Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

महाशिवरात्रीच्या दिवशी अंबरनाथ येथील शिवमंदिरात एकच गर्दी उसळली होती. भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे दर्शनासाठी जात असल्याचे दृश्य पहाटेपासूनच पाहायला मिळत होते.

रस्त्यावरील स्लमडॉगचे रखरखीत वास्तव युगानुयुगे कायम !
ठाणे प्रतिनिधी

पथेर पांचाली, सलाम बॉम्बे आणि आता स्लमडॉग मिलीनिअर.. तिसऱ्या विश्वातील वंचितांच्या भावविश्वाची कथा चितारून वैश्विक पसंती मिळविलेल्या, भारतीय संदर्भ असलेल्या तीन चित्रकृती.. त्या निश्चितच नीतिकथा नाहीत. बोधकथा मात्र आहेत. जागतिक पातळीवर वेळोवेळी या वास्तवाची दखल घेतली जाऊनही ते बदलण्याचे प्रयत्न कायम तोकडे पडताना दिसतात. सोमवारी एकीकडे अमेरिकेत ‘स्लमडॉग..’वर ऑस्कर पारितोषिकांचा वर्षांव होत होता, तेव्हा दुसरीकडे अंबरनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित जत्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून भाकरीचा चंद्र शोधण्यास आलेले हे स्लमडॉग काही पैशांच्या अपेक्षेने आपापले काम शांतपणे करीत होते.

डोंबिवलीत धगधगला सावरकर विचारांचा अंगार
डोंबिवली/प्रतिनिधी

स्वा. सावरकरांच्या विचारातील ‘माझे राष्ट्र, स्वातंत्र्यदेवतेविषयीचा यज्ञकुंड’ गाणी, पोवाडा, लावणी, नाटय़, भावगीते, नाटय़प्रवेश, भाषणांची झलक या माध्यमातून काल तीन तास सावित्रीबाई फुले रंगमंदिरात धगधगत होता. या यज्ञकुंडाच्या धगीने उपस्थित दर्दी रसिक श्रोते क्रांतिकारकाच्या भूमिकेत जाऊन वीस ते पन्नास फुटाच्या अंतरावरून बहुआयामी सावकर अनुभवत होते.

‘पंतप्रधानपदावर राष्ट्रवादीचा हक्क’
बदलापूर/वार्ताहर:
पंतप्रधानपदापर्यंत धडक मारण्याची ताकद महाराष्ट्रात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि महाराष्ट्राची ताकद दाखविण्याची येत्या लोकसभा निवडणुकीत संधी येणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी दिली. अंबरनाथ येथून प्रकाशित होणाऱ्या अंबरनाथ टाइम्स दैनिकाच्या २१ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. महाराष्ट्रात काँग्रेसने निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेऊ नये, लोकशाही आघाडीच्या दृष्टीने हा निर्णय अयोग्य असल्याचे आबा म्हणाले. पंतप्रधानपदापर्यंत धडक मारण्यासाठी पक्षातर्फे राज्यभरात मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली. भाषणात आर. आर. पाटील यांनी भाजपावर टीका केली.

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पितळे, सरचिटणीस शिंदे
ठाणे प्रतिनिधी

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ‘आपला वार्ताहर’चे प्रतिनिधी संजय पितळे, तर सरचिटणीसपदी ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ प्रतिनिधी दिलीप शिंदे विजयी झाले. सत्ताधारी प्रेरणा पॅनलने संघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले. विद्यमान प्रेरणा पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये अटीतटीची निवडणूक झाली. त्यात उपाध्यक्षपदी आनंद कांबळे (ठाणेवैभव), सहचिटणीसपदी राजेश मोरे (सकाळ), खजिनदारपदी संदीप शिंदे (महाराष्ट्र टाइम्स) विजयी झाले. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रेरणा भराडे (ई-टीव्ही), विनोद राय (सहारा समय), मनोज वाजपेयी (स्टार न्यूज), वीरेंद्र मिश्रा (हमारा महानगर) आणि परिवर्तन पॅनलचे विकास काटे (साम टीव्ही) निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत नाईक यांनी काम पाहिले.

वॉटरप्रूिफ गविषयी विनामूल्य मार्गदर्शन!
ठाणे/प्रतिनिधी

सर्वसाधारणपणे एप्रिल-मे महिन्यात विविध हौसिंग सोसायटय़ांमध्ये वॉटरप्रूिफग आणि दुरुस्त्यांची कामे सुरू असतात. मात्र त्यावेळी कडक ऊन असल्याने नव्याने केलेल्या प्लास्टर अथवा कोब्याला तडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळा जवळ आल्यावर नव्हे तर त्या आधी हिवाळ्यातच वॉटरप्रूिफगची कामे करावीत, असे मत या क्षेत्रातील ‘गुब्बी’ या कंपनीच्या संचालकांनी व्यक्त केले आहे.उन्हाळ्यात एकाच वेळी अनेक सोसायटय़ांमध्ये वॉटरप्रूिफ गची कामे सुरू असल्याने सर्वच ठिकाणी कुशल कामगार मिळतीलच, याची शाश्वती नसते. मग खर्च करूनही कामाचा दर्जा निकृष्टच राहतो. सगळीकडे एकाच वेळी कामे सुरू असली की, बांधकाम साहित्याचे भाव वधारतात. शिवाय मटेरियल्सही सुमार दर्जाचे असू शकते. वॉटरप्रूिफग म्हणजे जुना कोबा अथवा प्लास्टर तोडून नवीन करणे असाच सर्वसाधारणपणे समज असतो. मात्र वस्तुस्थिती तशी नसते. अशा विविध कारणांमुळे वॉटरप्रूिफगची कामे अनेकदा अयशस्वी ठरतात. यासंदर्भात गुब्बी कंपनीने नागरिकांना विनामूल्य सल्ला आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. संपर्क- ९३२४१०२४१०.