Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

विशेष लेख

‘स्लमडॉग’ने नेमके काय केले ?

‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटाबाबतच्या बातम्या आपल्याकडल्या सर्व माध्यमांमधून गेल्या सहा महिन्यात वाचकांनी ज्या उत्सुकतेने वाचल्या, तेवढं हॉलीवूडच्या कोणत्याही बातमीला आत्तापर्यंत महत्त्व दिलं गेलेलं नव्हतं. ‘गोल्डन ग्लोब’, ‘डायरेक्टर गिल्ड’, ‘रायटर गिल्ड’, ‘बाफ्टा’ या पुरस्कारांनी यापूर्वी कधीही वृत्तपत्रांच्या पहिल्याच काय, तर आतील पानांमध्येही जागा घेतली नव्हती. विशेष म्हणजे भारतातील सर्वसामान्य प्रेक्षकाच्याही खिजगणतीत हे पुरस्कार आजपर्यंत नव्हते. त्यामुळे ‘स्लमडॉग’ने खरं काय केलं असेल तर येथील सर्वसामान्य प्रेक्षकाला हॉलीवूडबाबत अधिक साक्षर बनविलं.

 


गेल्या वर्षीच्या मध्यावर एका वृत्तपत्रात ‘स्लमडॉग’बाबत जी पहिली बातमी आली होती, ती ‘फ्रिदा पिंटो’ नामक भारतीय मॉडेल एका हॉलीवूडपटात झळकणार अशा अर्थाची. फ्रिदा पिंटोच्या भल्या मोठय़ा चकचकीत फोटोसकट छापून आलेल्या या वृत्तात ‘डॅनी बॉयल’ या दिग्दर्शकाच्या उल्लेखाला शेवटी एका ओळीइतकंही महत्त्व दिलं गेलं नव्हतं.
काही दिवसांनी इरफान खान, अनिल कपूर हॉलीवूडच्या चित्रपटात काम करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या तरी डॅनी बॉयलविषयीच्या माहितीला काहीही महत्त्व नव्हतं. वास्तविक या दिग्दर्शकाचा ‘द बीच’ हा चित्रपट आपल्या चित्रपटांना वाहिलेल्या वाहिन्यांवर गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला आहे. शिवाय इथल्या डीव्हीडी मार्केटमध्ये त्याचे सर्व चित्रपट सहज उपलब्ध आहेत. तरी टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाने मिळविलेल्या ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’पर्यंत डॅनी बॉयलला आपल्याकडे महत्त्व दिलं गेलं नव्हतं.
पुढे बेस्ट ब्रिटिश इंडिपेंडंट फिल्म, वॉशिंग्टन डी.सी. फिल्म क्रिटिक्स अवॉर्ड, न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल आणि ऑस्करचा दावेदार मानला जाण्यासाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ रिव्ह्यू ऑफ मोशन पिक्चर्स’नेही या चित्रपटाला गौरविलं आणि डॅनी बॉयल एकाएकी किती मोठा आहे, हे माध्यमांमधून उच्चरवात बोललं जाऊ लागलं. याला कारण होतं ते कुठलाही ‘हाईप’ न करता डॅनी बॉयल यांनी भारतात सिनेमाचं शूटिंग केलं होतं. मुंबईत अशा प्रकारे हॉलीवूडपटाचं शूटिंग होणं हीच अजबगजब गोष्ट आहे. इथे कसं असतं, की कुठल्याही हॉलीवूड अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, गायक आणि गेला बाजार फुटकळ अभिनेत्रीलाही जगात इतरत्र कुठेही मिळत नसेल इतकी प्रसिद्धी आपल्या मीडियाकडून दिली जाते. हॉलीवूडमधलं कोणी इथं आलं रे आलं, की इंग्रजी वृत्तपत्रांना काय करू न् काय नको असं होऊन जातं. मग त्यांच्या मुखपृष्ठावर त्या गोऱ्यागोमटय़ा छब्या झळकू लागतात. त्यांच्या सचित्र मुलाखतींनी पानं सजवली जातात. भारतातलं त्यांना काहीही माहिती नसलं, तरी त्यांना भारतातलं काय आवडलं, त्यांचं भारतावर, बॉलीवूडवर किती प्रेम आहे, हे सगळं भरभरून मांडलं जातं.
