Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

पक्षीय मतभेद झुगारून अंतिम लढय़ासाठी सज्ज व्हावे- भुजबळ
कर्नाटकाच्या जोखडातून सीमावासीयांची मुक्तता करण्यासाठी केंद्राला साकडे
कोल्हापूर, २४ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी
कर्नाटकाच्या संमतीचा बागुलबुवा उभा करून ५२ वर्षे भिजत पडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला वाटाण्याच्या अक्षता न लावता केंद्र शासनाने आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून ५२ वर्षे इच्छेविरुद्ध डांबल्या गेलेल्या सीमावासीय मराठी भाषकांची कर्नाटकाच्या जोखडातून मुक्तता करावी. अन्यथा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मंगळवारी येथे सीमा परिषदेत देण्यात आला. येथील केशवराव भोसले नाटय़गृहात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला पुन्हा एकदा नवे तेज देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने भव्य अशा सीमापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांची स्वबळावर लढण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांनी वाजविले आघाडीचे बिगुल
सांगली, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची मागणी केली असताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र या मागणीला बगल देत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे बिगुल वाजविले. परंतु जाता- जाता पुणे जिल्ह्य़ाचे उदाहरण देत ‘तुमच्या ज्या व्यथा जिल्ह्य़ात आहेत, त्याच व्यथा राज्य पातळीवर आम्हाला सहन कराव्या लागत आहेत’, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

भुजबळांनी मेटेंना फटकारले
कोल्हापूर, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण द्यावे मात्र इतर ओबीसी समाजाला तोशीस लागता कामा नये अशी माझी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे. माझ्याबद्दल बोलताना आधी स्वत:ची उंची काय आहे याचे भान ठेवावे अशा शब्दात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण कृती समितीचे विनायक मेटे यांना फटकारले. येथील सर्कीट हाऊसवर पत्रकारांशी ते बोलत होते.

संघर्ष हेच ब्रीद!
राजेंद्र जोशी

पक्ष, विचार आणि मतदार यांच्यावरील निष्ठा ही निकोप राजकारणाची त्रिसूत्री म्हणून ओळखली जाते. ज्या कांही मोजक्या नेत्यांनी आजही आपल्या निष्ठेच्या जोरावर राजकारणाची अब्रू वाचवून ठेवली आहे, अशा नेत्यांमध्ये महाराष्ट्रात खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे नांव अग्रभागी आहे. जीवनाच्या विशीत त्यांनी सुरू केलेला संघर्ष आज अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करतानाही तितक्याच ताकदीने सुरू असल्याने महाराष्ट्राच्या तरूणांना राजकीय इतिहासाची पाने उलगडताना सदाशिवराव मंडलिक यांच्याविषयीचा उल्लेख रोमांचित केल्याशिवाय राहणार नाही.

वीज प्रकल्पाचे भूमिपूजन २८ला सोनियांच्या हस्ते?
सोलापूर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळातर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी-आहेरवाडी परिसरात सुमारे ५५०० कोटी खर्चाच्या १३२० मेगावॉट वीजनिर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या २८ फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
श्रीमती गांधी यांचा दौरा अद्याप निश्चित झाला नसला तरी तयारीच्या दृष्टिकोनातून ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून तीन हेलिपॅड आणि सुमारे दोन लाख नागरिक बसतील असा भव्य शामियाना तयार करण्यात येत आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नातून हा सोलापूरजवळ सर्वात मोठा प्रकल्प साकार होणार आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी शिंदे हे सोलापूरला येणार असून, त्या वेळीच श्रीमती गांधी यांच्या दौऱ्याची अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.

लोकसेवा आयोग परीक्षेत हर्षद राजगुरू यांचे यश
सोलापूर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत हर्षद श्रीपाद राजगुरू यांनी गुणवत्ता यादीत तेरावा क्रमांक मिळवून उज्ज्वल प्राप्त केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद नारायण राजगुरू यांचे हर्षद हे चिरंजीव आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.कॉम परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळविले. त्याचप्रमाणे सहकार खात्याची जी.डी.सी. अ‍ॅन्ड ए. या परीक्षेतही त्यांनी यश संपादन केले आहे. ते यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपनिरीक्षकपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते स्टेट बँक ऑफ इंडिया, पुणे शाखेत कार्यरत आहेत. एकाच वर्षांत तीन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याचा मान त्यांनी पटकाविल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

दत्तोपंत देशपांडे यांचे निधन
सोलापूर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तोपंत देशपांडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

सोलापूर विभागातील वाहकांचा उद्या गौरव सोहळा
सोलापूर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

गतवर्षी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने राबविलेल्या ‘प्रवासी वाढवा’ या विशेष अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सोलापूर विभागातील चार वाहकांचा गौरव समारंभ येत्या २६ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. प्रवासी वाढवा या विशेष अभियानाच्या कालावधीमध्ये सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांचा आणि दिलेले प्रवासी उद्दिष्ट साध्य केलेल्या वाहकांचा गौरव करण्यात येणार आहे. यात सोलापूर आगाराचे एस.ए. मोहिते, पंढरपूर आगाराचे एन.एस. शिंदे, बार्शी आगाराचे यू.आर. राऊत आणि मंगळवेढा आगाराचे पी.एस. लुगडे यांचा गौरव येत्या २६ रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात परिवहनमंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या हस्ते आणि जलसंपदामंत्री अजित पवार, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक, गृह विभागाचे सचिव संगीत राव, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

‘क्रांतिसूर्य सावरकर’ महानाटय़ाचा उद्या सोलापुरात प्रयोग
सोलापूर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन आणि विचार समग्रपणे जनतेसमोर येण्यासाठी सावरकर विचारमंचच्यावतीने येत्या २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पार्क स्टेडिअममध्ये ‘क्रांतिसूर्य सावरकर’ या महानाटय़ाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. भारतीय इतिहासातील नररत्नांचे स्मरण भव्य-दिव्य स्वरुपात झाले पाहिजे, यासाठी सावरकर स्मृतिदिनाचे औचित्य साधून या महानाटय़ाच्या माध्यमातून इतिहास जिवंत केला जाणार आहे, असे सावरकर विचार मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले. पुण्यातील इतिहासप्रेमी मंडळ हे महानाटय़ सादर करणार आहे. साईरमा शेटे या महानाटय़ाच्या निर्मिती प्रमुख आहेत, तर मोहन शेटे यांचे दिग्दर्शन लाभले आहे. या महानाटय़ासाठी पार्क स्टेडिअममध्ये ५० फूट लांब व ४० फूट रुंद भव्य रंगमंच उभारण्यात येत आहे. हा रंगमंच त्रिस्तरीय असून ९ फूट उंच आहे. या महानाटय़ात १५० कलावंत सहभागी होत आहेत, असे अ‍ॅड. बनसोडे यांनी सांगितले. महानाटय़ व्यवस्थित दिसण्यासाठी ४ एलसीडी प्रोजेक्टरची सोय करण्यात आली आहे. उच्च दर्जाच्या ध्वनिमुद्रणामुळे हजारो प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक शब्द सुस्पष्टपणे ऐकू येणार आहे. या महानाटय़ासाठी मोफत पासेसची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी देवीदास चेळेकर (भ्रमणध्वनी ९९२३४०४८४९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरी बँक्स असोसिएशनवर राजेंद्र कोठावळे यांची निवड
सोलापूर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

येथील महेश नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गंगाधर कोठावळे यांची सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स कॉ-ऑप. असोसिएशनच्या संचालक मंडळामध्ये जिल्ह्य़ातील सर्व बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून एकमताने निवड करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी जाहीर केले. सोलापूर जिल्ह्य़ात एकूण ३९ नागरी बँकांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यातून श्री. कोठावळे यांची संचालक मंडळावर निवड करण्यात आली. श्री. कोठावळे हे गेल्या ३२ वर्षांपासून सोलापूरच्या बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सिध्देश्वर सहकारी बँकेत अकरा वर्षे सहायक व्यवस्थापक, सोलापूर जनता बँकेत दहा वर्षे वरिष्ठ अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांच्या निवडीचे महेश बँकेचे अध्यक्ष अनिल सिंदगी यांनी स्वागत करून त्यांचा संचालक मंडळाच्या सभेत सत्कार केला.

