Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

लोकमानस

माधवराव माडगावकर : ध्वनिमुद्रणातील दीपस्तंभ

 

ग्रामोफोन कंपनीचे (HMV) ज्येष्ठ ध्वनिमुद्रक माधवराव माडगावकर यांचे अलीकडेच अमेरिकेत ह्यूस्टन येथे निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. १९३७ ते १९७३ या काळात त्यांनी ध्वनिमुद्रण कलेच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक नामवंतांचे ध्वनिमुद्रण केले. सुरुवातीला कोलकाता येथे के. सी. डे, बेगम अख्तर यांची व अनेक नवोदितांची ध्वनिमुद्रणे केल्यावर ते मुंबईत आले. इथे अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले.
अवीट गोडीची शेकडो गाणी सुबकपणे मुद्रित करण्यातले त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ७८, ४५ व ३३.३ गतीच्या ध्वनिमुद्रिकांच्या मुद्रण तंत्रात ते पारंगत होते.
सुरुवातीच्या काळात जी. एन. जोशी व वसंतराव कामेरकर नवनवीन कलावंतांच्या शोधात असताना माडगावकर स्टुडिओमधली तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळत होते. एका मायक्रोफोनवर ध्वनिमुद्रणे करावी लागत. जी. एन. जोशी, गजानन वाटवे, गंगूबाई हनगल, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा यांची अनेक ध्वनिमुद्रणे त्यांनी केली. लता मंगेशकरांची ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’ व ‘हसले ग बाई हसले’ ही गाणी माडगावकरांनी मुद्रित केली.
चुंबकफिती(magnetic tapes) आल्यावर त्यांच्या एडिटिंगचे तंत्रही त्यांनी आत्मसात केले. त्यांच्या आग्रहावरून अंगात ताप असताना व खोकल्याची उबळ येत असतानाही पं. डी. व्ही. पलुस्करांनी ‘श्री’ रागाचे २५ मिनिटांचे मुद्रण केले व तेच त्यांचे अखेरचे गायन ठरले. त्यावर ३० तास मेहनत घेऊन १८ मिनिटांची एल. पी. रेकॉर्ड माधवरावांनी सिद्ध केली. ती आजही एडिटिंगचा आदर्श नमुना मानली जाते.
आधुनिक तंत्रात त्यांनी कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, सुधीर फडके, शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया, बिस्मिल्ला खान यांची ध्वनिमुद्रणे केली. निवृत्तीनंतर अनेक वर्षे ते शिवाजी पार्कपाशी राहत होते. अनेक कलावंतांच्या ध्वनिमुद्रणाच्या आठवणी सांगताना ते रंगून जात. के. सी. डे यांच्याकडून त्यांनी चक्क दोन गुजराती गाणी गाऊन घेतली होती. गझलसम्राज्ञी बेगम अख्तर यांना कंपनीच्या एका मार्केटिंगच्या अधिकाऱ्याने ‘कव्वाली’ मुद्रित करायची सूचनावजा आज्ञा करताच त्या संतापल्या. त्यांचा राग माडगावकरांनीच गोड बोलून घालवला. बिस्मिल्ला खान यांची विमान प्रवासाची भीती घालवून त्यांना परदेशात कार्यक्रमास जायलाही त्यांनी तयार केले.
कुठल्याही संस्थेच्या उभारणीत सर्वस्व वाहून काम करणारी माणसे आवश्यक असतात. माधवराव माडगावकर अशांपैकी एक होते.
डॉ. सुरेश चांदवणकर

किताब आणि बक्षीस एकाच माळेत?
‘राग दरबारी’ (११ फेब्रुवारी) या सदरात मुकुंद संगोराम यांचा ‘संगीत मन को पंख लगाए’ हा लेख आवडला. तथापि संगीत क्षेत्रात घडलेल्या चार घटना त्यांनी चुकीच्या रीतीने मांडल्या आहेत. कुठे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींसारख्या दिग्गजांना मिळालेले किताब.. उस्ताद झाकिर हुसेन, संगीतकार ए. आर. रहमान यांचा लौकिक व आयुष्यभराची साधना व कुठे ‘..सारेगम’सारख्या अल्पजीवी रिअ‍ॅलिटी शोसारखी चार-सहा महिन्यांची स्पर्धा.. ज्यामध्ये तीच तीच गाणी घोटवून गळ्यात उतरवली जातात! किताब आणि अशा स्पर्धेतले बक्षीस यांना स्तंभलेखकांनी एकाच माळेत गुंफले, याचे नवल वाटते.
स्मिता फाटक, डोंबिवली

संगीताचा अभ्यासपूर्ण मागोवा
भारतीय संगीताने जगाच्या नकाशावर उमटवलेल्या ताज्या मुद्रा अविस्मरणीयच. पंडित भीमसेन जोशी यांना मिळालेला सर्वोच्च मानाचा किताब, उस्ताद झाकिर हुसेन यांना मिळालेला ‘ग्रॅमी’ पुरस्कार, ए. आर. रहमान यांना मिळालेला ‘बाफ्ता’ पुरस्कार आणि सारेगम लिट्ल् चॅम्प्स्ची महागायिका कार्तिकी गायकवाडचा विजय.. या घटनांच्या अनुषंगाने मुकुंद संगोराम यांनी लिहिलेला ‘संगीत मन को पंख लगाए’ हा लेख (११ फेब्रुवारी) म्हणजे एखाद्या प्रबंधाचा अर्क म्हणता येईल.
संगीताच्या आस्तित्वाची जाणीव होण्यापासून सुरू होऊन वाद्यांचा शोध, आधुनिक संगीतशास्त्र यांचा अभ्यासपूर्ण मागोवा फारच छान वाटला. वैश्विक पातळीवरील संगीताच्या प्रवाहात भारतीय संगीताने आपले स्थान उंचावण्याकरिता संगीतप्रेमींना केलेले आवाहन खरोखरच अंतर्मुख करणारे आहे.
निशिकांत जयवंत, कांदिवली, मुंबई

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना: विद्यार्थ्यांची निराशा
ल्ल केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आखलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेची कार्यवाही २००८-२००९ या शैक्षणिक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्याने मागील परीक्षेत ५० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आणि ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांहून कमी आहे अशा एस.एस.सी.पूर्व मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी, बौद्ध या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी शाळांमार्फत अर्ज मागविले होते.
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्याकडे असे ११ लाख ४५ हजार २४९ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यापैकी फक्त ५५ हजार २०० विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी करण्यात आल्याचे जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आले होते. ९५ टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून वंचित ठेवण्यात आले आहे. उत्पन्नमर्यादा वार्षिक रु. एक लाखांपर्यंत असताना प्रत्यक्षात वार्षिक उत्पन्न १८ हजार रुपयांपर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.
वास्तविक जि.प. शाळा, म्युनिसिपल शाळा, अनुदानित शाळा यामधील विद्यार्थ्यांना शासनाचे अनेक लाभ मिळत असतात. विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून कोणतेच लाभ मिळत नाहीत. या शाळांतील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून त्यांची प्रतारणा करणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे नाही का?
ज्या ९५ टक्के विद्यार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत शिष्यवृत्त्या देऊन त्यांनाही शिक्षण संपादन करण्याची संधी उपलब्ध करून आपले भवितव्य घडविण्याची संधी देण्यात यावी, अशी विनंती.
मायकल फुर्टाडो, वसई