Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

तंटामुक्ती टिकवली तर बोनस - जयंत पाटील
लातूर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

विकासाची कामे कितीही झाली तरी गावातील शांतता महत्त्वाची आहे. तंटामुक्ती मोहिमेत सहभागी होणाऱ्या गावांनी तंटामुक्ती पुढच्या वर्षी टिकवली तर त्यांना बोनस देण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज केली. बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण विद्यालयाच्या उद्घाटन व जिल्ह्य़ातील तंटामुक्ती पुरस्कारप्राप्त गावांना पुरस्कार वितरण आज झाले. या कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री शोभा बच्छाव, अमित देशमुख, नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, त्र्यंबकदास झंवर, जिल्हाधिकारी एकनाथ डवले, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय लाठकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, मोईज शेख, पोलीस गृहनिर्माण विभागाचे महाव्यवस्थापक टी. एस. भाला, प्रशिक्षण विभागाचे उपनिरीक्षक माधव सानप, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शारदाप्रसाद यादव कार्यक्रमास उपस्थित होते.

तंटामुक्त गाव
राज्यातील जास्तीत जास्त गावे तंटामुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य शासना-मार्फत दोन वर्षांपासून विशेष कार्यक्रम राबविला जात आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली काम करणारी यंत्रणांच्या माध्यमातून राबविला जात आहे. हा उपक्रम निश्चितपणे स्वागतार्ह आहे आणि ती काळाची गरज आहे. तथापि, ज्या पद्धतीने हा कार्यक्रम राबविला जात आहे, त्या पद्धतीच्या उपयुक्ततेबाबत आणि परिणामकारकतेबाबत साशंकता आहे.

कडक पोलीस बंदोबस्तात रोहिदासवर पाल येथे अंत्यसंस्कार
औरंगाबाद, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

भर चौकात खांबाला बांधून गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत सोमवारी मृत्युमुखी पडलेल्या रोहिदास पंडित तुपे याच्यावर आज दुपारी पाल येथे कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. तणावाच्या पाश्र्वभूमीवर पाल येथे राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी ठेवण्यात आली होती. दरम्यान अटक केलेल्यांची संख्या ७३ झाली आहे.

वीरेंद्रसिंह यांच्याविरुद्ध अविश्वास; बीड जि.प.ची २ मार्चला सभा
बीड, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्रसिंह यांच्या विरोधात अविश्वास व्यक्त करण्यासाठी सदस्यांच्या मागणीवरून दि. २ मार्चला विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. अविश्वास ठरावाला सामोरे जाणारे ते तिसरे अधिकारी ठरले आहेत.अवघ्या तीन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या वीरेंद्रसिंह यांच्या कार्यपद्धतीवर मागील दोन महिन्यांपासून पदाधिकारी व सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. पदाधिकारी व सदस्यांनी सांगितलेले काम नियमानुसार नसतेच, त्यामुळे शिफारशी न ऐकण्याची भूमिका त्यांनी घेतली. परिणामी पदाधिकारी व सदस्यांमध्ये रोष वाढत गेला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उद्या मुंबईत बैठक
परभणी, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ असे होण्याची शक्यता व्यक्त होत असताना शिवसेनेने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावले आहे. गुरुवारी (दि. २६) मुंबईत जिल्हाप्रमुखांपासून ते तालुकाप्रमुखापर्यंत सर्वच पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ग्रामसभेने ठराव केला तरच टँकरने पाणी!
नांदेड, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

ग्रामसभेने पाणीटंचाई असल्याचा ठराव मंजूर केल्यानंतर संबंधित गावात पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या वर्षांपासून हा निर्णय घेण्यात आल्याने पाणी मिळविण्याकरिता गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. दर वर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभी अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. ‘

दोन समाजातील नव्हे तर वैयक्तिक वाद -पोलीस अधीक्षक
औरंगाबाद, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सोमवारी पाल येथे एका युवकाला खांबाला बांधून ठार मारण्यात आले. मुलीवर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने गावकरी संतप्त झाले आणि त्यातून त्यांनी हे क्रौर्य केले. मात्र यामागे दोन समाजातील वाद नाही, असे समोर आले असल्याचे पोलीस अधीक्षक अमितेशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुलीवर दुसऱ्यांदा हल्ला आणि त्या मुलाची गुंडागर्दी यामुळेच हे कृत्य घडल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र हे अमानवी कृत्य असून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी पोलीस प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले.

