Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

योग्य परीक्षण न केलेली औषधे बाजारात
डॉ. विद्याधर ओक यांचे प्रतिपादन
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी
दैवामुळे आपल्याला देह मिळालेला आहे. परंतु, तो कसा जपावा हे सर्वस्वी आपल्या कर्मावर अवलंबून आहे. दैव आणि कर्म यांच्यावर आयुष्य ठरत असते. देह जपण्यासाठी चांगले कर्म करण्याची गरज आहे. देह हे देवाचे मंदीर आहे असे म्हटले जात असले तरी आपले कर्म चुकीचे असल्यामुळे ते व्याधींचे मंदीर बनू लागले आहे. लोकांची औषधासाठीची गरज वाढू लागली आहे. परंतु, व्यावसायिक व आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी औषध कंपन्या चोख परीक्षण न केलेली औषधेही बाजारात आणत आहेत. एकच औषध वेगवेगळ्या नावाने बाजारात आणले जाते. औषध उद्योगात नितीमूल्यांचा ऱ्हास होत आहे.

राज्य कामगार विमा योजना केंद्राकडे हस्तांतरित करण्याचा घाट
संदीप आचार्य
मुंबई, २४ फेब्रुवारी

राज्य कामगार विमा योजनेत काम करणारे साडेपाच हजार कर्मचारी तसेच या योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचारास पात्र असणारे १५ लाख विमा कामगार व त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे ६० लाख लोकांच्या भवितव्याचा विचार न करता केवळ या योजनेपोटी येणारा ६० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी ही संपूर्ण योजनाच राकावि महामंडळाकडे (केंद्र शासन) वर्ग करण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे.

अर्भक पळविल्याचा ठपका सुरक्षारक्षकांवर?
मुंबई, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मोहिनी आणि मोहन नेरुरकर या दाम्पत्याचे नवजात अर्भक जन्मानंतर काही दिवसांतच शीव येथील लो. टिळक इस्पितळातून पळविले जाण्याच्या घटनेची खातेनिहाय चौकशी केल्यानंतर महापालिका प्रशासनाने याचा ठपका सुरक्षारक्षकांवर ठेवला असल्याचे समजते. महापालिका आयुक्तांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी नायर इस्पितळाचे अधिष्ठात्यांना नेमले होते. नेरुरकर यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने हा चौकशी अहवाल सीलबंद स्वरूपात आपल्याकडे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार हा अहवाल न्या. बिलाल नाझकी व न्या. ए. जे. जोशी यांच्या खंडपीठापुढे सादर झाला.

मुंबईकरांना लवकरच वीज दरवाढीचा झटका?
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

बाहेरून जादा दराने वीज घेऊन मुंबईचा विजेचा पुरवठा अखंडित ठेवण्यात येत असला तरी आता लवकरच मुंबईकरांना वीज दरवाढीचा मोठा झटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबई शहराला विजेचा पुरवठा करणाऱ्या बेस्टने १०१ ते ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी ११४.७८ टक्के इतकी वाढ राज्य विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्तावित केली आहे. तर टाटाने १६ टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. उपनगराला विजेचा पुरवठा करणाऱ्या रिलायन्सची वाढही लवकरच अपेक्षित आहे.

आज ठरणार महाराष्ट्राची ‘होम मिनिस्टर’
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचा नवा उच्चांक निर्माण करणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ या झी-मराठी वाहिनीवरील मालिकेच्या नव्या पर्वातील महाअंतिम सोहळा उद्या वडाळा येथील भारतीय क्रीडा भवनात रंगणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या महाअंतिम फेरीचा उद्या समारोप होणार असून सायंकाळी विजेत्या होम मिमिस्टरच्या नावाची घोषणा होणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. राज्यभरातून मुंबई, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, पुणे, पनवेल आदी आठ केंद्रांवर महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक केंद्रावर सुमारे पाचशे महिला स्पर्धक सहभागी झाल्या. त्यातून दोनशे जणींची निवड करण्यात आली. त्यातून प्रत्येक स्तरावर चाळणी लावून या आठ केंद्रांमधून प्रत्येकी पाच अशा एकूण चाळीस जणींची तीन दिवसांच्या महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून वडाळा येथे रंगलेल्या या स्पर्धेचा अंतिम सोहळा उद्या बुधवारी होत आहे. ‘होम मिमिस्टर’या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि कार्यक्रमाची टिम या चाळीस जणींमधून एकीची निवड
करणार आहेत.