मुंबईच्या लोकल ट्रेन्समधून, वर्दळीच्या रस्त्यांमधून, झोपडपट्टय़ांमधून या दिग्दर्शकाने कोणाच्याही नजरेत भरणार नाही अशा पद्धतीने इथे सिनेमा बनवला होता. गर्दीच्या ठिकाणी प्रसंगी हॅण्डिकॅमचा वापर केला होता. बॉलीवूडच्या तंत्रज्ञांचं सेकंड युनिट बनवून वर्षभरात सिनेमा बनवून हा दिग्दर्शक निघून गेला आणि तरीही आपल्या आंग्ल माध्यमांना त्यांची खबरही लागली नव्हती ही सर्वात नवलाची गोष्ट होती.
पण आता ऑस्करमुळे भारतातील सर्व अधिकृत आणि अनधिकृत डीव्हीडी मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या दिग्दर्शकांमध्ये डॅनी बॉयल यांचे चित्रपट आघाडीवर आहेत. नेमकं हेच चित्र जगातील इतर देशांमध्येही असल्याचं ‘ब्लॉगर्स’च्या नोंदीमधून दिसून आलं आहे. त्यामुळे ‘ट्रेनस्पॉटिंग’मुळे ओळखला जाणारा हा दिग्दर्शक ‘स्लमडॉग’मुळे आतात्ोरी जगातील अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, हे नक्की.
‘स्लमडॉग’ अल्पावधीत पायरसी मार्केटमध्येही अव्वल स्थानी पोहोचला आहे. आत्तापर्यंत जगात तयार करण्यात आलेल्या कुठल्याही चित्रपटाच्या इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट डीव्हीडी उपलब्ध झाल्या नाहीत, असं लंडनच्या ‘फेडरेशन ऑफ कॉपीराइट थेफ्ट’ या संस्थेनं केलेल्या पाहणीत स्पष्ट झालं आहे. लंडनमधील पायरसी मार्केटमध्ये ‘स्लमडॉग’ची एक पौंडात उपलब्ध असलेली डीव्हीडी प्रत सर्वाधिक लोकप्रिय बनली असल्याचं फेडरेशननं म्हटले आहे. अमेरिकेत आणि युरोपात ‘स्लमडॉग’सोबत आणखी चार पाच भारतीय सिनेमा असलेल्या डीव्हीडी अडीच डॉलरमध्ये उपलब्ध आहेत. ऑस्करच्या नामांकनानंतर, एकामागून एक पुरस्कार मिळविल्यानंतर या डीव्हीडीची मागणी जगातील पायरसी मार्केटमध्ये वाढू लागली आहे. विशेष म्हणजे ऑस्करसाठी नामांकन झालेल्या इतर चित्रपटांच्या डीव्हीडीदेखील उपलब्ध असताना मागणी केवळ ‘स्लमडॉग’चीच अधिक असल्याचं फेडरेशनच्या अहवालात मांडण्यात आलं आहे. भारतात हा चित्रपट प्रदर्शनाच्या दीड महिना आधी रस्त्यावरही उपलब्ध होता. त्यामुळे भारतात त्याला कमी प्रतिसाद मिळाला, असं सांगितलं जात असलं तरी यात तथ्य नाही. आपल्या प्रेक्षकांकडून ‘स्लमडॉग’ उचलला गेला नाही, कारण त्यांना पडद्यावर वास्तव दाखविलं गेलेलं आवडत नाही; भारतातील गरिबी, झोपडपट्टी या चित्रपटात येते, असा आक्षेपही सुरुवातीपासून मोठय़ प्रमाणावर घेतला गेला. मग परदेशी दिग्दर्शकानं तो बनविला या मुद्दय़ावरून टीका व्हायला लागली. जगभरात या चित्रपटाचं कितीही कौतुक झालं असलं तरी आपल्या भारतीय प्रेक्षकांची साधारण मानसिकता ‘स्लमडॉग’च्या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली आहे. आता आठ ऑस्कर मिळाल्यानंतर हेच टीकाकार प्रेक्षक वेगळ्या सुरात गाऊ लागले तर नवल वाटायला नको.