गायरान कसणाऱ्या दलितांनी गाव सोडावे म्हणूनच खून
औरंगाबाद, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

गायरान कसणाऱ्या दलितांनी गाव सोडावे, एकाला मारले की सर्व घाबरतात म्हणूनच रोहिदास तुपे याला पूर्वनियोजित कट करून ठार मारण्यात आले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यां मंगला खिवंसरा यांनी केला. ‘रोहिदास तुपे हा दलित समाजाचा असून या प्रकरणाला मोठी पाश्र्वभूमी आहे. या गावात ४५० एकर गायरान जमीन आहे. त्यातील काही जमीन गेल्या तीस वर्षांपासून सवर्णानी बळकाविली आहे. हा वाद आजही सुरू आहे. दलितांनाच गावातून हाकलून दिले तर ही जमीन आपली होईल, असा सवर्णाचा समज आहे. त्यामुळेच हे हत्याकांड घडविण्यात आले.

‘राष्ट्रवादी’च्या नेत्याकडून दबावतंत्राचा वापर
जालन्याच्या उद्योजकाचा न्यायासाठी टाहो!
औरंगाबाद, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी
जालन्यातील प्रसिद्ध उद्योगपती भरतकुमार डेंबडा आणि त्यांचे कुटुंबीय सध्या प्रचंड तणावाखाली वावरत असून त्याचे कारण आहे राष्ट्रवादीचा एक स्थानिक नेता व त्याचे पोलिसांकरवी दबावतंत्र. ज्या कंपनीचे मालक डेंबडा आहेत त्याच कंपनीतील संगणक चोरीचा आरोप त्यांच्यावर होतो आणि जालना पोलीस त्यांचा बेकायदा छळ करते. या प्रकाराने उद्योगजगतात चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्याला न्याय मिळावा, अशी सार्थ अपेक्षा या उद्योजकाची आहे.

जालना भूखंड पुन्हा उच्च न्यायालयात
प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश
औरंगाबाद, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
जालना नगरपालिकेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरील खासगी अतिक्रमणे हटवून या जमिनी शासन आणि वनखात्याच्या ताब्यात देण्यात याव्यात अशी विनंती करणारी जनहित याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत प्रतिवादी, केंद्र सरकार, राज्य शासन, जालन्याचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना नोटिसा बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. निशिता म्हात्रे व न्या. भूषण गवई यांनी दिले आहेत.

ओबीसी आरक्षण बचावाच्या संदर्भात राजकीय बहिष्काराचा इशारा
एक मार्चपर्यंत लोकप्रतिनिधींनी भूमिका जाहीर करावी-उपरे
अंबाजोगाई, २४ फेब्रुवारी/वार्ताहर
ओबीसी आरक्षण बचावाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्यासह राज्यातील ६३ हजार लोकप्रतिनिधींनी १ मार्चपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करून रस्त्यावर न उतरल्यास त्यांच्यावर राजकीय बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र ओबीसी समन्वय समितीने घेतला आहे, असे ज्येष्ठ नेते हनुमंत उपरे यांनी सांगितले.

‘‘राष्ट्रवादी’च्या वर्चस्वामुळे काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात’
मधुकर चव्हाण यांना डावलल्याने कार्यकर्ते नाराज
उस्मानाबाद, २४ फेब्रुवारी/वार्ताहर
सध्या काँग्रेसमध्ये निष्ठावंतांऐवजी ‘दलबदलू’ व उपद्रवमूल्य असलेल्या लोकांना किंमत दिली जात असल्याचे पत्रक काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
ज्यांनी काँग्रेस पक्षात हयात घालवली त्या मधुकर चव्हाण यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे जिल्ह्य़ातील काँग्रेसचे नेते नाराज आहेत.