अपघातात शिक्षिका ठार
जत, २४ फेब्रुवारी / वार्ताहर

कुंभारी गावानजीक स्कुटीवरून अचानक पडल्याने झालेल्या अपघातात श्रीमती सुलोचना हणमंत जाधव (वय ४०, रा. कंठी, ता. जत) या जागीच ठार झाल्या. श्रीमती सुलोचना जाधव या कुंभारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी त्या शाळेचे कामकाज आटोपून कुंभारीहून कंठी गावाकडे आपल्या स्कुटी (क्रमांक एमएच १०- एएम १९६०) वरून येत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

निवृत्त अधिकाऱ्याकडून पालिकेची वसुली कारवाई
खोटी जन्मनोंद करून वेतन घेतले
इचलकरंजी, २४ फेब्रुवारी / वार्ताहर

येथील पालिकेचे निवृत्त सहायक बांधकाम पर्यवेक्षक प्रभाकर कृष्णाजी पोळ यांनी जन्मतारखेची खोटी नोंद देऊन साडेपाच वर्षे कालावधीमध्ये पाच लाख रुपयांचे जादा वेतन घेतल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारची वसुलीधीन रक्कम त्यांच्या पेन्शनमधून वसूल करण्याची कारवाई नगरपालिकेने सुरू केली असल्याची माहिती कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी दिली.पालिकेकडील सहायक बांधकाम पर्यवेक्षक पोळ हे सन २००६ मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र त्यांची जन्मतारखेविषयी चौकशी केली असता त्यांनी खोटी नोंद दिल्याचे निदर्शनास आले. म्हणून त्याबाबत चौकशी अधिकारी एम. बी. गोरडे यांनी अधिक चौकशी केली. त्यामध्ये पोळ यांनी सन २००१ पासून साडेपाच वर्षे जादा सेवा उपभोगल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी पोळ यांचा प्रॉव्हिडंड फंड वगैरे थांबवून ठेवण्यात आला आहे.मात्र उर्वरित १ लाख ७० हजार रुपयांची रक्कम त्यांच्या पेन्शनमधून प्रतिमाह २ हजार रुपयेप्रमाणे वसूल करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे विचाराधीन आहे असेही राजापुरे यांनी सांगितले.

दोन घरफोडय़ांना अटक
मिरज, २४ फेब्रुवारी / वार्ताहर

मिरज शहरात सात ठिकाणी घरफोडय़ा करणाऱ्या दोघा अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या दोघांनी बंद दरवाजाचे कुलुप तोडून सात लाख रुपये किमतीचे ४२ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली आहे. शहानूर नूरमहंमद आगा (वय ३४) व हमीद रामचंद्र शिकलगार (वय २७, दोघेही रा. मिरज) या दोघांनी शहरात ठिकठिकाणी एकाच रात्री सात ठिकाणी घरफोडय़ा करून रोख रक्कम व अन्य साहित्य लंपास केले होते. दोन दिवसांपूर्वी गजानन महादेव तोडकर यांना येथील शिवाजी क्रीडांगणासमोर रात्रीच्या सुमारास या दोघांनी मारहाण करून १२ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. याबाबत मिरज पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून अटक करण्यात आली. या दोघांनी येथील शांतिसागर हाऊसिंग सोसायटीतील श्रीमती शैलजा समाती यांचा बंगला फोडून ४२ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते.