Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अडवाणी - शिवसेनाप्रमुख भेट होऊ न दिल्याचा आरोप
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

भाजपशी घटस्फोट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी सोयरिक जुळविण्याचे काही मंडळींचे सुरू असलेले प्रयत्न थांबावेत यासाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न आज भाजपच्या वतीने करण्यात आला. मात्र त्याला यश आले नाही.
अडवाणी आणि ठाकरे यांची भेट होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा दावा भाजपच्या काही नेत्यांनी केला आहे. तर ठाकरे यांची भेट अचानक मागितल्याने दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई भाजपच्या वतीने अडवाणी यांचा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सत्कार करण्यात आला. या भेटीनंतर अडवाणी आणि ठाकरे यांची भेट व्हावी, असे प्रयत्न भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी सुरू केले होते. परंतु कार्यक्रम संपला तेव्हा ठाकरे यांची विश्रांतीची वेळ असल्याने शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची अडवाणी यांच्याशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ही भेट होऊ शकली नाही, असे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली तर भाजपशी युती तोडण्याच्या सुरू असलेल्या काही मंडळींच्या प्रयत्नांना खीळ बसेल म्हणून ही भेट होऊ देण्यात आली नाही, असा दावा भाजपच्या काही नेत्यांनी केला. तर अडवाणी यांचा कार्यक्रम किमान महिनाभर आधी ठरलेला असताना आज अचानक ठाकरे यांच्या भेटीची वेळ कशी मागितली, असा सवाल शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, दिल्लीहून येताना अडवाणी यांनी बाळासाहेबांना फोन केला होता. मात्र त्यावेळी बाळासाहेब विश्रांती घेत होते. त्यामुळे याला कुणी राजकीय रंग देऊ नये.