Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

लोकसभा निवडणुकांची घोषणा याच आठवडय़ाअखेर?
आंध्र प्रदेश, ओरिसा आणि सिक्कीममध्येही विधानसभा निवडणुका
नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

 

चौदाव्या लोकसभेवर पडदा पडण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना चालू आठवडय़ाअखेर शनिवार वा रविवारी पंधराव्या लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा होणार असल्याचे संकेत आज देण्यात आले. लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश, ओरिसा आणि सिक्कीम या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. २००४ साली लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा २९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती.
हंगामी रेल्वे व सर्वसाधारण अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी बोलविण्यात आलेले संसदेचे अधिवेशन येत्या गुरुवारी संपणार आहे. त्यानंतर लोकसभेचे विसर्जन होऊन आगामी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याचा मार्ग प्रशस्त होईल. येत्या शनिवारी किंवा रविवारी लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी तसेच निवडणूक आयुक्त नवीन चावला आणि एस. वाय. कुरेशी यांनी आज केंद्रीय गृह सचिव मधुकर गुप्ता आणि अंतर्गत सुरक्षा विभागाचे विशेष सचिव रमण श्रीवास्तव यांच्याशी लोकसभा निवडणुकांसाठी लागणारी सुरक्षा व्यवस्थेचा तसेच देशभरातील कायदा व सुव्यवस्थेवर ४० मिनिटे चर्चा केली. निवडणुकांसाठी निमलष्करी दलाचे ६० हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ६०० कंपन्या सज्ज ठेवण्यात याव्या, असे निवडणूक आयुक्तांनी गृह मंत्रालयाला सांगितले आहे.
मुक्त आणि निपक्ष वातावरणात निवडणुका पार पडाव्या म्हणून एका ठिकाणी तीन वर्षांंपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करून त्याचा अहवाल महिन्याअखेर सादर करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणुकांदरम्यान संपर्क यंत्रणा अखंडित राहावी म्हणून राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सरकारी व खासगी दूरसंचार कंपन्यांशी चर्चा करण्याचेही निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.