Leading International Marathi News Daily                               बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

उद्धवांचा शिववडा.. त्याला राज यांचा ‘मनसे’ पाठिंबा!
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या सख्ख्या चुलतभावांत आता विस्तवही जात नाही. राजकीय घडामोडींत परस्परांना ‘कोपच्यात’ घेण्याची संधी ते सहसा दवडत नाहीत. अशी स्थिती असताना एका लज्जतदार गोष्टीबाबत मात्र त्यांचे एकमत झाले आहे आणि त्याचा वास राजकीय वतुर्ळात साऱ्यांनाच लागला आहे. शिवसेनेने अकारण प्रतिष्ठेची केलेली शिववडा योजना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ठाम विरोधामुळे अडचणीत आली होती. मात्र आज मनसेने मुंबई पालिकेत शिववडा योजनेला पाठिंबा देत साऱ्यांनाच भुवया उंचावायला लावल्या. भूमिपुत्रांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे कारण देत हा ‘मनसे’ पाठिंबा जाहीर झाला !

अडवाणींकडून युती अभेद्य राहण्याचे स्पष्ट संकेत!
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी
‘कमळा’बाईवर आजही आमचे पूर्वीइतकेच प्रेम आहे, असा निर्वाळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देऊन राज्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ असलेली शिवसेना-भाजप युती अभेद्य असल्याचे स्पष्ट केलेले असतानाच आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे काही ठिकाणी जागावाटपाबाबत तडजोडी कराव्या लागणार असल्या तरी त्या सामंजस्याने केल्या जातील, त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही, असे स्पष्ट करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अडवाणी यांनी कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख न करता शिवसेना-भाजप युती अभेद्य असल्याचे स्पष्ट संकेत आज अप्रत्यक्षरीत्या दिले.

अडवाणी - शिवसेनाप्रमुख भेट होऊ न दिल्याचा आरोप
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भाजपशी घटस्फोट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी सोयरिक जुळविण्याचे काही मंडळींचे सुरू असलेले प्रयत्न थांबावेत यासाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न आज भाजपच्या वतीने करण्यात आला. मात्र त्याला यश आले नाही. अडवाणी आणि ठाकरे यांची भेट होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा दावा भाजपच्या काही नेत्यांनी केला आहे.

न्या. मार्लापल्ले यांच्या पत्राने न्यायसंस्थेत नव्या वादाची चिन्हे
मुंबई, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

केंद्र सरकारने राष्ट्रपतींकडून वटहुकूम काढून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या पगारात तिप्पट वाढ केली असली तरी यास संसदेने रीतसर मंजुरी दिल्याखेरीज वाढीव पगार न स्वीकारण्याची तसेच या वरिष्ठ न्यायाधीशांच्या संपतीची माहिती माहितीच्या अधिकाराखाली जनतेला उपलब्ध व्हायला हवी या मुंबई उच्च न्यायालयाचे एक ज्येष्ठ न्यायाधीश न्या. बी. एच. मार्लापल्ले यांनी घेतलेल्या भूमिकेने न्यायसंस्थेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राजा उदार झाला..
उत्पादन व सेवा शुल्कात २ टक्क्यांनी कपात
नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
अभूतपूर्व अशा जागतिक मंदीचे अरिष्ट झेलणाऱ्या उद्योगांना लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आज उत्पादन शुल्क आणि सेवा शुल्कातील सवलतींद्वारे सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे आणखी एक स्टिम्युलस लाभले. लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प पारित होत असताना अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी उत्पादन शुल्क आणि सेवा करात प्रत्येकी २ टक्क्यांनी कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीचा विळखा पडला असला तरी या संकटावर आम्ही मात करू, असा ठाम निर्धार मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केला.

पेट्रोल, डिझेल दरकपातीची लवकरच घोषणा?
नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांपूर्वी संसदीय परंपरेला शिरोधार्ह मानून घटनेच्या चौकटीत राहून केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी हंगामी अर्थसंकल्प सादर केला. पण आज हा अंतरिम अर्थसंकल्प करता करता त्यांनी सुमारे ३० हजार कोटी रुपयांच्या करसवलतींची उधळण केलीच. लोकसभा निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेसह आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी युपीए सरकारपाशी दोन दिवस उरले आहेत. या दोन दिवसात युपीए सरकार जाता जाता आणखी किती आर्थिक खैरातीची उधळण करते, याचीच चर्चा आज अकस्मात जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या स्टिम्युलसनंतर सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकांची घोषणा याच आठवडय़ाअखेर?
आंध्र प्रदेश, ओरिसा आणि सिक्कीममध्येही विधानसभा निवडणुका
नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
चौदाव्या लोकसभेवर पडदा पडण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना चालू आठवडय़ाअखेर शनिवार वा रविवारी पंधराव्या लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा होणार असल्याचे संकेत आज देण्यात आले. लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश, ओरिसा आणि सिक्कीम या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. २००४ साली लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा २९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती.