भारतीय चित्रपटांच्या बाजारपेठेवर वर्चस्व करण्यासाठी ‘स्लमडॉग’ला पुरस्कार दिला गेला किंवा आधीपासून त्याचं मोठय़ा प्रमाणावर प्रमोशन केलं जात होतं असा आक्षेपही नव्याने पुढे येऊ लागला आहे. एकाएकी दीड दशकांपूर्वी भारतीय सौंदर्यवतींना ‘मिस युनिव्हर्स’ आणि ‘मिस वर्ल्ड’ लाभले, तसाच हा प्रकार होत असल्याचे मुद्दे चर्चिले जात आहेत. पण या मुद्दय़ातही तथ्य नसल्याचं येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे. ‘स्लमडॉग’च्या यशानं हुरळून जाऊन हॉलीवूडच्या दिग्दर्शकांकडून इथे बनविले जाणारे सिनेमे तितक्याच तोडीचे बनतील याची खात्री कुणी देऊ शकत नाही. ‘स्लमडॉग’मुळे इथल्या झोपडपट्टय़ा ‘पर्यटन केंद्र’ निर्माण होण्याची शक्यता मात्र नाकारता येणार नाही.
‘स्लमडॉग’नं सर्वात महत्त्वाचं काम काय केलं असेल, तर भारतातील सिनेमात ऑस्कर मिळविण्याची क्षमता आहे, हे इथल्याच दिग्दर्शकांना दाखवून दिलं आहे. बॉईलनं आपल्या शैलीची इथल्या पारंपरिक चित्रपटांशी सांगड घालत एक ‘बॉलीवूड पट’च जगात लोकप्रिय केला आहे. संख्येने दरवर्षी अमेरिकेतील चित्रपटांच्या तिप्पट, ब्रिटिश चित्रपटांच्या चौपट चित्रपट देणारा आपला बॉलीवूड सिनेमा अद्याप हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेही ऑस्कर का मिळवू शकला नाही, याची उत्तरं आता तरी आपल्या दिग्दर्शकांना ‘स्लमडॉग’मुळे उमजली तर ऑस्करची बाहुली भारतात आगामी काळात आपल्या देशात सातत्याने येण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, हे मात्र खरं.
पंकज भोसले

‘क्यू अँड ए’.. अँड ‘स्लमडॉग’!
प्रिटोरियात भारतीय राजदूत म्हणून कार्यरत असणारे विकास स्वरूप यांच्या २००५ साली आलेल्या ‘क्यू अँड ए’ या पहिल्याच कादंबरीने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आतापर्यंत ४० भाषांमध्ये पोहोचलेल्या या कादंबरीची आधी आपल्या लोकप्रिय पुस्तक बाजाराकडून फारशी दखल घेतली नव्हती. ‘डॅनी बॉयल’सारख्या दिग्गज दिग्दर्शकाने कादंबरीच्या प्रेमात पडून यावर चित्रपट काढण्याचं पक्कं केलं यातच या कादंबरीचं वेगळेपण सिद्ध होतं. समकालीन भारताचं वास्तव चित्रण इतक्या सहजपणे या कादंबरीत रेखाटलं गेलंय की, कुणीही या कादंबरीच्या प्रेमात पडेल. दररोज नजरेस पडूनही दुर्लक्षिलं जाणारं जग विकास स्वरूप यांनी यात उलगडून दाखवलंय.
