Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

विज्ञानाधारित नाटय़रूपांचं आगळं विश्व
नाटकासारख्या प्रयोगक्षम कलेच्या माध्यमातून मुलांच्या शारीरिक आणि मानसिक व्यंगावर तसंच त्यांच्यातील त्रुटींवर मात करता येऊ शकते, हे ‘नाटय़शाला’च्या कांचनताई सोनटक्के यांनी सिद्ध केल्याला आता पाव शतक उलटून गेलंय. त्यांनी ‘विशेष’ मुलांना कलेच्या माध्यमातून आयुष्यात उभं राहण्याचं बळच दिलं नाही, तर भूगोल, गणितासारख्या रूक्ष विषयांत मुलांना रुची निर्माण व्हावी म्हणून त्यांनी क्रमिक पुस्तकांतील धडय़ांचं नाटय़ीकरण करून शुष्क विषयांचा अभ्यासही कसा रुचीपूर्ण करता येतो, याचाही वस्तुपाठ घालून दिला आहे. मुलांच्या शैक्षणिक विकासाकरिता नाटय़कलेचा वापर करून त्यांनी रंगभूमीला एक वेगळं परिमाण दिलं आहे. मुलांवरील संस्कारांपुरतीच मर्यादित असलेली बालरंगभूमी त्यांच्या जीवनजाणिवा विस्तारण्यासही मदत करीत आहे. नमनालाच हे घडाभर तेल ओतण्याचं कारण असं की, नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियमनं नुकत्याच नेहरू विज्ञान केंद्राच्या सहयोगानं आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय विज्ञान एकांकिका स्पर्धा पाहण्याचा योग आला. वरळीचे नेहरू सायन्स सेंटर गेली काही वर्षे शालेय विद्यार्थ्यांकरिता विज्ञान एकांकिका स्पर्धा घेत आहे. पण ज्या प्रमाणात त्यांचा हा उपक्रम मुलांपर्यंत पोहचायला हवा होता, तेवढय़ा प्रमाणात तो पोहचलेला नाहीत, असं खेदानं म्हणावंसं वाटतं.

आऊटसायडर स्कोर्सेसी
गणेश मतकरी लिखित ‘फिल्ममेकर्स’ हे पुस्तक आज दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. मॅजेस्टिक प्रकाशन आणि प्रभात चित्र मंडळ यांनी संयुक्तरीत्या हा सोहळा आयोजित केला आहे. प्रभादेवी येथील रवींद्र मिनी थिएटरमध्ये हा सोहळा सायंकाळी ७ वाजता होणार आहे. उद्घाटनानंतर ‘मराठी चित्रपट समीक्षा’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये मीना कर्णिक, सचिन कुंडलकर, संतोष पाठारे, अभिजीत देशपांडे, गणेश मतकरी हे सहभागी होणार आहेत. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीच्या चित्रपटांचे विश्लेषण करणाऱ्या ‘फिल्ममेकर्स’ मधील प्रकरणाचा हा संपादित अंश. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट दृश्य. एका नक्षीकाम केलेल्या वॉलपेपरवरून कॅमेरा उजवीकडे सरकतो आणि दृष्टीपथात येते ती समोर चाललेली पार्टी. स्त्रीपात्र विरहीत. उपस्थित सज्जनांचं वय हे साधारण पंचविशीच्या आसपासचं. डावीकडून उजवीकडे सहजगतीने गेलेला कॅमेरा दाखवून देतो या मुलांचे घोळके, त्यांचे चाललेले उद्योग, गप्पा, फोनकॉल्स वगैरे. समोरच बाटल्या, त्यामुळे मद्यपानही जोमाने आलंच. बरोबर संगीत, आता कॅमेरा आपली दुसरी फेरी चालू करतो. पुन्हा डावीकडून उजवीकडे. या खेपेला थोडं अधिक जवळून.

आदिवासी साहित्य संमेलन: नियोजन सुटसुटीत पण शिस्तीचा अभाव
हिवाळ्याचा शेवट व उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागली असताना नाशिकमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना बहर आला आहे. मागील आठवडय़ात पंधरावे कामगार साहित्य संमेलन झाले ते विविध कारणांनी गाजले. त्यानंतर नुकतेच आठवे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन येथील कालिदास कलामंदिरात झाले. तीन परिसंवाद, कथाकथन आणि कवी संमेलन असा कार्यक्रमांमधील सुटसुटीतपणा क्वचित एखाद्या साहित्य संमेलनामध्ये पाहावयास मिळतो. साहित्य संमेलन म्हटले की साहित्य, वाचकांची अभिरूची, मुख्य प्रवाह यांच्याशी संबधित वादविवाद झडतील, ही साहित्य प्रेमींची एक अपेक्षा असते. असे असतांना आज विद्रोही, कामगार, ओबीसी, विद्यार्थी असे विविध संमेलने भरविणे सुरू आहे.