरामध्ये एका तरुणाचा खून
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सदाशिव पेठेत दोनच दिवसांपूर्वी भरदिवसा खून झाल्याच्या खळबळजनक घटनेनंतर, आज सकाळी मंडई परिसरामध्ये एका तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यावर सत्तूरने वार करून तरुणाचा खून केला असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.
मंडई येथे फूलबाजारातील गाळा क्रमांक ६५६च्या बाजूला एक मृतदेह आढळल्याची खबर पोलिसांना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मिळाली. मृतदेहाजवळ पोलिसांना एक ओळखपत्र सापडले. त्यावर मिळालेल्या नाव व पत्त्यावर चौकशी केल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली.

‘कमी खर्चातील फायदेशीर ठरणारी औषध निर्मिती हवी’
डॉ. रघुनाथ माशेलकर यांची अपेक्षा
पुणे, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी
‘‘महागडी ऐवजी कमी खर्चात सर्वसामान्यांना उपलब्ध होऊन त्यांना फायदेशीर ठरणारी औषधे तसेच अन्य वस्तूंची निर्मिती केल्यास भविष्यात जैवतंत्रज्ञानामध्ये जगात भारत अग्रेसर होईल ,’’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे व्यक्त केले.

गुळूंचे चिंकारा शिकार प्रकरण: जप्त केलेल्या गाडय़ा व शस्त्रे परत मिळवण्यासाठी अर्ज
धर्मराव बाबा अत्रामसह सर्व आरोपींनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
सोमेश्वरनगर, २३ फेब्रुवारी /वार्ताहर
चिंकारा शिकार प्रकरणातील जप्त केलेल्या गाडय़ा व शस्त्रे परत मिळावीत, अशी मागणी या प्रकरणातील आरोपींनी केली असून याबाबतची सुनावणी शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संदर्भात माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्यासह सर्व आरोपींनी हजर राहण्याचे आदेश सासवड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अश्विनी कुलकर्णी यांनी दिले आहेत.

पिंपरी पालिकेचा आज अर्थसंकल्प
पिंपरी, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २००९-२०१० या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प उद्या (मंगळवारी) मांडण्यात येणार आहे. श्रीमंत पालिकेची ढासळलेली आर्थिक व्यवस्था पाहता या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.स्थायी समितीच्या मावळत्या अध्यक्षा उषा वाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दुपारी होणाऱ्या बैठकीत पालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. आयुक्त आशिष शर्मा हे आपल्या कारकीर्दीतील पहिला अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करतील. पालिकेची ढासळलेली आर्थिक परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर यंदाच्या वर्षी कोणत्या तरतुदी अर्थसंकल्पात आहेत, याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

‘स्लमडॉग मिलिऑनर’संबंधीचे पुस्तक लवकरच मराठीत
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी
भारताला चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च ऑस्कर पुरस्कार मिळवून देणारा ‘स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट विकास स्वरूप लिखित ‘क्यू अ‍ॅन्ड ए’ या इंग्रजी पुस्तकावर आधारित असून, हे पुस्तक लवकरच मराठीमध्ये प्रकाशित होणार आहे.मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेला मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचे हक्क प्राप्त झाले आहेत. येत्या २० मार्चपर्यंत हे पुस्तक वाचकांसाठी मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे. वंदना अत्रे या पुस्तकाचे मराठी भाषांतर करणार आहेत.

कृषिमाल किंमत धोरणावर आज पुण्यात कार्यशाळा
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी
येथील कृषी महाविद्यालयात उद्या विकासातील कृषिमाल किंमत धोरणावर राज्य शासनाचा कृषी विभाग, फळे-फुले भाजीपाला शेतकरी संघ व कृषी पदवीधर संघाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कमिशन फॉर अ‍ॅग्रिकल्चर कॉस्ट अँड प्रायसेसचे अध्यक्ष प्रा. एस. महेंद्र देव यांचे ‘रोल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर प्राईस पॉलिसी इन डेव्हलपमेंट’ यावर, तर बडोद्याच्या मॅनेजमेंट अ‍ॅनालायटिक प्रायव्हेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकंता सांबरानी यांचे ‘चॅलेंजेस फॉर इंडियन अग्रेरियन पॉलिसी अ‍ॅट द टाईम ऑफ ग्लोबल मेल्टडाऊन’ यावर महाविद्यालयाच्या शिरनामे सभागृहात व्याख्यान होणार आहे.

‘अ‍ॅबॅकस’ स्पर्धेत पुण्याचा आदित्य मोरे तिसरा
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी
सिप अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित गणिती आकडेमोडीवर आधारित ‘अ‍ॅबॅकस’ या स्पर्धेत पुण्याच्या आदित्य मोरे या विद्यार्थ्यांने ‘बिगीनर्स’ फेरीत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेत पुणे-मुंबई विभागातून दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. आदित्य भूगाव येथील विद्याव्हॅली स्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे.

स्वारगेट ते सासवड मार्गावर पीएमपीची सेवा आजपासून
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी
प्रवाशांनी सातत्याने केलेल्या मागणीनुसार पीएमपीतर्फे स्वारगेट ते सासवड, पुणे स्टेशन ते सासवड आणि हडपसर ते सासवड या मार्गावरील सेवा उद्या (मंगळवार) पासून सुरू होत आहे. पूर्वीच्या स्वारगेट ते सासवड या सेवेत बदल करून स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर ते सासवड अशी सेवा पीएमपीने सुरू केली होती. मात्र, प्रवाशांच्या गैरसोयीच्या तक्रारी सातत्याने होत राहिल्याने ही सेवा पूर्ववत सुरू होत असल्याचे पीएमपी प्रशासनाने आज कळविले. स्वारगेट ते सासवड (क्र. २०७) मार्गावर दर ३० मिनिटांनी गाडय़ा सोडण्यात येतील, तर पुणे स्टेशन ते सासवड आणि सासवड ते पुणे स्टेशन (क्र. २०८) मार्गावर दर ५५ मिनिटांनी गाडय़ा सोडल्या जातील. याशिवाय हडपसर ते सासवड आणि सासवड ते हडपसर (क्र. २०७ अ) मार्गावर दर २५ मिनिटांनी गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. स्वारगेट/पुणे स्टेशन ते महात्मा गांधी बसस्थानक, हडपसर, वडकीनाला, सासवड असा या सेवेचा मार्ग असेल.

चंदन चोरास पोलीस कोठडी
पुणे, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

हवेली तालुक्यातील श्रीरामनगरच्या हद्दीतील ५० हजार रुपये किमतीचे चंदन चोरणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. एक मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. भागवत यांनी आदेश दिला. राजू टारझन राजपूत आणि राजा टारझन राजपूत (रा. कोंढणपूर) हे अद्याप फ रारी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

इरिना स्वामींचा २५ ला महोत्सव
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

श्री परब्रह्म गोपालनाथ महाराज यांचे शिष्य इरिना स्वामी यांचा पुण्यतिथी महोत्सव २५ व २६ फेब्रुवारी रोजी शहरात होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद (भंडारा) होणार आहे.

कादरभाई कुरेशी यांचे निधन
बेल्हे, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

बेल्हे परिसरातील ज्येष्ठ कलावंत कादरभाई अहमदभाई कुरेशी यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, चार मुलगे, सुना, जावई असा परिवार आहे.
बेल्हे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. बेल्हे शहरातील ग्रामदैवताच्या उत्सवानिमित्त तसेच गणेशोत्सवाच्या काळात बिदागीची अपेक्षा न ठेवता कादरभाई विविध कार्यक्रमातून कला सादर करत होते. नुकत्याच झालेल्या ग्रामदैवत श्री भैवरनाथ देवाच्या यात्रेत त्यांनी कला सादर केली होती. ‘देवाच्या कृपेने मला कला सादर करता आली, पण पुढील वर्षी कला सादर करता येणार नाही, मला क्षमा करा’ अशी विनंती करणाऱ्या कादरभाईंचे आज अचानक निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार पाचजणांना प्रदान
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

डॉ. ग.श्री. तथा अण्णासाहेब खैर आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. पुणे विद्यार्थी गृहाच्या माजी विद्यार्थी मंडळातर्फे दिले जाणारे हे पुरस्कार प्राचार्य हणमंतराव भोसले, डॉ. अरविंद नातू, हणमंतराव साळुंखे, डॉ. श्रीपाद जोशी यांना प्रदान करण्यात आले.
समाजात शिक्षणाची ज्योत तेवत ठेवून उद्याची पिढी घडवित असताना पुणे विद्यार्थी गृहाच्या संस्कांरांचे योगदान महत्त्वाचे मानणाऱ्या या पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कौतुक भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते अण्णासाहेब खैर आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आले. पुणे विद्यार्थी गृह माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष बा.ना. कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून देण्यात येणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष डॉ. आर.पी. जोशी, कार्यवाह म.न. देशमुख, द.वा. आफळे, माजी विद्यार्थी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.श्री.अ.पाटणकर आदी उपस्थित होते