कसाबविरुद्ध आज आरोपपत्र
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब याच्याविरुद्ध गुन्हे अन्वेषण विभागातर्फे उद्या मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयात आज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. हे आरोपपत्र मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशा तीन भाषांमध्ये सादर होणार आहे.पाकिस्तानने मुंबईवरील हल्ल्याशी आणि तपासाशी संबंधित विचारलेल्या ३० प्रश्नांची कसाबविरुद्ध दाखल करण्यात येणाऱ्या आरोपपत्रात काय उत्तरे दिली जातात याबद्दल सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. त्यावर पडदा टाकत उद्या मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर कसाबविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांनी दिली. मात्र पाकिस्तानने हल्ल्याबाबत विचारलेल्या ३० प्रश्नांची यादी अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने त्यांच्या प्रश्नांची आरोपपत्राद्वारे उत्तरे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मारिया यांनी या वेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे कसाबचा कबुलीजबाब नोंदविण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याने त्याची प्रतही अद्याप आपल्याला मिळालेली नाही. त्यामुळे या आरोपपत्रात कसाबच्या कबुलीजबाबाचाही समावेश करण्यात आलेला नाही, असेही मारिया यांनी सांगितले. कसाबप्रमाणेच याप्रकरणी अटक करण्यात आलेले फईम अन्सारी आणि सबाऊद्दीन यांचाही हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याने त्यांच्याविरुद्धही उद्याच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे मारिया म्हणाले. एफबीआयच्या अधिकाऱ्यांचा साक्षीदारांच्या यादीत समावेश आहे का अशी विचारणा केल्यावर मात्र मारिया यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. दरम्यान, मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचल्याचे आणि हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे मान्य केल्यावर पाकिस्तानने भारताकडे मागितलेल्या ३० प्रश्नांची उत्तरे आपण कसाबविरुद्ध दाखल करण्यात येणाऱ्या आरोपपत्रातून देऊ, असा दावा मुंबईचे पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.

सरकारी रुग्णालयाचे बिल भागविण्यासाठी मातेने नवजात मुलाला विकले
हैदराबाद, २४ फेब्रुवारी/पीटीआय

आंध्र प्रदेशात घडलेल्या मनाला चटका लावणाऱ्या घटनेत एका दरिद्री महिलेने रुग्णालयाचे बिल भागवण्यासाठी नवजात मुलाला अवघ्या सहा हजार रुपयांच्या मोबदल्यात मूल नसलेल्या एका जोडप्यास विकून टाकले. सरकारी रुग्णालयाचे बिल भागवण्यासाठी तिने हे कृत्य केले. विशेष म्हणजे महिला व बालविकास मंत्री रेणुका चौधरी यांच्या खम्मम मतदारसंघात ही घटना घडली आहे.
खम्मम जिल्ह्य़ात कोठागुडेम येथे सरकारी रुग्णालयाच्या बेडवरून बोलताना राजिताने सांगितले की, माझी आर्थिक स्थिती वाईट आहे व त्यातच रुग्णालयाचे बिल दोन हजार रुपये झाले होते. गेल्या आठवडय़ात तिचे सिझरियन ऑपरेशन झाले होते. मुलगा जन्माला आल्यानंतर २४ तासांतच तिने त्याला विकून टाकले. पोलिसांनी सांगितले की, या सरकारी रुग्णालयाच्या विरोधात कारवाई केली जाईल व या महिलेकडून डॉक्टरांनी काही लाच वगैरे घेतली किंवा काय याचीही चौकशी करण्यात येईल. कोथगुडेम महसूल विभागाचे अधिकारी पी.राजाराम यांनी सांगितले की, मुलाची खरेदी-विक्री करणे हा गुन्हा आहे. एका रिक्षाचालकाने या महिलेकडून हे मूल सहा हजारांना विकत घेतले. त्याला मूलबाळ नव्हते व हे मूल पत्नीसमवेत वाढवण्याचा त्याचा मनोदय आहे. श्रीमती चौधरी यांनी सांगितले की, माता सुखरूप आहे, मूल मारलेले नाही हेच नशीब! आता या घटनेची आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी करू.

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी हेल्पलाइन
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

दहावी बारावीच्या परीक्षांच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी-पालकांच्या तक्रारी व अडचणीचे निवारण करण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (मुंबई) हेल्पलाइन सुरू केली आहे. ही हेल्पलाइन २५ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत उपलब्ध असेल. बारावीची परीक्षा येत्या गुरूवार पासून सुरू होत आहे. मंडळाने सुरू केलेल्या हेल्पलाईनचा क्रमांक २७८९३७५६ असा आहे. या हेल्पलाईन व्यतिरिक्त मुंबई विभागीय मंडळाने यंदा प्रथमच परीक्षेबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी - बारावीची परीक्षा केंद्रे तसेच बैठक व्यवस्थेची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. संकेतस्थळाचा पत्ता www.sscboardmumbai.in असा आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातून ११ लाख ८४ हजार २२६ विद्यार्थी बसले आहेत. एकूण पाच हजार ३०१ कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी राज्यात एक हजार ८३० केंद्रांची तजवीज करण्यात आली आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी