Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

अग्रलेख

..आणि उर्वरित ऑस्कर!

 

‘स्लमडॉग मिलिऑनर’ आणि ए. आर. रहमान यांना मिळालेल्या ऑस्कर पुरस्कारांची चर्चा आता काही आठवडे सुरू राहणार आहे. ‘स्लमडॉग’ पेक्षा, स्पर्धेतील इतर चित्रपट अधिक गुणवत्तेचे आणि योग्यतेचे होते अशा युक्तिवादापासून तर ‘ऑस्कर’ला महत्त्व देणेच मुळात चुकीचे आहे, इथपर्यंत अनेक मुद्देही आता पुढे येतील आणि त्यावर उलटसुलट बाजू मांडल्या जात राहतील. हे गेली अनेक वर्षे सुरू आहे. कोणतेही पुरस्कार एकाच वेळी सगळ्यांचे समाधान करू शकत नाहीत. सुमारे पाच हजारहून अधिक सदस्यांच्या मतदानातून पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या ‘ऑस्कर’बाबत वेळोवेळी वाद झाले आहेत. परंतु अखेर एकच सत्य शिल्लक राहते, ते म्हणजे काही चित्रपट, काही व्यक्तींना पुरस्कार मिळाले आणि काहींना मिळाले नाहीत. यावर्षी भारतीयांना या चर्चेत जरा अधिक रस आहे, कारण ‘स्लमडॉग’ हा अनेक अर्थानी भारतीय चित्रपट आहे. ‘स्लमडॉग’च्या प्रदर्शनापासूनच त्याच्याविषयी भिन्न मतप्रवाह होते. काहींना तो बेफाम आवडला, काहींना बरा वाटला तर काहींना अजिबात आवडला नाही. काहींनी त्यातील गरिबीच्या, दारिद्रय़ाच्या प्रदर्शनाबद्दल नापसंती व्यक्त केली आणि तो ‘अमेरिकन कट’ असल्याचा हास्यास्पद दावा केला. असे आरोप करणाऱ्या मंडळींमुळे ‘स्लमडॉग’च्या ‘सिनेमॅटिक’ गुणवत्तेवर वाद होण्याऐवजी चर्चेला भलतेच वळण मिळाले. परंतु आता एकदा चित्रपटावर ऑस्करच्या आठ पुरस्कारांचा शिक्का बसल्यानंतर तात्पुरता वाद बाजूला ठेवून इतर पैलूंकडे पाहिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ऑस्कर’ जरी ‘स्लमडॉग’च्या पदरात पडले असले तरी सवरेत्कृष्ट चित्रपटासाठीच्या स्पर्धेतील इतर चित्रपटही तोलामोलाचे होते. विशेषत: ज्यांनी ‘द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन’ हा चित्रपट पाहिला आहे, त्यापैकी अनेकांना, त्याला ऑस्कर न मिळाल्याबद्दल खंत वाटली. ‘स्लमडॉग’च्या बरोबरीने या चित्रपटाला विभागून पुरस्कार मिळायला हवा होता असेही अनेकांना वाटले. या चित्रपटाच्या विषयाची नुसती ओळख जरी आपण करून घेतली तरी ‘हॉलीवूड’मधील व्यावसायिक चित्रपट भारतीय चित्रपटांच्या मैलोगणती पुढे आहेत याची खात्री पटेल. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीच्या सुमारास या चित्रपटाची कथा सुरू होते. बेंजामिनचा जन्म होतो तेव्हा तो ‘म्हातारा’ असतो आणि जसजसे त्याचे वय वाढू लागते तसा तो तरुण होत जातो. म्हणजे वयाची प्रक्रिया या नायकाच्या संदर्भात उलट दिशेने होते. या ‘उलट वाढीचा’ त्याच्या आयुष्यावर, मनोविश्वावर आणि नातेसंबंधांवर झालेला परिणाम हा चित्रपट दाखवतो. सवरेत्कृष्ट चित्रपटासाठीच्या स्पर्धेतील इतर चित्रपट होते ‘फ्रॉस्ट’, ‘मिल्क’, आणि ‘द रीडर’. यापैकी ‘फ्रॉस्ट’ची कथा-कल्पनाही लक्षवेधी आहे. १९७४ साली आपल्या पदाचा राजीनामा दिलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हे त्यानंतर सार्वजनिक जीवनातूनही निवृत्त झाले. टी.