Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पेट्रोल, डिझेल दरकपातीची लवकरच घोषणा?
नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकांपूर्वी संसदीय परंपरेला शिरोधार्ह मानून घटनेच्या चौकटीत राहून केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी हंगामी अर्थसंकल्प सादर केला. पण आज हा अंतरिम अर्थसंकल्प करता करता त्यांनी सुमारे ३० हजार कोटी रुपयांच्या करसवलतींची उधळण केलीच. लोकसभा निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेसह आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी युपीए सरकारपाशी दोन दिवस उरले आहेत. या दोन दिवसात युपीए सरकार जाता जाता आणखी किती आर्थिक खैरातीची उधळण करते, याचीच चर्चा आज अकस्मात जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या स्टिम्युलसनंतर सुरु झाली आहे.
आपले सहकारी निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना हटविण्याची शिफारस करून युपीए सरकारला प्रतिवादी बनविणारे मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी आणि मनमोहन सिंग सरकार यांच्यातील चुरस पुढच्या दोन दिवसांत नाटय़मय ठरणार आहे. मनमोहन सिंग सरकारला अकस्मात खिंडीत गाठून निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याचा गोपालस्वामी यांचा बेत असल्याचे समजते, तर दुसरीकडे गोपालस्वामी यांच्या मनसुब्यांवर मात करून निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वीची शेवटची आर्थिक उधळण करण्यासाठी केंद्र सरकार आतुर असल्याचे सांगितले जाते. शेवटच्या दोन दिवसात केंद्र सरकार पेट्रोलच्या दरात पाच रुपयांनी, डिझेलच्या दरात दोन रुपयांची आणखी कपात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय कृषीक्षेत्रासाठीही काही घोषणा होऊ शकतात, असे काँग्रेस वर्तुळातील जाणकारांचे म्हणणे आहे. गोपालस्वामींकडून लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची अनपेक्षित घोषणेपूर्वी सरकार मतदारांना खूष करण्यासाठी शेवटचा प्रयत्न करेल, असे त्यांचे म्हणणे आहे.