Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

डोंबिवलीत धगधगला सावरकर विचारांचा अंगार
डोंबिवली/प्रतिनिधी

स्वा. सावरकरांच्या विचारातील ‘माझे राष्ट्र, स्वातंत्र्यदेवतेविषयीचा यज्ञकुंड’ गाणी, पोवाडा, लावणी, नाटय़, भावगीते, नाटय़प्रवेश, भाषणांची झलक या माध्यमातून काल तीन तास सावित्रीबाई फुले रंगमंदिरात धगधगत होता. या यज्ञकुंडाच्या धगीने उपस्थित दर्दी रसिक श्रोते क्रांतिकारकाच्या भूमिकेत

 

जाऊन वीस ते पन्नास फुटाच्या अंतरावरून बहुआयामी सावकर अनुभवत होते.
निमित्त होते, अ‍ॅड जंक्शनच्या संचालिका अश्विनी मयेकर, कृष्णकांत मयेकर यांनी आयोजित केलेल्या ‘शतजन्म शोधिताना’ या सावरकर विचारांवरील कार्यक्रमाचे. स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती आणि मुरबाडच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल निर्मित या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता लेखन, निवेदन प्रसिद्ध निवेदिका मंजिरी मराठे यांनी केले आहे. डोंबिवलीत झालेला हा पहिलाच आणि अकरावा प्रयोग होता. सावरकर ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते.
या कार्यक्रमाला स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, साहित्यिक शं. ना. नवरे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे चेअरमन उदय कर्वे उपस्थित होते. अमृता सातभाई, वर्षां भावे, रूपाली देसाई, शैलेश दातार, अनुजा वर्तक, संजीव मेहेंदळे, दीपक वेलणकर, सागर साठे हे कलाकार सहभागी झाले होते. कोणत्याही जाती-धर्मावर टीका नाही, फक्त माझाच धर्म यावरही फारसे नाही ‘फक्त माझे राष्ट्र- माझा देश’ या विचारातून तयार करण्यात आलेला हा ५५ कलाकारांच्या पथकातील कार्यक्रम म्हणजे एक अलौकिक असे पारायण आहे.
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशातील प्रत्येक घरातील एका तरुणाने सैन्यात जावे म्हणून घोष केला जात आहे, बहुतांशी तरुणांच्या मनात सैन्यात जाण्याची हुरहूर वाढली आहे. सैन्यात जाण्यापूर्वी प्रत्येक तरुणाने पाहावा असा हा कार्यक्रम. अश्विनी मयेकर यांनी उपस्थित रसिकांचे स्वागत केले. मंजिरी मराठे यांनी प्रास्ताविकात, अशा कार्यक्रमांना तरुण पिढी नसते, असे सांगितले.
त्यामुळे त्यांना सावरकर विचार कळत नाही. तरुण मंडळींनी अधिकाधिक हा कार्यक्रम पाहावा, तो घराघरात जावा या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
मंजिरी मराठे आणि शैलेश दातार यांनी निवेदनातून सावरकरांचे विविध पैलू उलगडत कार्यक्रमाला ‘जयस्तु ते श्री महन्मंगले शिवस्तते शुभदे’ या गीताने सुरुवात झाली. सावरकरांचे कुलदैवत भवानी अष्टभुजेचे नमन करीत तरुण-तरुणींच्या पथकाने ‘हाती घेऊया हिंदू ध्वज हा उभारूया पुन्हा’ हे गीत स्वर-सुरांच्या तालावर सादर केले. सावरकर विज्ञाननिष्ठ होते. यंत्र हे मानवाच्या प्रगतीमधील महत्त्वाचे साधन आहे. यांत्रिक प्रगतीचा विचार करणारे सावरकर सैनिकी शिक्षणासाठी खूप आग्रही होते. भारताचे सैनिकीकरण झाले पाहिजे, हा त्यांचा विचार दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकर्षांने पुढे आला आहे.
सावरकर विचार त्यावेळी राज्यकर्त्यांनी ऐकला असता तर आज दहशतवादी हल्ला करण्याची कुणाची हिम्मत झाली असती का? असा प्रश्न उपस्थित करून ‘रामचंद्र चाकपाणी’ हे गाणे सादर करण्यात आले.
देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारून गेले असतानाच तमाशाच्या फडातील नाल टणटण करायला लागली आणि अनेकांचे डोळे विस्फारले. सावरकरांच्या अंगी जसे नवरस होते, त्यामध्ये देशभक्ती हा दहावा रस होता. देशभक्तीचा विचार करावयास लावणारे सावरकर छंद किती वाईट आहे हे लावणीच्या माध्यमातून मांडताना म्हणतात, नालेच्या तालावर सांगतात, ‘छंद नसे चांगला रे गडय़ा’. यावेळी ढोलकीपटूने घुमवलेली ढोलकी, लावणीतील रचनेने रसिक मंत्रमुग्ध झाले. चाफेकर बंधूंचे देशभक्तीचे कार्य पुढे न्यावे म्हणून सावरकरांनी १५ व्या वर्षी लिहिलेला ‘जयोस्तुते स्वतंत्र भगवते’ आणि त्यामध्येच शिवाजी, तानाजींचे गुणगौरव करणारी रचना पहाडी आवाजात सादर होताना अंगावर रोमांच उभे राहत होते.
सावरकर म्हणजे ज्वालामुखी आणि तो विचार बंदिस्त सभागृहात तुडुंब भरलेल्या सभागृहात लाव्हारसासारखा हेलकावे खात होता. ‘सकाळीच तू तोडिया असता जाईजुईच्या फुला’ हे भावकाव्य, ‘सुकतात जी जगीया हे’ नाटय़पद, दृकश्राव्याने दाखविलेली मारिया बोटीतून समुद्रात घेतलेली सावरकरांची उडी, त्यावेळी सादर झालेले ‘अनादी मी अनंत मी.हे गीत रसिकांना हेलावून गेले. ब्रिटिशांकडून होत असलेला छळ, जोखडात अडकल्यानंतर येसुबाईला लिहिलेले पत्र, याविषयी निवेदक सभागृहात बोलत असताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावत होत्या. शिवाजी हे प्रेरणास्थान मानलेल्या सावरकरांनी ‘जयदेव जयदेव जय शिवराया’ लिहिलेली आरती. ‘हे हिंदू नृसिंह सरस्वती प्रभो शिवाजी राजा’ या गीतांनी सावरकर विचार, वाणी, भाषेतील धारेचे दर्शन घडविले.
सावकरांची भाषणे दृकश्राव्य माध्यमाद्वारे दाखविण्यात आली. ही भाषणे ऐकून सावरकर आजच्या राज्यकर्त्यांना फैलावर घेत आहेत का? असे काही क्षण जाणवत होते.
क्रांतिकारक, प्रज्ञावंत, महाकवी, लेखक, नाटककार अशा अनेक भूमिकांमध्ये असलेले सावरकर पाहत पाहत. ‘उत्तरक्रिया
‘पानिपत’ या नाटय़प्रवेशाने वीस मिनीटे सभागृहात सन्नाटा आणि डोळ्यात अश्रुंच्या धारा वाहताना दिसत होत्या. उत्तरोत्तर रंगत गेलेला कार्यक्रम ‘शतजन्म शोधिताना, क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोनी’ या गीताकडे वळला. सावरकरांचा रत्नागिरीत प्रवेश झाला होता. देशभक्तीचे कार्य चालू ठेवत धगधगता हा अंगारा‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ म्हणत तब्बल तीन तासाने ट्रॅकवर लावलेल्या गाण्याने, उपस्थितांच्या पापण्या ओल्या करत पाठमोराच निघून गेला.
एक हजार खुच्र्यांवरील रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडात या देशभक्ताला विनम्रपणे सलाम केला.