Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अडवाणींकडून युती अभेद्य राहण्याचे स्पष्ट संकेत!
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

‘कमळा’बाईवर आजही आमचे पूर्वीइतकेच प्रेम आहे, असा निर्वाळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देऊन राज्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ असलेली शिवसेना-भाजप युती अभेद्य असल्याचे स्पष्ट केलेले असतानाच आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे काही ठिकाणी जागावाटपाबाबत तडजोडी कराव्या लागणार असल्या तरी त्या सामंजस्याने केल्या जातील, त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही, असे स्पष्ट करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अडवाणी यांनी कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख न करता शिवसेना-भाजप युती अभेद्य असल्याचे स्पष्ट संकेत आज अप्रत्यक्षरीत्या दिले.
हरयाणा, उत्तर प्रदेश, आसाममधील काही पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाल्याने आघाडी अधिकाधिक सशक्त झाली आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई भाजपच्या वतीने आज षण्मुखानंद सभागृहात लालकृष्ण अडवाणी यांना ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचा निवडणूक निधी धनादेशाच्या स्वरूपात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांची भाषणे झाली. अडवाणी यांचा या वेळी मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शिवसेना-भाजप युती तुटणार असल्याच्या जोरदार चर्चेचा स्पष्ट उल्लेख अडवाणी यांनी केला नसला तरी शिवसेना-भाजप युती तुटण्याबाबत जी चर्चा होत आहे, ती सुरुच राहणार असेही अडवाणी म्हणाले. भ्रष्टाचाराचे मूळ हे निवडणुकीच्या खर्चात आहे त्यामुळे तो रोखायचा असल्यास निवडणुकीचा खर्च हा सरकारने केला पाहिजे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. देशातील जनतेला आता परिवर्तन हवे आहे. त्यामुळे भाजप जिंकला तर भारत जिंकेल, असे मानून मतदान करण्याचे आवाहन अडवाणी यांनी केले आणि भाजप हे केवळ उपकरण असल्याचे नमूद केले. आघाडी सत्तेवर आल्यास सर्व वर्गाचे कल्याण करून सर्व सामाजिक दोष नष्ट करण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
मुंबईवर आतापर्यंत तीन हल्ले झाले. तिसरा हल्ला अधिकच भीषण होता. त्यानंतर देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतामध्ये दहशतवाद संपुष्टात आणण्याची ताकद आहे. मात्र कोणत्याही पक्षाने सुरक्षिततेच्या मार्गात व्होट बँकेचा अडसर आणू नये, असे ते म्हणाले. या वेळी अडवाणी यांनी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांना श्रद्धांजली वाहिली.