मुंडेंच्या विरोधात उमेदवारच गवसत नाही
धनंजय मुंडे यांची विरोधकांवर टीका
बीड, २४ फेब्रुवारी/वार्ताहर
लोकसभेच्या मागील निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे यावेळी कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक विजय मिळविण्यासाठी सतर्क राहावे. आमदार गोपीनाथ मुंडे यांची उमेदवारी वर्षभरापूर्वी जाहीर झाली असली तरी विरोधकांना अद्यापि उमेदवारच सापडत नसल्याची टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे यांनी केली.

अष्टपैलुत्वाचे मार्ग
केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार
नाना ग्रंथविलोकेन, मनुजा चातुर्य येतसे फार ।

असा एक श्लोक सर्वश्रुत आहे. माणूस कोणकोणत्या गोष्टींनी चतुर म्हणजेच हुशार (परीक्षेतला नव्हे) होतो? भरपूर प्रवास, विचारी, विद्वान लोकांचा सहवास व मैत्री, सभांमधून उत्कृष्ट वक्त्यांची भाषणे ऐकणे, विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन या गोष्टींतून मनुष्य खूप काही शिकतो. अनुभवतो. पण व्यक्तिमत्त्व विकसनाबाबत अजूनही बऱ्याच महत्त्वाच्या बाबी आहेत.

लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढविणार - आंबेडकर
परभणी, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी युती व आघाडी न करता भारिप-बहुजन महासंघ स्वबळावर महाराष्ट्रातील ४८ जागा लढविणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केले. शनिवार बाजार मैदानावर श्री. आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. या वेळी अकोल्याचे आमदार हरिभाऊ बडे, सर्वश्री. माधवराव नाईक, बाबुराव पोटभरे, अविनाश डोळस, जिल्हाध्यक्ष सोनटक्के, रमेश खंडागळे, सचिन गंगाखेडकर आदी उपस्थित होते. भारिप-बहुजन महासंघ स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगून श्री. आंबेडकर म्हणाले, ‘‘देशात राजकीय अस्थिरता निर्माण करणाऱ्या आणि मुंबई हल्ल्याच्या विरोधात अद्यापि कुठलीही कारवाई न करणाऱ्या या निष्क्रिय सरकारला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्तेवरून खाली खेचा. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि बेरोजगारांच्या समस्या यांना आळा घालायचा असेल, तर लोकसभेच्या निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करावे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यकर्ते मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. मराठा समाजाने सरकारकडे राखीव जागा न मागता ते शिक्षण संस्था आणि बँका यांच्याकडे मागाव्यात. न दिल्यास या संस्था ताब्यात घ्याव्यात.’’श्री. आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. नगर येथे होणाऱ्या आरक्षण बचाव जनजागरण यात्रेच्या समारोप सोहळ्यास सर्व बहुजनांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अतिरिक्तपोलीस अधीक्षक शर्मा यांची नांदेडला बदली
नांदेड, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

भारतीय पोलीस सेवा दलातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश आज गृहविभागाने जारी केला. त्यात नांदेडचे सहायक पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांचा समावेश आहे.
श्री. शर्मा यांची गडचिरोली येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसे १५ दिवसांपूर्वीच सूचित झाले होते. गेल्या महिन्यात काँग्रेसच्या माजी महापौरांना झालेल्या मारहाणीमुळेच त्यांची गडचिरोली येथे बदली झाल्याचे मानले जाते. दीड वर्षांच्या कारकिर्दीत अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविलेल्या शर्मा यांनी सर्व राजकीय दडपण वेळोवेळी झुगारले होते.
डॉ. शर्मा यांच्यासह मालेगावचे सहायक पोलीस अधीक्षक बीरेश प्रभू यांची नगर येथे अतिरिक्त अधीक्षक म्हणून, बीडचे सुवेझ हक यांची सोलापूर येथे व परभणीचे अरविंद चावरिया यांची औरंगाबाद (ग्रामीण) येथे अतिरिक्त अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

तेरणा महाविद्यालयाबरोबर ‘मोझरबेअर’चा करार
उस्मानाबाद, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्य़ात २ अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक असणाऱ्या ‘मोझरबेअर कंपनीने भविष्यातील कुशल मनुष्यबळसंदर्भात तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर आज द्विपक्षीय करार केला. सहाशे कुशल अभियंते व इतर तंत्रज्ञांची या प्रकल्पासाठी गरज भासणार आहे. या कंपनीत स्थानिक कुशल व्यक्तींना नोकरी मिळावी म्हणून एका विशेष अभ्यासक्रमाची रचनाही करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्पही प्रायोजित करण्यात येणार आहेत. जिल्ह्य़ात पहिल्या टप्प्यात पाच मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासंदर्भातील प्रशिक्षण व सेवा देण्याबाबतच्या या करारावर ‘मोझरबेअर’चे उपाध्यक्ष दिनेश सारंग, एच. एस. राऊत व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जगदे यांनी स्वाक्षरी केली. उद्योग खात्याचे राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी हा उद्योग जिल्ह्य़ात सुरू व्हावा यासाठी पुढाकार घेतला. आवश्यक अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कंपनीत सामावून घेण्याचा त्यांचा विचार आहे.

किनवट पंचायत सदस्यांचे उपोषण
नांदेड, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

किनवट येथील प्रभारी गट विकास अधिकारी शांता सूर्यवाड यांना बडतर्फ करावे व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, यासाठी पंचायत समिती सभापती कल्लुबाई साबळे व उपसभापती भाऊराव राठोड, सत्ताधारी गटाचे अन्य पाच पंचायत समिती सदस्य आजपासून किनवटच्या उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. कायमस्वरूपी गट विकास अधिकारी न नेमल्याने हा वाद आता चिघळला आहे व सभापती-उपसभापतींनाच प्रभारी गट विकास अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी आमरण उपोषणास बसण्याची नामुष्की ओढविल्याचे बोलले जात आहे. प्रभारी गट विकास अधिकारी श्रीमती सूर्यवाड यांच्याकडे बालविकास प्रकल्प कार्यालयाचे कामकाज आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीतील भ्रष्टाचार तसेच अंगणवाडी सेविकांची पदोन्नती यातील खोटे प्रवास भत्ते व स्वच्छता निधीचा अयोग्य वापर या सर्व प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर व्हावी या व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी सत्ताधारी सभापती, उपसभापती व सर्व सत्ताधारी सदस्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

ना वाहन,ना वीज कनेक्शन
घरणीचे महामार्ग पोलीस ठाणे शोभेचेच!
चाकूर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

जिल्ह्य़ातील रस्त्याच्या सुरक्षेसाठी तालुक्यातील घरणी येथे सुरू करण्यात आलेले महामार्ग पोलीस ठाणे वाहनाअभावी शोभेचे ठरले असतानाच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीजबिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्यात आल्यामुळे अंधारात राहण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्य़ातील महामार्गाच्या सुरक्षेसाठी घरणी येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये महामार्गचे पोलीस महानिरीक्षक अरुप पटनाईक यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करीत महामार्ग पोलीस ठाणे सुरू करण्यात आले; परंतु या पोलिसांना अपघातस्थळी पोहोचण्यासाठी वाहनच देण्यात आले नाही. त्यामुळे महामार्ग पोलीस ठाणे जिल्ह्य़ाच्या वैभवात भर पडली; परंतु गाडीअभावी शोभेचे पोलीस ठाणे राहिले. त्यातच मागील सहा महिन्यांपासून विद्युत बिल थकल्यामुळे सोमवारी विद्युत वितरण कंपनीने विद्युतपुरवठा खंडित केला आहे. सहा महिन्यांची बिलाची रक्कम ४,६८५ रुपये असून बिल न भरल्यामुळे पोलीस ठाणे अंधारात राहण्याची वेळ आली आहे. याबाबत महामार्ग पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल यांच्याशी संपर्क साधला असते ते म्हणाले की, या विद्युत बिलासंबंधी पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडे पाठपुरावा करूनसुद्धा बिल मंजूर केलेले नाही; त्यामुळे अंधारात राहण्याची वेळ आल्याचे सांगितले.

