Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

राज्य

पोलिसांवर कारवाई न केल्यास गृहमंत्र्यांना जिल्हाबंदी -उदयनराजे
सातारा, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

वीज भारनियमन मुक्ती आंदोलकांवर गृहमंत्री जयंत पाटील यांनी फोनवरून सूचना दिल्यानंतरच अमानुषपणे लाठीमार करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत केला.सरकारच्या दडपशाहीला न घाबरता आता हे आंदोलन राज्यभर नेणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचा ‘पॉवर प्ले’ अन् काका-पुतण्याची ‘इव्हेंट मॅनेजमेंट’
नाशिक, २३ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थानी असताना झालेली विकास कामे, महत्वाकांक्षी प्रकल्पांना मिळालेले मूर्तस्वरुप, सामान्यांना दिलासा देण्यासाठी राबविलेल्या योजना अन् त्यामुळे पक्षाला सर्व थरातून मिळणारा पाठिंबा या प्रमुख मुद्यांचा वापर पक्षाच्या नाशिकस्थित आगामी महाअधिवेशनात करण्यात येणार आहे. हा लेखाजोखा मांडण्यासाठी भव्यदिव्य असे तीन खास ‘बॅकड्रॉप’ आयात करण्यात येणार असून या अधिवेशनाला भुजबळ काका-पुतण्याच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ची जोड मिळत आहे.

धुळे दंगलीमागे विविध कारणे
मानव अधिकार कृती गटाचे स्पष्टीकरण
धुळे, २३ फेब्रुवारी / वार्ताहर
धुळे दंगलीला केवळ आक्षेपार्ह फलक हेच कारण नव्हते तर त्यामागे नियोजित पध्दतीने धार्मिक द्वेषाची वातावरण निर्मिती, अवैध व्यवसायांतर्गत गट-तटातील वाद, पोलीस आणि अशा व्यावसायिकांमध्ये असलेल्या आर्थिक व्यवहारातील ताणतणाव, अशीही कारणे कारणीभूत असल्याचे मानव अधिकार कृती गट आणि विधी अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगासमोर स्पष्ट करण्यात आले.

जिनिंग-प्रेसिंग कारखानदारांचा संप ; मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही
धुळे, २३ फेब्रुवारी / वार्ताहर

नाफेडतर्फे सुरू झालेल्या कापूस खरेदीनंतर नवनव्या धोरणांचा अवलंब सुरू झाल्याने कंटाळलेल्या राज्यातील जिनींग-प्रेसिंग कारखानदारांनी आजपासून बेमुदत बंद पुकारताच पणन मंत्र्यांसह या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची झोप उडाली. रुईच्या १६०-१७५ किलो वजनाच्या गाठींचे पैसे तात्काळ देण्याचे परिपत्रक सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असून कारखानदारांच्या अन्य मागण्यांवरही तातडीने निर्णय घेण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.

कायम विनाअनुदानीत शिक्षकांचे आज आझाद मैदानावर धरणे
शहापूर, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे मागे राहिलेला कायम विनाअनुदानित शाळांचा ‘कायम’ शब्द काढण्याचा जी.आर. तातडीने काढावा व शिक्षण क्षेत्रातील रखडलेले महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आचारसंहितेपूर्वी मार्गी लागावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली उद्या मंगळवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे.
कायम विनाअनुदानित शाळांचा ‘कायम’ शब्द आठ दिवसांच्या आत काढण्याचे आश्वासन तत्कालीन शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिला होता. परंतु दोन महिने होऊनही त्याबाबत शासनाने अजूनही निर्णय घेतलेला नाही. शासन कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची व संस्थाचालकांची दिशाभूल व फसवणूक करीत असल्याबद्दल शिक्षक परिषदेने तीव्र संताप व खेद व्यक्त करून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिक्षक परिषदेचे कार्यवाह व आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले. नाशिक येथे सुरू असलेल्या शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू होणार आहे.

जामनेर : विकासकामे रखडल्याने संभ्रम
जामनेर, २३ फेब्रुवारी / वार्ताहर

शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधा, वापरा व हस्तांतरीत करा तत्वावर व्यापारी संकूल, प्रशासकीय इमारत, सभागृह, विश्रामगृह आदी विकास कामांच्या बांधकामांसाठी राज्य शासनाने गेल्या वर्षी मान्यता दिली होती. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही या कामांना सुरूवात न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहरात जिल्हा परिषदेची मराठी व उर्दू मुलांची शाळा तसेच इतर जागा आहे. शाळेचे पटांगण मोठे असून त्या ठिकाणी व्यापारी संकुलाची उभारणी करण्याविषयी प्रयत्न झाले. आ. गिरीश महाजन यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे शासनाने आदेश काढून खासगीकरणाच्या माध्यमातून बांधकाम करण्यास मंजुरी दिली आहे. शासनाच्या मान्यतेनुसार शाळेच्या जागेवर ५०० गाळ्यांचे व्यापारी संकूल, जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेवर प्राथमिक शाळेची इमारत, मुलांना खेळण्यासाठी पाच हजार चौरस मिटरचे मैदान, प्रशासकीय इमारत, अद्ययावत सभागृह, पॉलीक्लिनीक, जनावरांचा दवाखाना कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, विश्रामगृहे आदी बांधकाम होणे अपेक्षित होते. मात्र वर्षभरात याबाबत जिल्हा परिषदेकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे या प्रस्तावाचे नेमके काय झाले, याबाबत नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

अश्लील सीडींची विक्री; ७८ लाखांचा माल जप्त
पुणे, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सिंहगड रस्त्यावर बनावट डीव्हीडी, तसेच अश्लील सीडींची विक्री करणाऱ्या टोळीला हवेली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ७८ लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या चौदा हजार तीनशे सीडी जप्त केल्या. बाळा खेडेकर, संदीप गेहलोत, बाळु इंगवल व मल्लीकार्जुन मानेपाटील असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. ‘इंडिया कॉपीराईट इन्वेस्टिगेशन’ या कंपनीचे विशाल झुंबर लोंढे यांनी याबाबत फिर्याद दिली. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत व इंगवले या दोघांचे माणिकबाग येथे ‘कस्तुरी म्युझिक हाऊस’ नावाचे दुकान आहे. तेथे या बनावट तसेच अश्लील सीडींची विक्री करण्यात येत असे.

क्रेडिट कार्ड चोरून ५० हजारांची लूट
पुणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

चोरलेल्या क्रेडिट कार्डाद्वारे ५० हजारांचे सोन्याचे दागिने खरेदी करून फसवणूक करणाऱ्या एकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सूरज मोतीवाले याच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीतेश मोदी यांनी याबाबत स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीवाले हा मोदी यांच्या ओळखीचा असून, त्याने मोदी यांच्या सदनिकेची चावी घेऊन कुलूप उघडून त्यांचे क्रेडिट कार्ड चोरी केले. या चोरलेल्या कार्डाद्वारे मोतीवाले याने सराफाकडून सोने खरेदी केले. सराफाच्या दुकानामध्ये पावतीवर खोटय़ा सह्य़ा करून, तसेच क्रेडिट कार्ड बँकिंगसाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक देऊन मोतीवाले याने मोदी यांची ४९ हजार ४८ रुपयांची फसवणूक केली.

मित्राची हत्या करणाऱ्याला जन्मठेप
नांदेड, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

पूर्ववैमनस्यातून मित्राचा अ‍ॅसिड टाकून व चाकूने भोसकून निर्घृण खून करणाऱ्या अवेज अहमद याला जन्मठेप देण्यात आली. इतवारा येथे राहणारे अहमद अवेज सिद्दीकी गुलाम समदानी व अवेज फजल अहमद मित्र होते. तीन वर्षांपूर्वी या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर ते बोलत नव्हते. नोव्हेंबर २००७मध्ये अवेज अहेमदने समदानीशी पुन्हा मैत्री केली. अवेज १ डिसेंबर २००७ रोजी मोटर घेऊन समदानीकडे आला. ‘फिरून येऊ,’ असे म्हणून त्याने त्याला घराबाहेर काढले आणि असर्जन शिवारात नेले. तेथे त्याच्या अंगावर अ‍ॅसिड टाकून वर चाकून भोसकले होते.

परळीत भाविकांची गर्दी
परळी, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

‘पार्वतीपते हर हर, वैद्यनाथ महाराज की जय, हर हर महादेव’ अशा गर्जना करीत महाशिवरात्रीच्या पावन वर्षांनिमित्त लाखो भाविक भक्तांनी प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन घेतले. तब्बल तपानंतर सोमवारी महाशिवरात्र आल्याने भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. रविवारी रात्री बारा वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या.