‘संतसूर्य तुकाराम’सह यादव यांच्या अनेक पुस्तकांची मोठी विक्री
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी
पुढील महिन्यात महाबळेश्वर येथे होणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांची सहा पुस्तके सध्या ‘आऊट ऑफ प्रिंट’ असून लवकरच ती पुनर्मुद्रित केली जाणार आहेत. ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन आपल्या साहित्यकृतीतून घडविणाऱ्या डॉ. यादव यांच्या ज्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीवरून सध्या जो गदारोळ झाला त्या पुस्तकाचीही आवृत्ती सध्या उपलब्ध नाही. डॉ. यादव यांच्या अनेक पुस्तकांपैकी सध्या आदिताल, ग्रामीणता-साहित्य आणि वास्तव, मळ्याची माती, मराठी साहित्य-समाज आमि संस्कृती, मातीखालची माती, मायलेकर आदी पुस्तकांच्या आवृत्या संपल्या असून ही पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध नाहीत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. यादव यांच्या पुस्तकांना पुन्हा एकदा काही प्रमाणात मागणी आली आहे. डॉ. यादव यांच्या ज्या काही पुस्तकांच्या आवृत्त्या संपल्या आहेत, ती पुस्तके लवकरच पुनर्मुद्रित केली जाणार असल्याचे ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनील मेहता यांनी सांगितले.

सिडकोची साडेबारा टक्के भूखंड वाटपाची संगणकीय सोडत
मुंबई, २४ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

नवी मुंबईच्या रबाळे-गोठिवली आणि घणसोली-तळवली येथील भूमीपुत्रांसाठी साडेबारा टक्के योजनेअंतर्गत काढण्यात येणारी भूखंड वाटपाची संगणकीय सोडत सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांच्या उपस्थितीत आज पार पडली. आजच्या सोडतीद्वारे ७. ४५ हेक्टर क्षेत्राचे वाटप प्रकल्पग्रस्तांना करण्यात आले. या अंतर्गत रबाळे-गोठिवली आणि घणसोली-तळवली येथील १५१ भूखंडांचे वाटप करण्यात आले. आज झालेल्या संगणकीय सोडतीला सिडकोचे उपाध्यक्ष जी. एस. गिल, जेएनपीटीचे अध्यक्ष एस. एस. हुसेन, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. जी. जाधव, सिडकोचे संचालक नामदेव भगत, सुभाष भोईर हे उपस्थित होते. आतापर्यंत सिडकोतर्फे ३०१.२४७ हेक्टर एवढय़ा क्षेत्रासाठी संचालक मंडळासमोर सोडती काढण्यात आल्या आहेत. याबाबतच्या सोडतीचे निकाल सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात उद्यापासून जनतेसाठी प्रदर्शित करण्यात येणार असून संबंधितांनी भूखंड वाटप इरादापत्र सिडकोच्या भूमी व भूमापन विभागातून तीन मार्च ते २० मार्च या कालावधीत दुपारी दोननंतर घेऊन जावे, असे सिडकोच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

वांद्रे ते बोरिवलीत आज कमी दाबाने पाणी
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

वांद्रे येथील बडा मस्जिद परिसरातील वांद्रे ते बोरिवली परिसराला पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी आज सायंकाळी फुटली. रात्री उशिरापर्यंत या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. ही जलवाहिनी फुटल्याने उद्या वांद्रे ते बोरिवली परिसरात पाणी कमी दाबाने पुरविण्यात येणार आहे. जलवाहिनी फुटल्याने परिसर जलमय झाला होता.

रिपब्लिकन पक्षाचे दिल्ली येथे अधिवेशन
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या २८ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी खास रेल्वे आरक्षित करण्यात आलेली आहे. रामदास आठवले यांच्या अधक्षतेखाली होत असलेल्या या अधिवेशनात येणाऱ्या निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. आपली ताकद दाखविण्यासाठीच आठवले यांनी दिल्लीत अधिवेशन आयोजित केले असल्याची चर्चा आहे. या अधिवेशनाची जोरदार तयारी करण्यात आली असून खास रेल्वेच आरक्षित करण्यात आली आहे. ही रेल्वे २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता दादर येथून सुटणार आहे, अशी माहिती पक्षाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी दिली. दिल्ली येथील रामलिला मैदानावर हे अधिवेशन होत आहे. या पूर्वी रिपब्लिकन पक्षाने दिल्ली येथे अधिवेशन घेतले नव्हते. तीन वेळा निवडून आल्यानंतरही आठवले यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे आता आपली दिल्लीत ताकद दाखविण्याची तयारी पक्षाने केली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.