पाण्यासाठी ग्रामपंचायतीला शिवसेना कुलूप ठोकणार
बोरी, २४ फेब्रुवारी/वार्ताहर
गावातील पाण्याची टंचाई येत्या आठ दिवसांत दूर न झाल्यास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा शिवसेनेने ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. पंधरा हजार लोकसंख्येच्या असलेल्या या गावात नियोजनाअभावी उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाई जाणवत आहे. बऱ्याच कूपनलिका, विहिरींचे पाणी आटले असून काही हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे आतापासूनच पाणीटंचाई भासत आहे. यासंदर्भात येत्या आठ दिवसांत उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यात येईल, असे शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर माजी महिला जिल्हाप्रमुख आशा गायकवाड, उपतालुकाप्रमुख दशरथ बकान, मंडळ अध्यक्ष रोहिदास मोगल, अनिल वसेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पाणीपुरवठा अधिकाऱ्यास युतीच्या कार्यकर्त्यांचा घेराव
नळदुर्ग, २४ फेब्रुवारी/वार्ताहर
नगरपालिकेकडून सण-उत्सवाच्या काळात जाणुनबुजून पाणीपुरवठा विस्कळित केला जात असल्याचा आरोप करीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यास घेराव घातला.
नगरपालिकेचे काही कर्मचारी विशिष्ट नगरसेवकांच्या सांगण्यावरून सणाच्या काळात पाणीपुरवठा खंडित करतात. कालही पाणीपुरवठा विस्कळित झाला, असा आरोप करीत शिवसेना-भा. ज. प.च्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी डी. बी. कस्तुरे यांना घेराव घालून जाब विचारला. श्री. कस्तुरे यांनी तातडीने लक्ष घालून पाणीपुरवठा व्यवस्थित केला. या पुढे असा प्रकार होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी मारुती घोडके, बलदेव ठाकूर, अमित शेंडगे, मल्लिकार्जुन गायकवाड, राहुल बेले, शंकर घोडके, भागवत घाटे, दयानंद हत्ते आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

करकरे यांच्या स्मरणार्थ डबल विकेट क्रिकेट स्पर्धा
जालना, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या दहेमंत करकरे यांच्या स्मरणार्थ डबल विकेट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रमेश जाधव मित्रमंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्ते इक्बाल पाशा यांच्या हस्ते करण्यात आले. श्री पाशा म्हणाले की, हिंदू-मुस्लिम समाजातील सर्वानी एकत्र येऊन अधिक प्रेमाने शहाणे व्हावे हेच पाकिस्तानी अतिरेकी विचारसरणीला चोख उत्तर होईल. हेमंत करकरे स्मृती चषक हे सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रास्ताविक रमेश जाधव यांनी केले. याप्रसंगी सेलचे अध्यक्ष शाह आलम खान, मराठा महासंघाचे अरविंद देशमुख, माळी समाज युवा संघटनेचे बाळासाहेब तिडके, अब्दुल हाफीज उपस्थित होते. सूत्रसंचालन अमजद खान यांनी केले.

मराठवाडा ग्रामीण बँकेस नाबार्डचा प्रथम पुरस्कार
लातूर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर
क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये स्वयंसहायता समूह (बचत गट) बँक जोडणी कार्यक्रमातंर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कामासाठीचे प्रथम पारितोषिक मराठवाडा ग्रामीण बँकेस नुकतेच देण्यात आले.नाबार्ड ही कृषी क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून तिने स्वयंसहायता समूह बँक जोडणी कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून राबविला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत १ लाखांहून अधिक बचत गट निर्माण झाले असून २५० कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्वयंसहायता समूह बँक जोडणी या योजनेअंतर्गत ग्रामीण बँकांमध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल मराठवाडा बँकेस प्रथम पारितोषिक देऊन नुकतेच गौरविण्यात आले. नाबार्डचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी यांच्या हस्ते मराठवाडा ग्रामीण बँकेचे अध्यक्ष अशोक मकदुम यांनी पारितोषिक स्वीकारले. ७१४५ बचत गटांची जोडणी करून २८ कोटींचे अर्थसाह्य़ केल्याने हे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

जैन पतसंस्थेच्या माजलगाव शाखेचे शुक्रवारी उद्घाटन
बीड, २४ फेब्रुवारी/वार्ताहर
जैन नागरी सहकारी पतसंस्थेला नवीन पाच शाखा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. माजलगाव येथील शाखेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २७) भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष विजयराज बंब यांनी दिली. शहरात पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जैन नागरी सहकारी पतसंस्थेने सहकार क्षेत्रात नामांकित पतसंस्था म्हणून ओळख निर्माण केली. पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक पतसंस्था पॅटर्न राबवणारी मराठवाडा विभागातील जैन पतसंस्था एकमेव मानली जाते. संस्थेकडे तीस कोटींपेक्षा जास्त ठेवी असून मुख्य शाखेतील रोजचे व्यवहार एक कोटीपेक्षा जास्त आहेत. पूर्ण संगणकीकरण असलेल्या पतसंस्थेने आयएसओ नामांकनासाठी लागणाऱ्या सर्व सोयी पूर्ण केल्या आहेत. संस्थेच्या जिल्ह्य़ात माजलगाव, गेवराई, परळी, अंबाजोगाई व शहरातील मोंढा भागात शाखा सुरू होणार आहेत. माजलगाव येथील शाखेचे उद्घाटन शुक्रवारी श्री. मुंडे यांच्या हस्ते होईल.

‘दिव्य ग्रामसाठी मनाची स्वच्छता महत्त्वाची’
परतूर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर
दिव्य ग्राम निर्माण करण्यासाठी मानवी मनाची स्वच्छता व सुंदरता महत्त्वाची असल्याचे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक महेशगिरी यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील वाटूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षक अंकुश भालेकर, माधवी श्रेया, आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक आघाव, गट विकास अधिकारी श्रीमती एम. के. वळवी यांच्यासह १५ हजारांवर नागरीक उपस्थित होते. श्री. महेशगिरी म्हणाले की, सर्वानी एकत्र येून मतभेद, जात, धर्म व राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी काम करावे. सामान्य माणसे एकत्र आली तर असामान्य कामे होतात. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून भारतात दिव्य ग्राम निर्माण मोहीम हाती घेतली असून ३२ हजार गावांत हे काम चालणार आहे, असे त्यांनी सांगितले.

औंढा नागनाथ येथे ६० हजार भाविक
हिंगोली, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

देशातील आठवे जोतिर्लिग असलेल्या औंढा नागनाथ येथे काल दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. अंदाजे ६० हजार भाविकांनी दर्शन घेतले. आमदार दिवाकर रावते आणि आमदार गजानन घुगे यांच्या हस्ते पहाटे नागनाथ ज्योतिर्लिगाची महापूजा वेदमंत्राच्या उच्चारात झाली. आंध्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आदी प्रांतांतून मोठय़ा प्रमाणावर भाविक आले होते. महाशिवरात्रीनिमित्त रामकथा महोत्सव, कीर्तन महोत्सव आदी कार्यक्रम झाले.रथोत्सवाने गुरुवारी (दि. २६) महाशिवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. शिवपार्वतीची मिरवणूक रथोत्सवातून काढली जाते, अशी माहिती देवस्थान समितीचे व्यवस्थापक निळकंठ देव यांनी दिली. यंदा भाविकांसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सचिव विलास काळे यांनी सांगितले.

