Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

रस्त्यावरील स्लमडॉगचे रखरखीत वास्तव युगानुयुगे कायम !
ठाणे प्रतिनिधी

पथेर पांचाली, सलाम बॉम्बे आणि आता स्लमडॉग मिलीनिअर.. तिसऱ्या विश्वातील वंचितांच्या भावविश्वाची कथा चितारून वैश्विक पसंती मिळविलेल्या, भारतीय संदर्भ असलेल्या तीन चित्रकृती.. त्या निश्चितच नीतिकथा नाहीत. बोधकथा मात्र आहेत. जागतिक पातळीवर वेळोवेळी या वास्तवाची दखल घेतली जाऊनही ते बदलण्याचे प्रयत्न कायम तोकडे पडताना दिसतात. सोमवारी एकीकडे अमेरिकेत

 

‘स्लमडॉग..’वर ऑस्कर पारितोषिकांचा वर्षांव होत होता, तेव्हा दुसरीकडे अंबरनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित जत्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून भाकरीचा चंद्र शोधण्यास आलेले हे स्लमडॉग काही पैशांच्या अपेक्षेने आपापले काम शांतपणे करीत होते.
बालमजुरांचे हे शोषण आपल्या अवतीभोवती नेहमी अशा प्रकारे होताना दिसते. मात्र त्याबद्दल कधी कुणाला खंत वा खेद वाटत नाही. जत्रा मग ती कोणत्याही गावची असो. बच्चे कंपनीला त्याचे कायम आकर्षण वाटत असते. लहान मुले गर्दीतून आपल्या पसंतीच्या वस्तू खरेदी करीत असताना, रस्त्याच्या कडेला मांडलेल्या उघडय़ावरच्या दुकानातून त्यांच्याच वयाची मुले आपले सारे बालपण गहाण ठेवून खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत असलेली दिसतात. याच मुलांचे भावविश्व चितारणाऱ्या अनेक कलाकृतींना जागतिक पातळीवर लोकमान्यता मिळत आलेली आहे. मात्र चित्रपटांच्या अथवा कथा कांदबऱ्यांच्या रसग्रहणात कमालीची संवेदनशीलता दाखविणारा वर्ग हे वास्तव बदलण्याबाबत मात्र अनेकदा उदासीनता दाखवितो. आताही चित्रपट विश्वातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या ऑस्करने अगदी भरभरून पारितोषिकांचे माप स्लमडॉग..च्या पारडय़ात टाकले आहे. बालपणातच आयुष्याशी दोन हात करावे लागणाऱ्या या लिटिल चॅम्पच्या वाटय़ाला येणारे वास्तव या पुरस्कारानंतर बदलावे यासाठी जागतिक पातळीवर काही सकारात्मक प्रयत्न झाले, तर हा ऑस्कर आपल्याला पावला असे म्हणता येईल..