Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

विविध

खेळाडू-सिनेस्टार्सची लोकप्रियता कॅश करण्याची राजकीय चढाओढ
नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी / पी.टी.आय.

 

चित्रपट तारे-तारकांप्रमाणेच खेळाडूंनाही आता राजकारणाची ओढ वाटू लागली आहे. विशेषत: खेळाच्या शिखरावर पोहोचलेल्या क्रिकेटपटूंना आपल्याकडे खेचून आणण्याची चढाओढ राजकीय पक्षांमध्ये असायची. आता अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडूंची लोकप्रियता ‘कॅश’ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी लोकप्रिय खेळाडू आणि सिनेस्टार्सना उमेदवारी देऊन विजय निश्चित करण्याचाच राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे.
राजकारणात आलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन याचीही भर पडली आहे. अझरने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन नवी इनिंग सुरू केली. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना अझरूद्दीनच्या काँग्रेस प्रवेशाला विशेष महत्त्व आले आहे. अझरुद्दीनला हैदराबादेतून उमेदवारी दिली जाईल, असे संकेत मिळालेआहे. त्यानेही हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा त्यानेप्रगट केली आहे. क्रिकेटपटूंच्या पंक्तीत आता भारताचा नेमबाज जसपाल राणाही आला आहे. त्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून त्याला उत्तराखंडातून उमेदवारी दिली जाणार आहे.
राजकारणाकडे वळणाऱ्या सिनेस्टार्सची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुनील दत्त यांचे वारस म्हणून प्रिया दत्त यांना काँग्रेसने राजकारणात आणले खरे. परंतु, प्रियाशी मतभेद झाल्याने तिचा भाऊ ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ फेम अभिनेता संजय दत्त याने समाजवादी पक्षात प्रवेश केला असून पक्षाने लखनौमधून त्याची उमेदवारी जाहीर केली आहे.
अझरचा राजकारण प्रवेश नवखा असला तरी क्रिकेटपटूंची राजकारणात येण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी १९७१ मध्ये टायगर पतौडी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती . शिवाय चेतन चौहान (उत्तर प्रदेश), कीर्ती आझाद (बिहार) आणि नवज्योत सिंग सिद्धू (पंजाब) यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून राजकीय ‘इनिंग’ सुरू केली आहे. ओरिसाचे क्रिकेटपटू रणजिब बिस्वाल खासदार होते. हॉकीपटू असलम शेर खानही राजकारणात आहेत. या खेळाडूंसोबतच माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि अनिल कुंबळे यांची नावेही सध्या चर्चेत आहेत. वेंगसरकर राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेकडे उमेदवारीसाठी चाचपणी करीत आहे. तर राजकारणात येण्याची सध्या मानसिक तयारी नसल्याचे विक्रमवीर अनिल कुंबळेचे म्हणणे आहे. कुंबळेला लोकसभेची उमेदवारी देण्यात काहीही गैर नाही, असे सांगताना कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद गौडा म्हणाले, कुंबळे किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप अधिकृतरित्या पक्षाकडे उमेदवारीसाठी विनंती करण्यात आली नाही.
दिलीप वेंगसरकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेतर्फे निवडणूक लढण्याची इच्छा प्रगट केली असल्याचे मनोहर जोशी यांनी सांगितले. माजी कर्णधार सौरभ गांगुलीही राजकारणात येत असल्याची जोरदार चर्चा होती मात्र, मागील आठवडय़ात त्याने राजकारणात येण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला तर भारताचा माजी जलदगती गोलंदाज चेतन शर्मा बसपाच्या उमेदवारीवर डोळा ठेवून आहे.

सिटीग्रुपचे विक्रम पंडित यांचे भवितव्य अधांतरीच
वॉशिंग्टन, २३ फेब्रुवारी/ पीटीआय

अमेरिकेच्या वित्तीय व्यवस्थेतील अरिष्टापायी संकटात सापडलेला जागतिक वित्तीय समूह सिटिग्रुपचे भारतीय वंशाचे सीईओ विक्रम पंडित यांच्या नोकरीवरील गंडांतर अद्याप पुरते सरलेले नाही. या वित्तीय समूहाला जीवदान देण्यासाठी अमेरिकेच्या सरकारने ४५ अब्ज डॉलरचे भांडवली सहाय्य यापूर्वीच दिले असून, या उप्पर आणखी मदत स्वीकारायची गरज पडल्यास पंडित यांनाही आपली नोकरी गमवावी लागेल, असे संकेत मिळत आहेत. सिटिग्रुपमध्ये पडझडीला सुरुवात झाली असताना, पंडित यांची डिसेंबर २००७ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर संकट निवारक या मुख्य हेतूने नियुक्ती केली गेली होती. पण तरीही नोव्हेंबर २००८ मध्ये सिटिग्रुपला तारण्यासाठी अमेरिकेच्या सरकारला पाऊल टाकावे लागले. सरकारकडून आठ टक्क्यांच्या घरातील भागभांडवली सहभाग मिळवीत असतानाच, पंडित यांची उचलबांगडी करण्याबाबत वरिष्ठ वर्तुळात विचारविमर्श सुरू होता. पण त्यावेळी टळलेले हे गंडांतर आणखी मदत मिळविण्याचा प्रसंग आल्यास पुन्हा येऊ शकेल, असे वॉल स्ट्रीटवरील संकेत सूचित करीत आहेत. गेल्याच आठवडय़ात विक्रम पंडित यांनी सिटिग्रुपचा डोलारा पुरता सावरला जाईपर्यंत वार्षिक केवळ एक डॉलर इतके नाममात्र वेतन स्वीकारण्याचा निर्णय स्वत:हून जाहीर केला होता.

नॉयडातील चकमकीत दोन ठार
नॉएडा, २३ फेब्रुवारी/पी.टी.आय.

नॉयडात आज एका गुन्हेगारांची टोळी व पोलिसांत झालेल्या जोरदार चकमकीत दोनजण ठार झाले तर एक पोलीस जखमी झाला. नॉयडातील फेज २ मधील एका फॅक्टरीबाहेर प्रथम फॅक्टरीचा सुरक्षा रक्षक आणि ५/६ जणांच्या टोळक्यात रात्री ८.२५ वाजता चकमक झाली. या टोळक्याला फॅक्टरीची चावी हवी होती ती देण्यास रक्षकाने नकार दिल्याने त्यांनी रक्षकावर गोळीबार सुरू केला. इतक्यात घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांनी गांभीर्य ओळखून गुन्हेगारांवर गोळीबार केला. या चकमकीत दोन गुन्हेगार ठार झाले. पोलिसांनी गोळीबार करताच प्रत्युत्तरादाखल या गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीसही जखमी झाला. या वेळी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन अन्य गुंड घटनास्थळाहून पळून जाण्यात यशस्वी ठरले. हे गुन्हेगार एका मोटारीतून आले होते.