रक्तदाते पारसशेठ चापसी यांना शिवबा शौर्य पुरस्कार
लातूर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

स्वराज युवा संघटनेच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीदिनी दिला जाणारा शिवबा शौर्य पुरस्कार या वर्षी लातूर येथील विक्रमी रक्तदाते पारसशेठ चापसी यांना देण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पारस चंदुलालशेठ चापसी (वय ५६) यांची यंदा निवड करण्यात आली. श्री. चापसी यांनी आतापर्यंत ११२ वेळा रक्तदान केले आहे. स्वराज शिवजयंती समितीचे अध्यक्ष शिवाजी नरहरे, प्रशांत चव्हाण, नीलेश करमुडी, शेखर हविले यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक चव्हाण व संघटेनेचे प्रशांत चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

नांदेड महापालिकेचे आठ अब्जांचे अंदाजपत्रक सादर
नांदेड, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

महापालिकेचे ८ अब्ज ५ कोटी १८ लाख रुपयांचे प्रस्तावित अंदाजपत्रक आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज स्थायी समितीसमोर सादर केला. गेल्या वर्षीचे मूळ अंदाजपत्रक ७ अब्ज ८४ कोटी ४० लाख रुपयांचे होते. सुधारित अंदाजपत्रक ८ अब्ज ७३ कोटी ४६ लाख रुपयांचे झाले आहे.
डॉ. म्हैसेकर यांनी प्रस्तावित केलेल्या अंदाजपत्रकात सायकलवरील जकात कर माफ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जकात व पारगमन करात वाढ, गरीब वस्त्यांतील नागरिकांना सोशल सिक्युरिटी कार्ड, मंगल कार्यालयाच्या देखभालीकरिता भाडेवाढ, दलित वस्ती सुधार योजनेत २ अब्ज ६७ कोटी रुपयांची कामे करणे, विष्णुपुरी जलाशयातून पाणी घेण्याकरिता वाहिनी टाकणे, जकात अभिकर्ता नियुक्ती, उपकरापेक्षा जकात करच, महापालिकेचे कॉल सेन्टर, मनपाची रुग्णालये खासगी यंत्रणेमार्फत चालविणे, प्रायोगिक तत्त्वावर नवीन बस सुरू करणे यासह अन्य काही शिफारशी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. येत्या १० ते १५ दिवसांत स्थायी समिती अभ्यास करून अर्थसंकल्प तयार करणार आहे.

पोलिसांत तक्रार करणाऱ्यानेच केला पत्नीचा खून
गंगाखेड, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील मरडसगाव येथील विवाहिता कोमल भारत चव्हाण (वय २०) हिचा रविवारी रात्री राहत्या घरी संशयास्पद खून झाला. अज्ञात व्यक्तींनी पत्नीवर अत्याचार करीत तिचा खून केल्याची बतावणी करणाऱ्या पती भारत चव्हाण याने पोलिसांकडे खुनाची कबुली दिली. पती भारतसह मृताची सासू रुक्मिण, दीर शरद व गणेश या चौघांविरुद्ध कोमलचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पिंपळदरी पोलिसांनी आज गुन्हा नोंद केला आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. एस. यलकेवाड तपास करीत आहेत.

किनीच्या सरपंच व उपसरपंचांविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर
भोकर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील किनीच्या सरपंच अनुसयाबाई दत्ता कोरडे व उपसरपंच रवींद्र रेड्डी यांच्या विरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वासाचा ठराव आज ८-२ अशा मतांनी मंजूर झाला. सरपंच व उपसरपंच इतर सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, या कारणावरून सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या वर चर्चा करण्यासाठी आज तहसीलदार किशोर जक्कल यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. त्यात हा ठराव मंजूर झाला. या वेळी एक सदस्य अनुपस्थित होता.

इंग्रजी विभागात आज व्याख्यान
औरंगाबाद, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात बुधवार, २५ फेब्रुवारीला कै. सरदार दलिपसिंह स्मृती व्याख्यानमालेंतर्गत सुप्रसिद्ध कादंबरीकार मेहर पेस्तनजी यांचे व्याख्यान होणार आहे. इंग्रजी विभागात सकाळी ११ वाजता श्री. पेस्तनजी हे ‘लेखकाचा प्रवास’ या विषयावर बोलणार आहेत. प्रभारी कुलगुरू डॉ. ए. जी. खान अध्यक्षस्थानी असतील, तर कला शाखेचे अधिष्ठाता प्रा. नंदकुमार लवांदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.