राम मुहंमद थॉमस या तीन वेगवेगळ्या धर्माच्या वाटणाऱ्या नावाच्या मुख्य पात्राच्या, जगातल्या सर्वात मोठं बक्षिस असलेल्या प्रश्नमंजुषेत जिंकण्यापासून ही कथा सुरू होते. अत्यंत कठीण अशा १२ प्रश्नांची उत्तरं एका दरिद्री, निरक्षर आणि अनाथ मुलाला कशी काय येऊ शकतात? नक्कीच याने काहीतरी चलाखी करून स्पर्धा जिंकली आहे, या संशयावरून कार्यक्रमाचे संयोजक त्याला एक अब्ज रुपये देण्याऐवजी तुरुंग दाखवितात. राम मुहंमद थॉमस मात्र आपण कोणताही खोटेपणा केलेला नाही, या म्हणण्यावर ठाम राहतो. वकिलाला आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचे संदर्भ सांगत तो या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत नेतो. १८ वर्षांच्या आयुष्यात अनाथ म्हणून वावरताना जे शिकायला मिळालं त्यातच या कठीण प्रश्नांची उत्तरं कशी दडलेली असतात, हे खुद्द राम मुहंमद थॉमसच्या मजेदार निवेदनातून ऐकणं हा एक सुखद अनुभव आहे. कल्पनेच्या अनेक भराऱ्या यात लेखकाने मारलेल्या असल्या तरी यातील सगळ्या घटना वास्तवाशी जोडणाऱ्या आहेत.
आजच्या भारतीय मध्यमवर्गाची विचारसरणी, त्यांचं जगणं, इथली झोपडपट्टी, चाळसंस्कृती, क्रिकेट आणि सिनेमाचं येथील लोकांना असलेलं वेड, इथली गुळगुळीत प्रसारमाध्यमं, भ्रष्टाचार, इथली राजरोस चालणारी गुन्हेगारी, डोळ्यात खुपणारी श्रीमंती आणि त्यापेक्षा कितीतरी पटीने असणारी गरिबी. जातीभेद आणि धर्माच्या नावावर चालवल्या जाणाऱ्या दंगली, ट्रेनमधले भिकारी, डब्बेवाल्याचं विलक्षण वेगवान आयुष्य, चित्रपटातील प्रसिद्ध कलाकारांचं असुरक्षित जगणं, परदेशातील राजदूतांना भारतीयांबद्दल वाटणारी घृणा, हे सारं विकास स्वरूप यांनी राम मुहंमद थॉमसच्या नजरेतून भन्नाट शैलीत उभं केलंय. यातील विनोदाच्या अंगाने येणारी वास्तवता बोचरी आणि अंतर्मुख करणारी आहे. म्हणूनच यातील राम मुहंमद थॉमस हे नाव काहीसं मुद्दाम बेतलेलं वाटत असेल, तर त्यात बरचंसं तथ्य आहे. रस्त्यावर टाकून देण्यात आलेल्या मुलाला हे नाव कसं पडलं, यातील दीर्घ कहाणी प्रत्यक्ष वाचण्यातच खरी मजा आहे.
राष्ट्रकुल लेखकांच्या कादंबरीसाठी दिल्या जाणाऱ्या पहिल्या पुरस्कारासाठी या कादंबरीची शिफारस झाली होती. बी.बी.सी. रेडियोवर या संपूर्ण कादंबरीचे वाचन करण्यात आले असून, नितीन सहाय यांनी कादंबरीवरून तयार केलेल्या संगीतिकेलाही अनेक पुरस्कार लाभले आहेत. हार्पर कॉलिनने कादंबरीचे ऑडियो हक्क विकत घेतले आहेत. ‘स्लमडॉग मिलिऑनर’ नावाने आता हीच कादंबरी भारतात लोकप्रिय झाली असून लेखकाच्या ‘सिक्स सस्पेक्ट्स’ या पुस्तकालादेखील मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. ‘‘चित्रपटाबाबत मी पूर्णपणे समाधानी आहे. ‘स्लमडॉग मिलिऑनर’ हा चित्रपट दृश्यपरिणामांमध्ये सर्वोत्तम बनला असून भावनात्मक पातळीवरदेखील सर्व अपेक्षा पूर्ण करणारा आहे, कादंबरीचे चित्रपटात रूपांतरण होताना त्यात बरेच बदल झाले असले, तरी कादंबरीच्या आत्म्याला धक्का लागला नसल्याचे, विकास स्वरूप यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. माझी कादंबरी सांगू पाहते तेच चित्रपटाच्या दृश्यात्मक माध्यमात अत्यंत योग्य पद्धतीने मांडण्यात आले आहे. त्यामुळे कादंबरी बदलल्याचा चित्रपटावर आक्षेप घेण्याची काहीच गरज नाही,’’ असे विकास स्वरूप यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.