Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

यश मिळेल
पंचमात शनी, दशमात बुध-गुरू, लाभात सूर्य या ग्रहांतील प्रतिसाद विचारांना वेग देऊन कर्तृत्वाला उत्थान देतील. तरीही मधून मधून काही प्रकरणांना मार्गावर आणण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागणार आहे. मेष व्यक्तींनी सतर्क राहून लाभ उठवला तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक क्षेत्रांत चांगले यश मिळेल. नामवंत मंडळींचे सहकार्य लाभेल. मंगलकार्याची चर्चा कदाचित पुढे ढकलावी लागेल.
दिनांक : २२ ते २५ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्नाने यश व्यापक करता येईल.

पुढे सरकत राहाल
भाग्यात बुध-गुरू, दशमात सूर्य, लाभात शुक्र या ग्रहस्थितीमुळे वृषभ व्यक्तींचा प्रयत्नरथ नवनव्या क्षेत्रांतून पुढे सरकत राहील. नवे विजय त्यात समाविष्ट होतील. साहित्य, शिक्षण, कला, विज्ञान, व्यापार या प्रांतांतील प्रवास आकर्षक ठरणार आहे. चतुर्थातील शनीमुळे प्रपंचातील प्रश्न मात्र संयमानेच सोडवावे लागतील. पैशांचे व्यवहार, शेती यामध्ये स्वत: लक्ष घालावे. महाशिवरात्र सत्कारणी लागेल.
दिनांक : २३ ते २७ अनुकूल काळ.
महिलांना : सर्वच क्षेत्रांत प्रभाव प्रस्थापित होईल.

वाद नियंत्रणात ठेवाल
रवि-शनीच्या सहकार्याने कार्यप्रांतात उभे राहता येईल. मीन शुक्र निराश होऊ देणार नाही, तरीही अष्टमात बुध, मंगळ, गुरू, राहू यांचा सहयोग असेपर्यंत अडखळतच व्यवहार पूर्ण करावे लागतील. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. चर्चा, बैठकी, देवघेव यांमध्ये संयम ठेवला तर वादाची व्याप्ती नियंत्रणात ठेवता येईल. बुधवारी अमावास्या संपताच नवीन उपक्रमांचा शोध घेता येईल. मौल्यवान वस्तू सांभाळा. औषधोपचार, पथ्य यांवर लक्ष ठेवा.
दिनांक : २४ ते २८ प्रयत्नांनी प्रश्न सुटतील.
महिलांना : अवास्तव साहस करू नका.

बदलांनी यश लाभेल
साडेसाती, अष्टमात सूर्य यांच्यामुळे कार्यक्रम आणि वेळापत्रक यांच्यामध्ये छोटे-मोठे बदल करून बुध- गुरू युतीच्या सहकार्याने मिळेल तेवढे यश पदरात पाडून घ्यावे लागते. मीन शुक्राचा प्रतिसाद प्रपंच आणि प्राप्तीला आधार देतील. त्यामुळे महत्त्वाची प्रकरणे पुढे सरकवता येतील. प्रवास कराल. मंगलकार्य ठरावे. बुध- शुक्र शुभयोग बौद्धिक आणि कला प्रांतात प्रभाव निर्माण करतो. महाशिवरात्र प्रसन्न घटनांची ठरावी.
दिनांक : २२, २३, २७, २८ शुभ काळ.
महिलांना : सत्कारणी प्रयत्नांचा आनंद लाभेल.

धावपळ करावी लागेल
सिंह व्यक्तींच्या समोर नवे नवे प्रश्न उभे राहतील. अवघड अडचणी दूर करण्याचे प्रसंग त्यांत असतील. प्रतिष्ठेला ग्रहण लागू नये यासाठी शनिवापर्यंत सारखी धावपळ करावी लागणार आहे. मारुतीची उपासना-आराधना यात आधार देईल. देवघेवीत सावध राहा. नवीन व्यक्तींशी अवास्तव संपर्क टाळा. साडेसाती, अनिष्ट गुरू, राहू यांच्यामधून सिंह व्यक्तींसमोरील समस्या वाढतील. चुका, वाद, स्पर्धा कटाक्षाने टाळा.
दिनांक : २२, २३, २७, २८ समस्या वाढतील.
महिलांना : प्रकृतीवर लक्ष व प्रपंचात संयम ठेवा.

प्रतिमा उजळून निघेल
पंचमात बुध-गुरू युती होत आहे. तसेच बुध- शुक्राचा शुभयोग प्रयत्न-प्रगतीच्या समन्वयाचा मुख्य दुवा ठरणार असल्याने आक्रमक रवि-शनीवर नियंत्रण ठेवून प्रतिमा उजळून काढणारी सफलता कन्या व्यक्तींना मिळवता येईल. त्यात गुप्तता, शिस्त, सत्य यांचा उपयोग विशेषत्वाने करून घेऊ शकाल. शिक्षण, साहित्य, विज्ञान प्रांतातील कन्या व्यक्तींभोवती नवं वलय तयार होणं शक्य आहे.
दिनांक : २२, २३, २७, २८ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न करा, यश मिळेल.

प्रयत्न-यशाचं समीकरण अवघड
चतुर्थात गुरू, राहू, बुध, मंगळ यांचा सहयोग असेपर्यंत तुला व्यक्तींचं प्रयत्न-यशाचं समीकरण अचूक जमणं अवघड आहे. परंतु निराश होऊन ध्येयकार्यापासून विचलित होऊ नका. रवि-शनीमधील काही प्रतिसाद प्रतिष्ठेच्या संरक्षणाचे ठरतील. त्यामुळे नियमित उपक्रम आपण पूर्ण करू शकाल. बुध-गुरू युती, बुध-शुक्र शुभयोगामुळे छोटय़ा छोटय़ा प्रसंगांमध्ये शनिवापर्यंतचा प्रवास उत्साहात पूर्ण करता येईल.
दिनांक : २२, २३, २७, २८ चकमकी नकोत.
महिलांना : गोड बोलूनच कार्यभाग साधावा लागणार आहे.

