Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

क्रीडा

युनूस खानच्या नाबाद शतकाने पाकचे श्रीलंकेला चोख उत्तर
कराची, २३ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

युनूस खानने कर्णधाराला साजेशी खेळी करताना नाबाद शतक झळकावले आणि यजमान पाकिस्तानने सलामीच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या श्रीलंकेला चोख उत्तर दिले. गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या युनूस खानने नाबाद १४९ धावांची खेळी केली. त्याने माजी कर्णधार शोएब मलिकच्या साथीने श्रीलंकन गोलंदाजांवर वर्चस्व राखले आणि पाकिस्तानला फॉलोऑनची नामुष्की ओढवणार नाही, याची हमी दिली.

बकनर निवृत्त होणार
किंग्स्टन, २३ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा स्टीव्ह बकनर यांनी आज येथे केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बकनर हे सर्वात ज्येष्ठ पंच आहेत. दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी आणि अखेरची कसोटी १९ ते २३ मार्च या काळात केपटाऊन येथे खेळली जाणार आहे. बकनर यांची पंचाच्या भूमिकेतील ही अखेरची कसोटी ठरेल. इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या आगामी दोन एकदिवसीय सामन्यांत बकनर पंच असतील. मायभूमीतील हे सामने त्यांच्या कारकीर्दीतील अखेरचे सामने असतील.

‘मसक्कली’च्या तालावर टीम इंडियाची खुलली कळी
‘स्लमडॉग’बद्दल मात्र संघात दुमत
विनायक दळवी
मुंबई, २३ फेब्रुवारी

तमाम भारतीयांचे क्रिकेट खेळून मनोरंजन करणारे भारतीय क्रिकेटपटू स्वत: मात्र हिंदी चित्रपट पाहून तणावपूर्ण वातावरणात विरंगुळा शोधत असतात. दौऱ्यावर असताना तर या संघाला भारतीय चित्रपट मोठेच आधार वाटतात. कोणताही दौरा याला अपवाद ठरत नाही. कालपरवा न्यूझीलंडला, ख्राईस्टचर्च येथे भारतीय संघाने एकत्रितपणे ‘दिल्ली-६’ हा चित्रपट पाहिला. त्यातील ‘मसक्कली’ या गाण्यावर तर चक्क त्यांनी चित्रपट सुरू असतानाच नाचायला सुरुवात केली.

भारतीय संघ क्रिकेट विश्वात अव्वल- मोल्स
ख्राईस्टचर्च, २३ फेब्रवारी/ पीयीआय

क्रिकेट मानांकनात पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांपेक्षा महेंद्र सिंग धोनीचा सातत्याने विजय मिळविणारा भारतीय संघ क्रिकेट विश्वात अव्वल आहे, असे मत न्यूझीलंडचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी मोल्स यांनी व्यक्त केले आहे.भरताने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पाराभूत केले होते. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकेत इंग्लंडचा त्यांनी फडशा पाडला होता. तर नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. गेल्या ४१ वर्षांत भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये एकही मालिका जिंकता आलेली नसली तरी त्यांचा सध्याचा विजयाचा धुमधडाका पाहता धोनी ब्रिगेड यंदा ऐतिहासिक विजय संपादन करू शकतो, असे मोल्स यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये सध्या भारतीय संघ अव्वल आहे. गेल्या १८ महिन्यात त्यांचा संघ भारताबरोबरच विदेशातही चांगले क्रिकेट खेळला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत चेंडूला उसळी देणाऱ्या खेळपट्टय़ा आमच्या मदतीला येतील, असा विश्वास मोल्स यांनी व्यक्त केला. आमच्या संघातील नवोदित खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आमच्या संघात काही नवोदित चेहरे आहेत. मात्र हे नवोदित खेळाडू आश्चर्यकारक कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. या वेळी त्यांनी मार्टिन उप्तील, ग्रॅंट एलियट, नील ब्रूम या न्यूझीलंड संघातील नवोदितांचा उल्लेख केला.

भारत विरूद्ध न्यूझीलंड सामन्यांचे वेळापत्रक ट्वेन्टी-२० सामने
’ पहिला ट्वेन्टी-२० सामना २५ फेब्रुवारी (ख्राइस्टचर्च; सकाळी ११पासून)
’ दुसरा ट्वेन्टी-२० सामना २७ फेब्रुवारी (वेलिंग्टन; सकाळी ११पासून)
एकदिवसीय सामने (सर्व लढती प्रकाशझोतात)
’ पहिला एकदिवसीय सामना ३ मार्च (नेपियर; सकाळी ६ पासून)
’ दुसरा एकदिवसीय सामना ६ मार्च (वेलिंग्टन; सकाळी ६ पासून)
’ तिसरा एकदिवसीय सामना ८ मार्च (ख्राइस्टचर्च; सकाळी ६पासून)
’ चौथा एकदिवसीय सामना ११ मार्च (हॅमिल्टन; सकाळी ६ पासून)
’ पाचवा एकदिवसीय सामना १४ मार्च (ऑकलंड; सकाळी ६ पासून)
कसोटी सामने
’ पहिली कसोटी - १९ ते २३ मार्च (हॅमिल्टन; सिडन पार्क, पहाटे ३.४५ पासून)
’ दुसरी कसोटी - २७ ते ३१ मार्च (नेपियर; मॅकलिन पार्क, पहाटे ३.४५ पासून)
’ तिसरी कसोटी - ४ ते ७ एप्रिल (वेलिंग्टन; वेस्टपॅक स्टेडियम, पहाटे ३.४५ पासून).
(सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार)

सानिया ७५व्या स्थानावर; सोमदेव पहिल्या दीडशेत
नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी / पीटीआय

भारताच्या सोमदेव देववर्मनने आज जाहीर झालेल्या एटीपी टेनिस क्रमवारीत अव्वल दीडशे टेनिसपटूंत स्थान मिळवले. सोमदेवचे कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन आहे. सोमदेव जागतिक टेनिस क्रमवारीत १५०व्या स्थानावर आहे. भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने क्रमवारीत १२ स्थानांची प्रगती केली असून ती ७५व्या स्थानावर आहे. दुबई टेनिस स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारणाऱ्या सानियाच्या खात्यात ८०६ मानांकन गुण आहेत. दुहेरीत सानियाने १५३२ मानांकन गुणांसह ६३वे स्थान कायम राखले. महेश भूपतीच्या दुहेरीच्या मानांकनात एका स्थानाने घसरण झाली असून तो सहाव्या स्थानावर आहे. लिएंडर पेस सातव्या स्थानावर कायम आहे.

आयसीसी कार्यकारिणीची आज बैठक
जोहान्सबर्ग, २३ फेब्रुवारी / पीटीआय

जोहान्सबर्ग येथे उद्या, मंगळवारी होणाऱ्या आयसीसी कार्यकारिणीच्या बैठकीत रद्द करण्यात आलेली अ‍ॅन्टिग्वा कसोटी, भविष्यातील क्रिकेट कार्यक्रम, कसोटी क्रिकेटचा प्रचार व प्रसार आणि उत्तेजकविरोधी उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान, अ‍ॅन्टिग्वा येथे केवळ दहा चेंडूंचा खेळ झाल्यानंतर मैदान खेळण्यायोग्य नसल्यामुळे कसोटी सामना रद्द करण्यात आला. भविष्यात याप्रमाणे स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याबाबत आयसीसीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

लिनारेस बुद्धिबळ : आनंदची वांगवर मात
लिनारेस, २३ फेब्रुवारी / पीटीआय

लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याने आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. चीनच्या वांग यू याच्यावर त्याने चौथ्या फेरीत विजय मिळवून या स्पर्धेत २.५ गुणांची कमाई केली आहे. या विजयामुळे आनंद एकटा तिसऱ्या स्थानावर आहे.पहिल्या स्थानावर असलेला अर्मेनियाचा लेव्हॉन अ‍ॅरोनियन व रशियाचा अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक यांनीही चौथ्या फेरीत आपापल्या लढती जिंकल्या व आपली गुणसंख्या तीनवर नेली. ग्रिसचुकने अझरबैजानच्या तैमूर राजबोव्हला नमविले तर अ‍ॅरोनियनने क्युबाच्या लिनियर डॉमिनगेझला पराभूत केले.आनंदने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना वजिरासमोरील प्याद्याने सुरुवात केली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत क्रामनिकविरुद्ध खेळतानाही आनंदने याच पद्धतीने आपल्या डावाची सुरुवात केली होती. आनंदने यावेळी आपल्या आवडत्या तंत्राचा वापर करताना झटपट वजिरावजिरी करून वर्चस्व मिळविले. वांगला मात्र आपल्या डावपेचांना न्याय देता आला नाही आणि आनंदने त्याच्याभोवती फास आवळला. शेवटी आनंदने ‘नॉकआऊट पंच’ देत सामना खिशात घातला.

धोनी ब्रिगेडने खेळपटय़ांचे टेन्शन घेऊ नये- टेलर
ख्राईस्टचर्च, २३ फेब्रुवारी/ पीटीआय

न्यूझीलंडच्या खेळपटय़ा या भारतीय संघासाठी डोकेदुखीचा विषय ठरत असला तरी न्यूझीलंडच्या खेळपट्टयांची प्रकृती आता बदललेली आहे. त्यामुळे धोनी ब्रिगेडने खेळपटय़ांचे टेन्शन घेऊ नये, असे मत न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर याने व्यक्त केले आहे.गेल्यावेळी भारतीय संघ २००२-०३ साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर दोन कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आाला होता. त्यावेळी खेळपट्टीच्या प्रकृतीमुळे त्यांची त्रेधा उडाली होती आणि तेव्हा २१९ ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती. पण त्यानंतर इथल्या खेळपटय़ांची प्रकृती बदलली असल्याने त्यांना हा दौरा तेवढा कठीण जाणार नाही. गेल्या वेळी जेव्हा भारतीय संघ येथे आला होता तेव्हा बऱ्याच क्रिकेट पंडीतांनी इथल्या खेळपटय़ांबद्दल काही चांगली तर काही वाईट मते मांडली होती. पण त्यानंतर इथल्या खेळपटय़ांमध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहे. मला असे वटते की भारतीय संघाने इथल्या खेळपटय़ांना घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे टेलरने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेच्या विश्वविजयानंतर निवृत्ती - बाऊचर
दरबान, २३ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेने २०११ ची विश्वचषक स्पर्धा जिंकावी, हे माझे स्वप्न आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मला निवृत्त व्हायचे आहे.. हे मनोगत आहे दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक मार्क बाऊचर याचे. आपल्या आजवरच्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत बाऊचर याने १२३ कसोटी व २७५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने यष्टीमागे ४६६ झेल टिपले आहेत. येथील स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना बाऊचर याने हे मनोगत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, अनेक जण मला निवृत्त होण्याचा सल्ला देत आहेत. निवृत्ती घेण्याइतके माझे वय झालेले नाही. माझे सध्या जेवढे वय आहे त्या वयात अनेक खेळाडूंची कारकीर्द चालू झालेली आहे. तो म्हणाला की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांत जाऊन आमच्या संघाने मालिका जिंकावी हे माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न एका वर्षीच प्रत्यक्षात आले हा योगायोगच म्हणावा लागेल.आता दक्षिण आफ्रिका संघाने विश्वचषक जिंकावा हे माझे एकमात्र स्वप्न आहे.अशा आनंदाच्या परमोच्च क्षणी निवृत्त होणे मला आवडेल, असेही तो म्हणाला. चपळ यष्टिरक्षणाबरोबरच घणाघाती फलंदाजीसाठीही बाऊचर प्रसिद्ध आहे. तो म्हणाला की, आणखी तीन वर्षे मी नक्की खेळू शकतो. माझी प्रकृती चांगली आहे. मुख्य म्हणजे आपण चांगले खेळू शकतो असा मला विश्वास आहे.

शिवांगची स्केटिंगमध्ये चमक
मुंबई, २३ फेब्रुवारी / क्री. प्र.
नेरुळच्या सेंट झेवियर्स शाळेच्या शिवांग खुळे याने चंदीगढ येथे झालेल्या स्पीड स्केटिंग राष्ट्रीय शालेय अजिंक्यपद स्पर्धेत रोड रेस पाच किलोमीटर प्रकारात रौप्यपदक विजेती कामगिरी केली. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करणारा शिवांग हा पहिलाच खेळाडू आहे. १४ ते १७ वर्षे वयोगटात शिवांग राष्ट्रीय स्तरावर सहाव्या स्थानावर आहे. शिवांगने यापूर्वी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात भाग घेऊन आपल्या कामगिरीची छाप सोडलेली आहे. गेल्या वर्षी तो बेल्जियम येथे स्केटिंग ग्रां प्रि स्पर्धेत सहभागी झाला होता. हाँगकाँग ओपन आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटिंग स्पर्धेतही त्याने दोन रौप्यपदके व एक कांस्य जिंकले. व्यावसायिक स्केटिंग करण्याचा शिवांगचा प्रयत्न आहे. सध्या तो संजय सिंग यांच्याकडे प्रशिक्षण घेत असून पुण्यात राहुल राणे यांचे मार्गदर्शन त्याला लाभत असते.

अंतरा मोने, दीपक शिंदे विजेते; मुंबई उपनगरचे वर्चस्व
मुंबई महापौर चषक मल्लखांब आणि अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स
मुंबई, २३ फेब्रुवारी/क्री.प्र.

अंतरा मोने (गोरेगाव जिमखाना) आणि दीपक शिंदे (समता क्रीडा भवन) यांनी मुंबई महापौर चषक स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मल्लखांब या प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावून आजचा दिवस गाजविला. चेंबूर हायस्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना आणि मुंबई उपनगर मल्लखांब संघटना यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धामधील अॅक्रोबॅटिक जिम्नस्टिक्स प्रकारामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्य़ाने मेन्स पेअर्स, वुइमेन्स पेअर्स, मिक्स पेअर्स, मेन्स ग्रुप आणि वुइमेन्स ट्रायो या पाचही प्रकारात अव्वल स्थान प्राप्त करत पूर्ण वर्चस्व गाजविले. त्यांच्या खालोखाल सांगली आणि मुंबई शहर संघांनी यश मिळविले. राज्य स्तरावरील या स्पर्धामध्ये गोरेगाव जिमखाना आणि जवाहर विद्या भवन यांनी अनुक्रमे १४ वर्षांखालील मुली आणि मुलगे या गटामधील सांघिक विजेतेपद जिंकले. १४ वर्षांवरील मुलांच्या टांगत्या मल्लखांबाच्या स्पर्धेमध्ये समता क्रीडा भवनचा अवलेश गुप्ता अजिंक्य ठरला.

उपनगर जिल्हा महापौर चषक कॅरम स्पर्धा
मुंबई, २३ फेब्रुवारी/क्री.प्र.

मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या विद्यमाने महापौर पुरस्कृत पुरुष/महिला एकेरी व १८ वर्षांखालील मुलांसाठी पहिली उपनगर जिल्हा मानांकन महापौर चषक कॅरम स्पर्धा ५ ते १० मार्च २००९ या कालावधीत मातृ दुग्धशाळा कर्मचारी वसाहत, ‘श्री’ सार्वजनिक गणेश मंडप हॉल, नेहरूनगर, कुर्ला (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली आहे. उपनगरातील इच्छुक स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज शुल्कासह २८ फेब्रुवारी २००९ पर्यंत सायं. ६ ते ९ या वेळेत वरील पत्त्यावर जमा करावेत. या स्पर्धेत मुंबई शहरातील खेळाडूही सहभागी होऊ शकतात.