व्ही.वरील एका मुलाखतीच्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डेव्हिड फ्रॉस्ट हा निक्सन यांना मोठी रक्कम देतो आणि टी.व्ही.वर प्रदीर्घ मुलाखत देण्यास राजी करतो. ही मुलाखत म्हणजे स्वत:चे राजकीय पुनर्वसन करण्याची नामी संधी आहे असे निक्सन यांना वाटत असते. तर डेव्हिड फ्रॉस्ट या मुलाखतीकडे स्वत:ला एक गंभीर राजकीय पत्रकार म्हणून स्थापित करण्याचा मार्ग म्हणून पाहत असतो. या दोघांचा ‘माइंड गेम’ म्हणजे हा चित्रपट होय. ‘मिल्क’ या चित्रपटातील भूमिकेसाठी शॉन पेन या अभिनेत्याला सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. समलिंगींना सर्वसामान्य नागरिक समजले जावे आणि त्यांनाही सर्व अधिकार मिळावेत यासाठीच्या एका लढय़ाचे चित्रण हा चित्रपट करतो. अर्थात चित्रपटातील कथानकाचा काळ १९७० चा आहे. कारण वर्तमानात समलिंगींचे अधिकार बहुतांश पाश्चिमात्य देशात मान्य करण्यात आलेले आहेत. परंतु त्यांच्यासंबंधी एकेकाळी किती नकारात्मक वातावरण होते आणि कोणत्या मानसिक उलघालीतून त्यांना जावे लागले हे ‘मिल्क’ पाहून कळते. समलिंगींच्या या लढय़ाचा हा सुरुवातीचा काळ सध्या आपण आपल्या देशातही पाहतो आहोत. अनेकदा नॉमिनेशन मिळूनही ऑस्कर पुरस्काराने सतत हुलकावणी दिलेल्या केट विन्स्लेटने ‘द रीडर’मधील भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या वर्षी अखेर मिळवला. भारतीयांना विन्स्लेटची ओळख मुख्यत: आहे ती तिच्या ‘टायटॅनिक’मधील भूमिकेने. या वर्षी पुरस्कार मिळवताना तिने मेरिल स्ट्रीप आणि अँजेलिना ज्योली यासारख्या मातब्बर प्रतिस्पध्र्यावर मात केली. १९७८ ते २००८ या तीन दशकांच्या अभिनय प्रवासात मेरिल स्ट्रीपला आजवर १५ वेळा ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. त्यात १९७९ साली ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर’ साठी तिला सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तर १९८२ साली ‘सोफीज चॉईस’साठी तिला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या वर्षी ‘डाऊट’ या चित्रपटातील तिची अप्रतिम अदाकारी तिला पुन्हा एकदा ऑस्करच्या व्यासपीठावर हात उंचावण्याची संधी देईल असे सर्वाना वाटत होते. परंतु दैवाने बहुधा केट विन्स्लेटची इच्छा पूर्ण करण्याचे मनावर घेतले होते. ‘मदर इंडिया’, ‘श्वास’, ‘लगान’ या चित्रपटांच्या निमित्ताने भारतीयांना ‘ऑस्कर’विषयी उत्सुकता निर्माण होत गेली. हे सर्व चित्रपट ‘ऑस्कर’च्या मुख्य स्पर्धेत नव्हते. इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांमधील चित्रपटांचा विभाग ‘ऑस्कर’मध्ये असतो, त्यासाठी या चित्रपटांना नामांकने मिळाली होती. या वर्षी जपानच्या ‘डिपार्चर’ या चित्रपटाला ऑस्कर देण्यात आले आहे. ‘स्लमडॉग मिलिआनर’ द्वारा ‘ऑस्कर’च्या मुख्य प्रवाहावर आशियाई मुद्रा उमटली असे म्हटले तर ‘डिपार्चर’ने ती मुद्रा अधिक ठळक केली असे म्हणता येईल. अखेरच्या प्रवासासाठी मृतदेह शवपेटीत ठेवण्यापूर्वी त्या देहांची सजावट करण्याचे काम करणाऱ्या एका व्यक्तीची कथा या चित्रपटात सांगितली आहे. समांतर चित्रपटांच्या गुणवत्तेचा केंद्रबिंदू गेली काही वर्षे युरोपातून आशियाकडे सरकत असल्याचे दिसत आहे. इराण, चीन, जपान अशा देशांमधील चित्रपट तुलनेने अधिक प्रयोगशील असल्याचे दिसत आहे. युरोपातील प्रयोगशीलता मंदावत असल्याच्या निष्कर्षांला या वर्षीच्या ‘डिपार्चर’ने बळ दिले असे म्हणता येईल. ‘वाल्ट्झ् विथ बशीर’ इस्रायली चित्रपटाला या पुरस्काराचा दावेदार मानले जात होते. १९८२ सालच्या लेबनॉनच्या युद्धातील आपल्या सहभागाचे ‘अॅनिमेटेड’ चित्रण करणाऱ्या एका सैनिकाची कथा या चित्रपटात आहे. ऑस्कर अकादमी ज्यूंच्या विरोधात असल्याने या चित्रपटाला पुरस्कार दिला गेला नाही असा आरोप काहींनी केला असला तरी ‘डिपार्चर’च्या गुणवत्तेविषयी मात्र प्रश्नचिन्ह उभे केलेले नाही. डॉक्युमेंटरी विभागात ‘स्माइलिंग पिंकी’ला मिळालेले ऑस्कर हा एक सुखद धक्का ठरला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने डॉक्युमेंटरीच्या एकूण स्थितीबाबत व्यापक विचार होणे गरजेचे आहे. चित्रीकरणाची साधने सुलभ आणि स्वस्त झाल्यामुळे ‘डॉक्युमेंटरी’ तयार करणे सोपे झाले, लघुपटांचीही संख्या वाढली आहे. वाढत्या वाहिन्यांवर या चित्रपटांना प्रसारणाची संधी मिळेल असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात वाहिन्यांचे लक्ष अशा प्रयोगांकडे जातानाच दिसत नाही. ‘डॉक्युमेंटरीज’बाबत भारतात उदासीनता दिसून येते. त्याबाबत फारसे प्रयत्नही झालेले नाहीत. एके काळी चित्रपटगृहांमधून किमान सरकारी माहितीपट तरी दाखवले जात, आता तेही नाहीत. ‘डिस्कव्हरी’सारख्या वाहिन्यांमुळे वृत्तचित्रांची एक वेगळी ओळख झाली असली तरी त्यांचा उपयोग माहितीपटांच्या प्रसारासाठी होऊ शकलेला नाही. वृत्तवाहिन्यांनी जर लघुपट, माहितीपट निर्मात्यांना मदतीचा हात दिला तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. मनोरंजनाची चौकट त्यामुळे विस्तारू शकते. परंतु आपल्या वाहिन्या ‘धंदेवाईकपणा’तून बाहेर पडायला राजी नाहीत. ‘स्माइलिंग पिंकी’च्या ऑस्करमुळे वाहिन्यांच्या मनोवृत्तीत काही बदल झाला तर या पुरस्काराचे सार्थक झाले असे म्हणता येईल. हिंदी चित्रपटातील गाण्यांकडे आणि नृत्यांकडे आजवर हेटाळणीच्या नजरेने पाहिले जात होते, त्यातही आता थोडा बदल होईल. ‘ऑस्कर’ला महत्त्व द्यावे अथवा देऊ नये याबाबत वाद होऊ शकतो. परंतु प्रत्येक भारतीय अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक ‘ऑस्कर’कडे डोळे लावून बसलेला असतो यात दुमत नाही. ‘स्लमडॉग’मुळे भारतीयांना आपण ‘जागतिक स्पर्धेत’ असल्याचे समाधान आणि उभारी मिळाली आहे हे नि:संशय!