श्रेष्ठत्व सिद्ध होईल
पराक्रमी बुध-गुरू युती, पंचमात शुक्र आणि बुध, शुक्राचा शुभयोग, दशमात शनी. याच ग्रहकाळात प्रपंचापासून परमार्थापर्यंत श्रेष्ठत्व सिद्ध करणारी शक्ती लाभेल. विज्ञान क्षेत्रातही अशाच प्रकारचा अनुभव येईल. परिणामी आनंदाचे वातावरण राहील. शनिवापर्यंत वृश्चिक व्यक्ती कोठेतरी सतत पुढे सरकत असल्याचे दृष्टिपथात येत राहील. त्यामुळे तुमच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावतच
राहील. यंदाची महाशिवरात्र अविस्मरणीय ठरेल. ती शुभफल घेऊन येणारी ठरेल. बुधवारी अमावास्या संपताच वृश्चिक व्यक्तींची प्रगती नव्या प्रकाशात झगमगू लागेल. त्यामुळे सत्ताशक्ती मजबूत होण्यास मदत होईल.
दिनांक : २२, २३, २७, २८ शुभ काळ.
महिलांना : संसार, सामाजिक तसेच बौद्धिक क्षेत्रात प्रभाव वाढत राहील.

प्रगतीची चक्रे वेगाने फिरतील
पराक्रमी सूर्य, भाग्यात शनी, मकर मंगळ, मीन शुक्र. धनू व्यक्तींची राशीकुंडली याच ग्रहांनी प्रबळ केलेली असल्याने रविवारच्या चंद्र-बुध-गुरू यांच्या युतीपासून सर्वच क्षेत्रांतील प्रगतीची चक्रे वेगाने फिरू लागतील. त्यांत बौद्धिक प्रांत, सत्ताकेंद्र, व्यापारी क्षेत्र यांचा समावेश राहील. महाशिवरात्र परमेश्वरी चिंतनात आनंद देणारी ठरेल. मंगलकार्ये ठरतील. प्रवास कराल. आर्थिक समस्या सुटतील. प्रकृतीवर रामबाण औषध सापडेल.
दिनांक : २२ ते २५ शुभ काळ.
महिलांना : संधीतून प्रभावी सफलता संपादन करता येईल.

कराल ती पूर्व
राशीस्थानी मंगळ आणि बुध-गुरू युती, पराक्रमी शुक्र आणि बुध-शुक्र शुभयोग. याचग्रहकाळात ‘कराल ती पूर्व’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय येतो. रविवारच्या चंद्र- बुध- गुरू सहयोगातून शुभ प्रतिसाद प्रकट होऊ लागतील. त्यातून आर्थिक समस्या सुटतील. व्यापारात जम बसवता येईल. प्रपंचाची घडी बसवू शकाल. राजकारणात श्रेष्ठत्व सिद्ध करता येईल. दुर्लक्ष, आळस, अवास्तव साहस यांमध्ये अष्टमातील शनी त्रास देऊ शकतो. सावध राहा आणि पुढे चला. सचोटीने काम करीत राहा.
दिनांक : २३ ते २७ शुभ काळ.
महिलांना : आकर्षक खरेदी व्हावी. शुभकार्ये ठरतील. समाजात मानसन्मान मिळतील.

प्रकाश दृष्टिपथात येईल
गुरू, राहू, बुध, मंगळ यांचा सहयोग व्ययस्थानी असेपर्यंत कुंभ व्यक्तींना अनेक दिव्यांतून बाहेर पडावे लागणार आहे. सावकार, सरकार, संसार, समाज असे विभाग त्यात समाविष्ट असतील. राशीस्थानी सूर्य, मीन शुक्र, सिंह शनी यांच्यातील प्रतिक्रिया संधी देतील आणि इभ्रतही सांभाळतील. त्यामुळे दिव्याची धास्ती नको. कल्पकता आणि परिश्रम यांचा कृतीशी समन्वय साधा. बुधवारच्या अमावास्येनंतर थोडाफार नवा प्रकाश दृष्टिपथात येईल.
दिनांक : २५ ते २८ शुभ काळ.
महिलांना : झगडूनच यश मिळवावे लागेल.

सहज समन्वय साधाल
राशीस्थानी शुक्र, लाभात बुध-गुरू युती आणि बुध-शुक्राचा होणारा शुभयोग. विचार, कृती आणि यश यांचा सहज समन्वय साधला जावा असा हा ग्रहकाळ आहे. अनिष्ट रवि आणि शनीमुळे पैसा अधिक खर्च करावा लागेल. ऐनवेळच्या समस्या दूर करण्यासाठी धावपळ करावी लागेल. पण त्यामुळे यशावर कुठल्याही प्रकारे अनिष्ट परिणाम होणार नाही. शनिवापर्यंत व्यापारी पेठ, राजकारण, कलाप्रांत, साहित्य क्षेत्र यांमध्ये ठसा उमटविणारी सफलता मिळत राहील. महाशिवरात्र धर्मकार्यातून आनंद देणारी आहे.
दिनांक : २२, २३, २७, २८ शुभ काळ.
महिलांना : अचूक अंदाज आणि बिनचूक कृतीच आपल्याला नेत्रदीपक यश मिळवून देणार आहे. प्रपंच आणि सामाजिक कार्यातही यशस्वी व्हाल.