Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राजा उदार झाला..
उत्पादन व सेवा शुल्कात २ टक्क्यांनी कपात
नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

 

अभूतपूर्व अशा जागतिक मंदीचे अरिष्ट झेलणाऱ्या उद्योगांना लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आज उत्पादन शुल्क आणि सेवा शुल्कातील सवलतींद्वारे सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे आणखी एक स्टिम्युलस लाभले. लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प पारित होत असताना अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी उत्पादन शुल्क आणि सेवा करात प्रत्येकी २ टक्क्यांनी कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीचा विळखा पडला असला तरी या संकटावर आम्ही मात करू, असा ठाम निर्धार मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केला.
आठ दिवसांपूर्वी मुखर्जी यांनी २००९-१० सालचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला तेव्हा त्यात कोणत्याच नसल्यामुळे टीका झाली होती. मुखर्जी यांनी आज त्याची भरपाई अंतरिम अर्थसंकल्प पारित करताना केली. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या सभागृहातील या शेवटच्या मोठय़ा चकमकीत युपीए सरकारवर रोष व्यक्त करण्यासाठी भाजप-रालोआ आणि डाव्या पक्षांनी सभात्याग केला. अंतरिम अर्थसंकल्प मग आवाजी मतांनी पारित करण्यात आला.
आर्थिक तरतुदींचे पाठबळ नसताना घटनात्मक बंधनांचे उल्लंघन करून दोन महिन्यांच्या लेखानुदानात आपण सवलती व घोषणांचा वर्षांव करू शकत नाही, असे अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना आज मुखर्जी यांनी सांगितले. पण डिसेंबर आणि जानेवारीपाठोपाठ अर्थव्यवस्थेला निवडणुकीपूर्वी तिसरे स्टीम्युलस प्रदान करण्याचा त्यांना मोह आवरला नाही. सेवा कर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणि उत्पादन शुल्क १० टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर तात्काळ प्रभावाने आणला जात असल्याची त्यांनी घोषणा केली. ऊर्जा क्षेत्राला मदतीचा हात पुढे करताना त्यांनी नाप्थ्याच्या आयातीला सीमाशुल्कातून वगळले. ही सवलत ३१ मार्च २००९ नंतरही कायम राहणार आहे. उत्पादन शुल्कात यापूर्वी जाहीर करण्यात आलेली सरसकट ४ टक्क्यांची सवलत ३१ मार्चनंतरही कायम ठेवण्यात आली आहे. सिमेंटच्या एकत्रित साठय़ावरील उत्पादन शुल्क ८ टक्के किंवा २३० रुपये यापैकी जे जास्त असेल तेवढे आकारण्यात येईल. या कर सवलतींमुळे अडचणीत सापडलेल्या सिमेंट आणि वाहन उद्योगांना दिलासा मिळणार आहे.